Chandrakant Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur Water Issue : ‘उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव; शेतीला आवर्तन नाहीच’

Vijaykumar Dudhale

Solapur News : उजनी धरणातील पाणीसाठा सध्या ‘मायनस’मध्ये गेला आहे, त्यामुळे शेतीला चौथं आवर्तन देताना खूप विचार करावा लागेल. धरणातील हे उर्वरीत पाणी जूनअखेरपर्यंत पिण्यासाठीच राखीव ठेवावं लागेल, असे सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. त्यामुळे येत्या काळात उजनीतून शेतीला पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे. (Water from Ujani Dam reserved for drinking only: Guardian Minister Chandrakant Patil)

राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज प्रजासत्ताकदिनानिमित्त सोलापुरात ध्वजवंदन करण्यात आले. त्यानंतर माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन, सोलापूरमधील दुष्काळी परिस्थिती याबाबत भाष्य केले. त्यावेळी त्यांनी उजनीच्या पाण्यासंदर्भात भाष्य केले. (Solapur Water Issue)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री पाटील म्हणाले, उजनी धरणात जेवढं पाणी आहे, तेवढं आपण जपून वापरत आहोत. उजनी धरण सध्या मायन्समध्ये गेले आहे. मात्र, जून अखेरपर्यंत पिण्यासाठी वापरल्यानंतरही मायनसमधील (या पाण्याला आतापर्यंत हात लावायला लागला नव्हता) पाणी आपल्याला पुरेल. सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनाही यातून चालतील, याबाबत माझ्या मनात शंका नाही.

गेल्या वर्षी पाऊस चांगला झाला होता. उजनी धरण ओव्हरफुल झालं होतं. त्यामुळे आपण गेल्या वर्षी सहा सहा आवर्तनं शेतीला दिली होती. मात्र, या वर्षी तिसऱ्या आवर्तनानंतर चौथं आवर्तन देण्यासाठी आपल्याला खूप विचार करावा लागेल. धरणातील अचल (मायनस) साठ्यातील पाणी शेतीला फार देता येणार नाही. प्राधान्याने ते पिण्यासाठी द्यावं लागेल. त्यामुळे उजनी धरणातील सध्याचे पाणी हे जून अखेरपर्यंत पिण्यासाठी राखीव ठेवावं लागेल, असेही चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केले. ते म्हणाले, मनोज जरांगे पाटील हे सध्या मुंबईच्या वेशीवर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत, त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे हे त्यांचं योग्य ते समाधान करतील, असा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला.

न्यायालय आणि पोलिस प्रशासनानेही मनोज जरांगे पाटील यांना काही सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आवाहन केलं आहे, ते योग्य निर्णय करतील, असं मला वाटतं, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT