sanjay kaka patil suresh khade prithviraj deshmukh sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Lok Sabha Election 2024 : संजयकाका अन् देशमुखांबरोबर सुरेश खाडेंच्या नावाची चर्चा, मैदानात उतरणार? मंत्री म्हणाले...

Anil Kadam

लोकसभा निवडणुकीचे ( Lok Sabha Election 2024 ) बिगुल वाजणार असून, भाजपकडून सांगलीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. सांगलीसाठी विद्यमान खासदार संजयकाका पाटील ( Sanjay Kaka Patil ) आणि माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख ( Prithviraj Deshmukh ) यांच्यात उमेदवारीवरून चुरस आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राज्याचे कामगार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आले आहे. "मात्र, लोकसभेच्या निवडणुकीला इच्छुक नाही," अशी स्पष्टोक्ती पालकमंत्री सुरेश खाडे यांनी देत विधानसभेला इच्छुक असल्याचे सांगितले.

पुढील महिन्यापासून लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. सलग दोन वेळा भाजपने सांगली लोकसभा मतदारसंघ काबीज केला आहे. भाजपने हॅटट्रिक मारण्याची तयारी केली असताना विद्यमान खासदार संजयकाका यांना भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी आव्हान दिले आहे. खासदारांचे जिल्ह्यातील प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले. रांजनी ड्रायपोर्ट, कोल्हापूर विमानतळाचा प्रलंबित प्रश्न पुढे करीत पक्षातील नेत्यांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न पृथ्वीराज देशमुखांनी केला आहे. भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस असताना पालकमंत्री खाडेंचे नाव लोकसभेसाठी अचानक चर्चेत आले. त्यामुळे भाजपमध्ये तर्कवितर्कांना उधाण आले असताना खाडेंनी लोकसभेमध्ये रस नसल्याचे सांगून टाकले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पालकमंत्री खाडे म्हणाले, "माझ्या लोकसभा उमेदवारीबाबत नुसती चर्चा सुरू आहे. मागील पंधरा वर्षांपासून मिरज विधानसभा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे. सध्या मी राज्यात काम करीत आहे. त्यामुळे केंद्रात काम करण्याचा कोणताही विचार नाही. सध्याचे खासदारच उमेदवार असतील."

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भाजपमधील पक्ष प्रवेशाबाबत खाडेंनी प्रतिक्रिया दिली आहे. "मला याबद्दल कोणतीही माहिती नाही," असं खाडेंनी सांगितलं.

"मिरजमधील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलबाबतचा प्रस्ताव केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीया आणि केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांच्याकडे सादर केला आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी अंदाजे खर्च 366 कोटी 26 लाख 49 हजार रुपये आहे," अशी माहिती खाडेंनी दिली.

"रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मिरज-बेडग रस्त्यावर असणाऱ्या रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी 41 कोटी 34 लाख रुपये मंजूर करावेत, अशी विनंती केली आहे. म्हैसाळजवळील विजयनगर येथे विशेष बाब म्हणून आरोग्य उपकेंद्र मंजूर झाले आहे. ते जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून बांधण्यात येणार आहे. सांगलीतील आयटी पार्कसाठी 16 एकर जमीन लागते. त्यापैकी अर्धी जमीन ही खरेदी केली आहे. या पुढची कार्यवाही प्रशासन करीत आहे," असं खाडेंनी सांगितलं आहे.

"सांगली-मिरज रस्त्यावरील कृपामयी हॉस्पिटलजवळील रेल्वे ब्रिज रेल्वे प्रशासन 25 कोटी रुपये खर्च करून बांधणार होते. त्याबाबतचे पत्र त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. मात्र, त्या बदल्यात त्यांनी 25 कोटी रुपयांचा निधी जिल्हा प्रशासनाकडे मागितला. त्यावर मी हस्तक्षेप करून रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेतली आणि याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना सांगण्यास विनंती केली. सर्व 25 कोटी रुपयांचा निधी रेल्वेनं देऊन तेच दोन्ही पूल बांधतील. शिवाय हा रस्ता बंद न करता आत्ताच्या जुन्या पुलावरून पुलाला लागून दोन पदरी रस्ता व पूल तयार करण्यात येईल," असे पालकमंत्री खाडे यांनी सांगितले.


( Edited By : Akshay Sabale )

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT