Raju Shetti Breaking News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Raju Shetti News : " तुमची दिवाळी नाही तर माझीही नाही...", कारखान्यांविरोधात राजू शेट्टी दिवाळीपर्यंत मैदानातच बसणार

Swabhimani Shetkari Sanghatna Protest : ..तर स्वाभिमानी आणि कारखानदारांचा संघर्ष अटळ

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 परिषद आज जयसिंगपूर येथे पार पडली. दिवाळीच्या आत कारखानदारांनी 400 रुपये दिले नाही, तर तुमची दिवाळी साजरी होऊ देणार नाही. मीही दिवाळीला घरी जाणार नाही, अशी घोषणा करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारसह कारखानदारांवर हल्लाबोल केला आहे.

जोपर्यंत पैसे मिळत नाहीत, तोपर्यंत याच मैदानावर 15 नोव्हेंबरपर्यंत आंदोलनाला बसणार असल्याचा इशाराही शेट्टी यांनी दिला आहे. तसेच नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार न मिळाल्यास एकाही मंत्र्याला नीट फिरू देणार नसल्याचेही ते म्हणाले.

मराठा आंदोलनावेळी स्थगित केलेली यात्रा वगळता जवळपास 18 दिवसांची यात्रा करून जयसिंगपूर येथे ऊस परिषद पार पडली. (Swabhimani Shetkari Sanghatna) माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी राज्य सरकारवर टीकेची तोफ डागली. ते म्हणाले, कारखानदारांच्या ताटाखालील मांजर हे राज्य सरकार झालेले आहे. 22 दिवस उन्हातान्हातून चालतोय, पण सत्ताधारी आणि विरोधक यांना दखल घ्यावी वाटली नाही. याचा अर्थ शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कुणीही तयार नाही.

आता आपल्याला आपल्याच हिमतीवर पैसे मिळवावे लागतील. शेतकऱ्यांना बुडवायला एक होत असतील, तर पैसे मिळवण्यासाठी आपण एक व्हायला पाहिजे, अशी साद शेट्टी यांनी शेतकऱ्यांना घातली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

...त्यात मुश्रीफांचा समावेश

वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) सांगतात, शेट्टींची मागणी चुकीची आहे. मुश्रीफ यांच्याकडून आम्ही असली अपेक्षा केली नव्हती. मात्र, त्यांच्या या बोलण्याचा अर्थ असा की मंत्री मुश्रीफदेखील पैसे हाणणाऱ्यांपैकी एक झालेले आहेत, असा टोला शेट्टी यांनी लगावला.

आमदार प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर हे एकच माळेतील मनी आहेत. साखर उत्पादनचा नफा काय मिळाला. साखरेला किती दर मिळाला यांचे उत्तर द्यावे. तुमच्या कारखान्यावर आमची तीन माणसे कामावर घ्या. बघा तुमच्या कारखान्याची रिकव्हरी आपोआप वाढेल, असे शेट्टी यांनी सांगितले.

आमची दिवाळी झाली नाही, तर...

शेतकऱ्यांची दिवाळी जर साजरी झाली नाही, तर तुमचीही दिवाळी साजरी होऊ देणार नाही. शेट्टी जो निर्णय घेतात तोच निर्णय कारखानदारांना घ्यावा लागेल. जर कारखानदार मानत नसतील तर उसाचा कंडका घेऊन स्वाभिमानीचा हिसका दाखवला जाईल. जो दर जास्त देईल त्याला ऊस द्या. जो आमची दिवाळी साजरी करू देत नसेल, तर दिवाळीला त्यांच्या दारात स्वाभिमानी दिसेल, असा इशारा स्वाभिमानीचे नेते सावकार मादनाईक यांनी दिला.

522 किलोमीटरची आत्मक्लेश यात्रा

मागील हंगामातील थकीत 400 रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली शिरोळ येथून आत्मक्लेश यात्रा 17 ऑक्टोबरला सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तालुके, सांगली जिल्ह्यातील तालुक्यात अशी 522 किलोमीटरची ही पदयात्रा पार पडली. यात्रेदरम्यान, असणाऱ्या कारखाना प्रशासनासमोर ढोल वाजवून मागणी केली.

...तर स्वाभिमानी आणि कारखानदारांचा संघर्ष अटळ

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मागील हंगाम उर्वरित थकीत ४०० रुपये कारखानदारांनी शेतकऱ्यांना द्यावे, या मागणीसाठी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. शिवाय स्वाभिमानीने एफआरफी ठरवल्याशिवाय कारखानदारांनी ऊसतोड सुरू करू नये, अशी ही मागणी स्वाभिमानीची आहे.

त्यानंतर ऊसतोड सुरू केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी संघर्ष करत निषेध केला. ठिकठिकाणी जाळपोळ करण्यात आली. माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांना इशारा देत संघर्ष अटळ असल्याचे जाहीर केले. स्वाभिमानीची ऊस परिषद झाल्यानंतर कारखानदार आणि स्वाभिमानीचा संघर्ष आणखी तीव्र होण्याच्या मार्गावर आहे.

आंदोलन करण्याची वेळ नव्हे...

एकरकमी एफआरपी ही कोल्हापूर जिल्ह्यातील कारखाने पूर्ण देतात. दोन वेळा याबाबत बैठक घेण्यात आली आहे. गेल्या वर्षीची मागणी पूर्ण करता येणार नाही हे बैठकीत सांगितले आहे. राजू शेट्टी यांनीसुद्धा कारखान्यांना सहकार्य करायला हवे. आंदोलन करण्याची ही वेळ नव्हे. शासनाने ठरवलेली एफआरपी कोल्हापुरात एकरकमी दिली जाते.

को-जन, इथेनॉल परताव्यातील नफा दिला जातो. अस्तित्वात असलेल्या सर्व कायद्यांचे कारखान्यांकडून पालन केले जात असताना चारशे रुपये जादा देण्याची मागणी कितपत रास्त आहे, असा सवाल कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT