

Maharashtra Politics : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात झालेल्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार रोहित पवार यांनी आतापर्यंत दोन वेळा पत्रकारपरिषद घेत अजित पवार यांच्या निधनावर घातपाताचा संशय व्यक्त केला असून अनेक प्रश्न उपस्थितीत केले आहेत. त्यामुळे राज्याचे राजकारण तापले असून या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार गट) आमदार दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांच्या सुरक्षिततेबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी चिंता व्यक्त केली असून, राज्य सरकारने त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, अशी आग्रही मागणी केली आहे.
सुप्रिया सुळे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं की, मला रोहितची काळजी वाटत आहे. आदरणीय अजितदादा यांच्या अपघाती मृत्यूनंतर रोहित अनेक मुद्दे मांडत आहे. रोहित पवार हे जनतेच्या मनातील शंका उपस्थित करत आहेत. प्रसारमाध्यमातून आणि वर्तमान पत्रातून तसेच लोकांच्या समोर रोहित ज्या भावना मांडतोय, जी वस्तुस्थिती मांडतोय, डेटा दाखवतोय ते पाहाता अनेकांना त्याची काळजी वाटत आहे. म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती करते की, त्यांनी रोहित यांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्यावी, रोहितला सुरक्षा मिळणं गरजेचं आहे अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली.
अजितदादांच्या अपघाती मृत्यूनंतर संबंध महाराष्ट्राला धक्का बसलेला आहे. जनभावना अतिशय तीव्र असून लोक अनेक शंका-कुशंका व्यक्त करत आहेत. अशापरिस्थितीत रोहित व्यवस्थेपुढे जनतेच्या मनातील शंका, प्रश्न उपस्थित करीत आहेत. अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीने काही मुद्दे, तथ्ये, शंका तो उपस्थित करीत आहेत. त्यामुळे त्या प्रश्नांची उत्तरे जनतेला मिळालीच पाहिजे. ही उत्तरे मिळण्यासाठी यंत्रणेकडून उशीर लागत असेल तर अस्वस्थता आणखी वाढेल. ती वाढू नये यासाठी या घटनेतील सत्य लोकांसमोर पारदर्शक पद्धतीने पुढे येणे अतिशय गरजेचे आहे.
व्यवस्थेला प्रश्न विचारणे हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार असून रोहित व्यवस्थेपुढे लोकांच्या मनातील प्रश्न उपस्थित करत आहे. त्या पार्श्वभूमीवर त्यांना सुरक्षा मिळणे अतिशय गरजेचे असून त्यांच्या सुरक्षेची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकारने घेतली पाहिजे असं सुप्रिया सुळे यांचे म्हणणे आहे.
दरम्यान रोहित पवार यांनी १८ फेब्रुवारी रोजी घेतलेल्या पत्रकारपरिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात हा वैमानिकाचा वापर करून केलेला घातपात असल्याचा संशय व्यक्त करत खळबळ उडवून दिली आहे. वैमानिकाला 'ब्लॅकमेल' करून हा घातपात घडवण्यात आला असावा, असाही संशय त्यांनी व्यक्त केला असून विमानातील अतिरिक्त इंधनावरही त्यांनी प्रश्न उपस्थितीत करत संशय व्यक्त केला आहे.
अपघातग्रस्त विमान चालवणाऱ्या 'व्हीएसआर व्हेंचर्स'च्या मालकांशी नागरी उड्डाण मंत्र्यांचे आणि त्यांच्या पक्षाचे 'मैत्रीपूर्ण' संबंध असल्याचा दावा करत निष्पक्ष चौकशी होण्याबाबत शंका वाटत असल्याचं रोहित पवार म्हणाले. डीजीसीए आणि व्हीएसआर कंपनी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला. कंपनीच्या मालकांना आणि गुंतवणुकदारांना वाचवण्यासाठी चौकशीला विलंब लावला जात असून मागील तारखांचे कागदपत्र तयार केले जात असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. या प्रकरणाच्या तपासावर देखरेख करण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली.
'डीजीसीए'च्या नियमानुसार दृश्यमानता कमी असताना विमान उडायला नको होते. वैमानिकाने पहिली फेरी मारल्यानंतर विमान मुंबईला परत आणायला हवे होते, मात्र त्याऐवजी मुद्दाम विमान कोसळवले गेले, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केला असून 'ब्लॅक बॉक्स' खराब झाल्याच्या दाव्यावरही त्यांनी सवाल उपस्थित केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.