Solapur DCC Bank : आमदार राऊतांच्या याचिकेने बडे नेते अडचणीत; ‘RBI’ने ठोठावलेला पाच लाखांचा दंडही 'त्या' संचालकांकडून वसूल होणार

बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे निश्‍चित झाल्यानंतर आता या नुकसानीस जबाबदार कोण? याची निश्‍चिती केली जात आहे.
Solapur DCC bank
Solapur DCC bankSarkarnama
Published on
Updated on

Solapur DCC Bank News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकांशी संबंधित असलेल्या कंपन्यांना तत्कालिन संचालक मंडळाने असुरक्षित कर्ज मंजूर केले. हे कर्ज मंजूर करत असताना बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमधील नियमांचे उल्लंघन झाले होते. त्यामुळे जिल्हा बँकेला पाच लाख रुपयांचा दंड झाला होता. दंडाची ही रक्कम देखील तत्कालिन संचालकांकडून वसूल केली जाणार आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी संचालकांना नोटीस बजाविण्यात आलेली आहे. (Fine of Solapur DCC will also be recovered from the then director of Rs.5 lakh)

सोलापूर (Solapur) जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या (District Bank) तत्कालिन संचालक मंडळाने या असुरक्षित कर्जासंदर्भातील माहिती आरबीआयला सादर करणे आवश्‍यक होते. तत्कालिन संचालक मंडळाने ही माहिती सादर न केल्याने जिल्हा बँकेला आरबीआयने (RBI) पाच लाख रुपयांचा दंड केलेला आहे. त्यामध्ये बॅँकेचे आर्थिक नुकसान झालेले आहे. दंडाची ही रक्कम तत्कालीन संचालकांकडून वसूल करण्यासाठी निवृत्त अप्पर निबंधक तथा सहकार कायदा कलम ८८ अन्वये लावण्यात आलेल्या चौकशीचे अधिकारी डॉ. किशोर तोष्णीवाल यांनी कार्यवाही सुरू केली आहे. सोलापुरातील वस्त्रोद्योग विभागाचे तत्कालीन उपायुक्त चंद्रकांत टिकुळे यांच्या माध्यमातून जिल्हा बँकेची सहकार कायदा कलम ८३ अन्वये चौकशी करण्यात आली होती.

Solapur DCC bank
konkan News : बावनकुळेंनी वाढविले आमदार, खासदार इच्छुकांचे टेन्शन; 'निवडणूक प्रमुख हेच भविष्यातील उमेदवार...'

थकीत कर्ज, असुरक्षित कर्ज वाटपामुळे जिल्हा बँकेचे आर्थिक नुकसान झाले आहे की नाही? याची चौकशी उपायुक्त टिकुळे यांच्या माध्यमातून करण्यात आली होती. या चौकशीत बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याचे निश्‍चित झाल्यानंतर आता या नुकसानीस जबाबदार कोण? याची निश्‍चिती केली जात आहे. बार्शीचे भाजप पुरस्कृत अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हा बँकेच्या आर्थिक नुकसानीसंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील निर्णयानुसार सहा महिन्यांमध्ये आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्याचे आदेश दिलेले आहेत.

Solapur DCC bank
Solapur DCC Bank : माजी उपमुख्यमंत्री, तीन माजी मंत्री, १३ माजी आमदारांसह तीन विद्यमान आमदारांवर थकबाकीची जबाबदारी होणार निश्चित

सहकार कायदा कलम ८८ अन्वये या नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्यासाठी पुण्याचे विभागीय सहनिबंधक डॉ. संजयकुमार भोसले यांनी १८ एप्रिल २०२३ रोजी चौकशी अधिकारी म्हणून डॉ. किशोर तोष्णीवाल यांची नियुक्ती केली आहे. डॉ. तोष्णीवाल यांनी ३१ मार्च २०२३ अखेरची बँकेची आर्थिक स्थिती पाहून थकीत कर्ज प्रकरणी तत्कालीन संचालक व तत्कालीन अधिकारी/कर्मचारी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

Solapur DCC bank
Subhash Deshmukh challenge to Patole : सुभाष देशमुखांचं नाना पटोलेंना आव्हान; ‘माझी इमारत बेकायदेशीर असेल तर तत्काळ पाडा’

निवडणुका की बँकेचे शुध्दीकरण?

सोलापू्र जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्‍चित करण्याची कारवाई एकीकडे सुरू असताना दुसरीकडे जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक घ्यावी, यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. आगोदर निवडणुका की बँकेचे शुध्दीकरण? याचे मोठे कोडे जिल्हा बँकेच्या वर्तुळात पडले आहे. निवडणुका असो की जबाबदारी निश्‍चितीची कारवाई येत्या काळात या दोन्ही मुद्यांवर न्यायालयीन पातळीवर कायद्याचा प्रचंड किस पाडला जाण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com