Prashant Paricharak, Bhagirath Bhalke-Rahul Saha Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Pandharpur Politics : पंढरपुरात भाजप आमदाराविरोधात ठरणार ‘समविचारी’ स्ट्रॅटेजी; इच्छूक तीन नेते एकाच व्यासपीठावर!

Pandharpur-mangalvedha Assembly Constituency : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला भाजप आमदार समाधान आवताडे विरोधक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके आणि राहुल शहा यांची उपस्थिती असणार आहे.

Vijaykumar Dudhale

Solapur, 21 September : पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले तीन दिग्गज नेते आज एकाच व्यासपीठावर येत आहेत. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमाला भाजप आमदार समाधान आवताडे विरोधक असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक, भगीरथ भालके आणि राहुल शहा यांची उपस्थिती असणार आहे.

या कृतज्ञता मेळाव्यातून विधानसभा निवडणुकीची रणनीती ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘दामाजी’प्रमाणे समविचारीचा पर्याय पुढे येतो का? अथवा कोण कोणाला पाठिंब्याचे सूतोवाच करतो का हे पाहावे लागणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याला (Damaji Sugar Factory ) ‘एनसीडीसी’कडून सुमारे 94 कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिल्याबद्दल कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांचा कारखान्याच्या वतीने सत्कार करण्यात येणार आहे. तसेच शेतकरी मेळावाही होणार आहे.

या मेळाव्याला विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा विधानसभेसाठी रणशिंग फुंकलेले भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) हेही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय रतनचंद शहा अर्बन बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांचीही उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.

राहुल शहा यांनीही मंगळवेढा-पंढरपूरमधून विधानसभा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे उमेदवारीची मागणीही केली आहे. त्यामुळे पंढरपूरमधून विधानसभेसाठी इच्छुक असलेले हे तीनही नेते एकाच व्यासपीठावर येणार आहेत. ते काय बोलणार, विधानसभेबाबतची भूमिका काय असणार, यामुळे या कार्यक्रमाविषयी उत्सुकता वाढली आहे.

माजी आमदार प्रशांत परिचारक हे सध्या भाजपमध्ये असले तरी आमदार समाधान आवताडे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत. अगदी 40 हजारांची मते असणाऱ्याला उमेदवारी देऊन निवडून आणले, अशी जाहीर टीका त्यांनी अनेकदा केली आहे. निवडून आणल्यापासून आमच्या कार्यकर्त्यांना त्रास सुरू झाला,असेही त्यांनी आरोप केलेला आहे.

भगीरथ भालके यांचीही जन आशीर्वाद यात्रा सध्या मंगळवेढा तालुक्यात असून त्यांनीही आमदार समाधान आवताडे यांनाच लक्ष्य केलेले आहे. त्यामुळे विधानसभेसाठी इच्छूक असलेल्या या तिघांचे टार्गेट हे आमदार समाधान आवताडे हेच असणार आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकाच व्यासपीठावर येणारे हे नेते ‘दामाजी कारखान्या’प्रमाणे विधानसभा निवडणुकीप्रमाणे रणनीती आखणार का, अशी चर्चा मंगळवेढ्यात सुरु आहे.

काय होती दामाजी कारखान्याची रणनीती?

श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या ताब्यात होता. त्या निवडणुकीत परिचारक गटातील नेत्यांनी भगीरथ भालके यांच्याशी समझोता करत समविचारी आघाडीची स्थापना केली होती.

या समविचारी आघाडीने भाजपचे आमदार समाधान आवताडे यांच्या पॅनेलचा दणदणीत पराभव करत कारखान्यावर सत्ता प्रस्थापित केली होती. तेव्हापासून पंढरपुरात समविचारीचे वारे वाहत आहे. त्याच दृष्टिकोनातून आगामी विधानसभेसाठीही हा समविचारीचा पर्याय पडताळून पाहिले जाते का, या तिघांमधून एकच उमेदवार कोण ठरतो, याचे संकेत या कार्यक्रमातून मिळण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT