Manoj Jarange Patil Agitation  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Maratha Reservation : मुंबईतील आंदोलनकर्त्यांचे हाल पाहून गावगाड्यातील मराठा कळवळा; कऱ्हाडमधून तब्बल ट्रकभर जेवणाचे साहित्य पाठविले!

Manoj Jarange Patil Agitation : आंदोलनासाठी गेलेल्या मराठा बांधवांची पहिल्या दिवशी खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल झाले. आंदोलनकर्त्यांना पाणीही मिळाले नाही. त्याची दखल मराठा समन्वय आणि गावगाड्यातील बांधवांनी घेतली.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 31 August : मनोज जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई सुरू केली आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी जरांगे यांनी शुक्रवारपासून (ता. 29 ऑगस्ट) मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. मात्र, आंदोलनाच्या पहिल्या दिवशी मुंबईत गेलेल्या मराठा आंदोलकांचे खाण्या पिण्याचे प्रचंड हाल झाले. ते पाहून गावगाड्यातील मराठा कळवळा आणि त्यांनी शनिवारी दिवसभर भाकरी चपातींसह जेवणाचे इतर साहित्य गोळा केला. सातारा जिल्ह्यातील कराडमधून तब्बल ट्रकभर जेवणाचे साहित्य शनिवारी रात्री उशिरा मुंबईकडे रवाना झाले आहे.

ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी जरांगे-पाटील हे शुक्रवारपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत. त्यांच्यासोबत मराठवाडा आणि महाराष्ट्राच्या इतर भागातून आलेले कार्यकर्तेही आझाद मैदानात आणि मुंबईत इतरत्र आंदोलनात सहभागी आहेत. सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड (Karad) तालुक्यातून मोठ्या प्रमाणात मराठा समाज बांधव जरांगे पाटील यांना समर्थन देण्यासाठी मुंबईत जात आहेत.

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) आणि आंदोलनकर्ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय मुंबई न सोडण्याचा निर्धार बोलून दाखवत आहेत. पण, आंदोलनासाठी गेलेल्या मराठा बांधवांची पहिल्या दिवशी खाण्या-पिण्याचे प्रचंड हाल झाले. आंदोलनकर्त्यांना पाणीही मिळाले नाही. त्याची दखल मराठा समन्वय आणि गावगाड्यातील बांधवांनी घेतली.

मराठा समन्वयकांनी कऱ्हाडमध्ये मदतीची हाक देताच कऱ्हाड शहरासह तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठा प्रतिसाद दिला. अनेक घरांमधून जेवणाचे साहित्य, भाकरी-चपाती, पाण्याच्या बाटल्या, पत्रावळ्या, द्रोणासह अन्य वस्तू आणून येथील दत्त चौकात थांबलेल्या मराठा बांधवांकडे जमा केल्या. कऱ्हाड शहरासह तालुक्यातील मराठा बांधवांनी तब्बल २५ हजारांवर भाकरी-चपात्या, पाण्याच्या बाटल्या, द्रोण-पत्रावळ्या, जेवणासाठी लागणारे साहित्य जमा केले. कऱ्हाडमधील दत्त चौकातून तब्बल ट्रकभर साहित्य शनिवारी रात्री मुंबईकडे रवाना झाले.

गणेश मंडळाने महाप्रसाद रद्द करून मराठा बांधवांना केली मदत

कऱ्हाड तालुक्यातील नारायणवाडी येथील दत्ताजी खुडे यांनी मुंबईत मराठा बांधवांसाठी जेवण जमा करण्याचे आवाहन आपल्या मोबाईलवर स्टेटस ठेवून केले होते. ते स्टेट्स पाहून गावातील हनुमान गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंडळाचा महाप्रसाद रद्द करुन ते साहित्य मराठा आंदोलनकर्त्याना देता येईल का, अशी विचारणा केली. खुडे यांनी मराठा समन्वयकांशी संपर्क साधून साहित्य देता येईल, असे सांगितले. नारायणवाडीच्या हनुमान गणेश मंडळाने महाप्रसाद रद्द करुन ते साहित्य आंदोलनकर्त्या मराठा बांधवांना देण्यात आले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT