Vishwajeet Kadam 
पश्चिम महाराष्ट्र

Siddaramaiah In Sangli : दुष्काळी जतला पाणी द्या अन्‌ बेळगावातील आमच्या मराठी भाषिकांना जपा ; विश्वजित कदमांची सिद्धरामय्यांना विनंती

सरकारनामा ब्यूरो

Sangli News : सांगलीचा नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, आमच्या दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकने पाणी द्यावे. तसेच, सन २०१९, २२ मध्ये आलेल्या महापुरामुळे सांगलीकरांचे मोठे हाल झाले. पुरावेळी अलमट्टी धरणातून पाणी सोडावे. बेळगावातील आमच्या मराठी भाषिकांना जपा, अशी मागणी आमदार विश्वजित कदम यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना केली. (Siddaramaiah ji, give water to Jat and pray for our Marathi speakers in Belgaum : Vishwajeet Kadam)

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) यांचा आज काँग्रेस पक्षाच्या वतीने सांगलीत (Sangli) सत्कार करण्यात आला. माजी मंत्री विश्वजित कदम (Vishwajeet Kadam) यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमातच कदम यांनी सिद्धरामय्यांना साकडे घातले.

कदम म्हणाले की, सांगलीचा नागरिक म्हणून माझी तुम्हाला विनंती आहे की, आमच्या दुष्काळी जत तालुक्याला कर्नाटकने पाणी द्यावे. आमची मागणी फार नाही. फक्त शेती आणि पिण्यासाठी कर्नाटक सरकारने पाणी द्यावी. सर्वसामान्यांना न्याय देणारे सिद्धरामय्या हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे ते जतच्या नागरिकांना दिलासा देणारा निर्णय घेतील.

सांगलीत २०१९, २२ मध्ये आलेल्या महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे. पुराच्या वेळी अलमट्टी धरणातून पाणी सोडण्यात यावे, एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. त्याचप्रमाणे बेळगावमध्ये मराठी भाषिक मोठ्या संख्येने राहतात. त्यांना सांभाळावे, अशी आमची मागणी आहे, असेही कदम यांनी नमूद केले.

विश्वजित कदम म्हणाले की, ज्याप्रकारे कर्नाटकात विधानसभेचा निकाल लागला, त्या प्रमाणेच २०२४ मध्ये महाराष्ट्रातही निकाल लागेल. आपल्या येण्याने आम्हाला मोठी उर्जा मिळाली आहे. काँग्रेसच्या विजयाची सुरुवात सांगली जिल्ह्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या विजयाने होईल, असा मी तुम्हाला शब्द देतो. भारत जोडो यात्रेमुळे भाजपला सत्तेतून हाकलून दिल्याशिवाय काँग्रेसचा कार्यकर्ता शांत बसणार नाही. सांगली जिल्ह्यातील काँग्रेसचे नेते एक विचाराने काम करत आहेत.

केंद्र सरकारवर टीका करताना कदम म्हणाले की, केंद्रातील मंडळींनी लोकशाहीची मूल्ये बाजूला ठेवून सत्तेचा गैरवापर केला आहे. महागाई, बेरोजगारी वाढत गेली. पंजाब, हरियणातील शेतकऱ्यांवर अन्याय केला गेला. निवडणुका जवळ आल्यानंतर समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न केला गेला. या सर्व प्रकरणांमुळे लोकशाही मूल्ये मानणारा सर्वसामान्य माणूस खचू लागला होता. मात्र, गेल्या महिन्यात झालेल्या कर्नाटकाच्या निवडणुकीत आशेचा किरण दिसला.

सिद्धरामय्या यांच्यासारखा सर्वसामान्य घरातून आलेल्या नेत्यावर निवडणुकीची सूत्रे सोपवली, त्यांनी काँग्रेसचा विचार सर्व घरांत पोचविण्याचा प्रयत्न केला. कर्नाटकातील काँग्रेस नेत्यांनी बहुमतापेक्षा जास्त १३६ आमदार निवडून आणले. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रात प्रथम सत्कार करण्याचे भाग्य सांगलीला लाभाले आहे. सांगली ही यशवंतराव चव्हाण यांची जन्मभूमी आहे, काँग्रेसचा विचार या भूमीने जोपासला आहे, असेही कदम यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT