Hasan Mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Hasan Mushrif : मुश्रीफांबाबत सस्पेन्स? पाटील-महाडिकांच्या नव्या राजकीय गट्टीमुळे 'सावधगिरी'

Kolhapur Politics : माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ‘गोकुळ’वरील सत्ता खालसा करण्यात मुश्रीफ यांनी सिंहाचा वाटा उचलला.

Rahul Gadkar

Kolhapur News : राज्यातील राजकीय समीकरणे बदलल्यानंतर जिल्ह्याच्या राजकारणात हाही आपलाच आणि तोही आपलाच या पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या वाटचालीमुळे त्यांची राजकीय भूमिकाच गुलदस्त्यात राहिली आहे.खासदार धनंजय महाडिक यांच्याशी त्यांच्या नव्या गट्टीने भविष्यातील राजकारण अडचणीचे ठरण्याची शक्यता आहे.

पण त्याचबरोबर अनेक सहकारी संस्थात सतेज पाटील यांच्याशी असलेले संधान कायम ठेवलेले आहे.जिल्ह्यातील राजकारणात सध्यातरी दोन्ही दगडावर हात अशीच भूमिका पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) घेतायेत की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्याचे प्रमुख सत्ताकेंद्र असलेल्या गोकुळसह जिल्हा बँक, बाजार समिती, शेतकरी संघ व अलिकडेच झालेल्या बिद्री साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस आमदार सतेज पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही. जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीतही हीच स्थिती आहे. त्याचबरोबर पालकमंत्री मुश्रीफ यांनी नुकताच आमदार सतीश पाटील यांच्यासोबत धर्मवीर संभाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकार्पण सोहळा पार पडला.

या सोहळ्याला महापालिकेकडून परवानगी नसली तरी सोहळा कोणाच्या मार्गदर्शनाने पार पडला हे जग जाहीर आहे. पण पोलिस दलाच्या नव्या वाहनांच्या लोकार्पण कार्यक्रमात महाडिक यांच्या मागे बसून मुश्रीफ यांनी बुलेट सवारी केली. त्यानंतर मी मुन्नांच्या (महाडिक) पाठीशी ठामपणे असल्याचे सांगून त्यांनी एकच खळबळ उडवली आहे. दुसरीकडे महाडिक यांच्या पाठीशी राहून ते आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांना दुखवतील का, हा खरा प्रश्‍न आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदार महादेवराव महाडिक यांची ‘गोकुळ’वरील सत्ता खालसा करण्यात मुश्रीफ यांनी सिंहाचा वाटा उचलला. आता खासदार महाडिक यांच्या पाठीशी राहून ते ‘गोकुळ’मध्ये परिवर्तन करू शकतील का? उद्या कोल्हापूर दक्षिणच्या निवडणुकीत त्यांना महाडिक कुटुंबातील उमेदवारांसाठी सभा घ्या म्हटले तर ते घेतील का? असे एक ना अनेक प्रश्‍न मुश्रीफ यांच्या नव्या गट्टीने निर्माण झाले आहेत.

यापूर्वीचा मुश्रीफ यांचा राजकीय प्रवासही अनिश्‍चित असाच राहिला आहे. ‘शरद पवार एके शरद पवार (Sharad Pawar) ’ म्हणणाऱ्या मुश्रीफ यांनी ऐनवेळी त्यांची साथ सोडली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भूमिकेचे समर्थन केले.यापूर्वी सदाशिवराव मंडलिक असतील किंवा विक्रमसिंह घाटगे यांच्याविषयीची त्यांचा अनुभव असाच राहिला आहे.त्यामुळे भविष्यात भाजपकडून जे सांगण्यात येईल, त्याच भूमिकेशी त्यांना बांधील राहावे लागेल.

महाडिकांशी संबंध चांगले गोकुळमध्ये महाडिक यांना विरोध म्हणून त्यांनी भूमिका घेतली असली तरी २०१४ च्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक ( Dhananjay Mahadik) यांना राष्ट्रवादीची उमेदवारी मिळवून देण्यापासून ते आमदार सतेज पाटील यांचा पाठिंबा मिळवून देण्यापर्यंत मुश्रीफ यांनी मोठी भूमिका बजावली. त्यामुळेच निकालानंतर महाडिक यांनीही त्यांना नतमस्तक होत अभिवादन केले होते. त्यानंतर या दोघांत राजकीय कलगीतुराही कधी रंगला नाही.

आजही महाडिक हे मुश्रीफ यांना आदराने नमस्कार करतात; पण हीच भूमिका कायम ठेवून त्यांना राजकारण करायचे झाल्यास आमदार सतेज पाटील यांच्याशी त्यांचा व्यवहार कसा असेल, याविषयी उत्सुकता आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT