Solapur, 18 November : महाविकास आघाडीमध्ये सोलापूर जिल्ह्यात अत्यंत कळीचा मतदारसंघ ठरलेल्या पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस या आघाडीतील दोन्ही खासदारांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्यासाठी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी ताकद लावली आहे, तर काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्यासाठी प्रणिती शिंदे ह्या पदर खेचून मैदानात उतरल्या आहेत, त्यामुळे दोन्ही उमेदवारांपेक्षा आघाडीतील दोन्ही खासदारांमध्ये लढाई दिसून येत आहे.
पंढरपूर विधानसभा मतदारसंघात (Pandharpur Assembly Constituency) महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून अनिल सावंत, तर काँग्रेसकडून भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. महायुतीकडून विद्यमान आमदार समाधान आवताडे हे दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत. याशिवाय, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिलीप धोत्रे हेही नशीब आजमावत आहेत.
वास्तविक महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) पंढरपुरात एक उमेदवार येणे अपेक्षित होते. मात्र, भगीरथ भालके यांची उमेदवारी काँग्रेसकडून जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसनेही पंढरपुरात अनिल सावंत यांना एबी फार्म दिला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून शरद पवारांना फसविणाऱ्यांना धडा शिकवा, असे आवाहन करत होते, त्यामुळे पंढरपुरात नेमकं कोणी कुणाला फसवलं, याची चर्चा निवडणूक संपेपर्यंत कायम आहे.
भगीरथ भालके यांच्या तिकिटासाठी खासदार प्रणिती शिंदे यांनी आपली ताकद पक्षनेतृत्वाकडे खर्च केली. हा जागा सोडवून घेण्यासाठी त्यांनी हायकमांडकडे धाव घेतली, त्यांना भालकेंची उमेदवारी कशी योग्य आहे, हे पटवून दिले आहे. मी माझी जबाबदारी पार पाडली आहे, आता जनतेने त्यांची जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही केले आहे.
भगीरथ भालकेंसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विश्वजित कदम, खासदार प्रणिती शिंदे या प्रमुख नेत्यांच्या सभा झाल्या, तर अनिल सावंत यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे आणि धैर्यशील मोहिते पाटील यांनी प्रचाराच्या सभा घेतल्या, त्यामुळे दोन्ही बाजूंकडून पुरेपूर ताकद लावण्यात आली आहे. त्यामुळे परिणाम काय येतो, हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
मागील पोटनिवडणुकीत भगीरथ भालके यांनी विद्यमान आमदार समाधान आवताडे यांचा जोरदार टक्कर दिली होती. त्या वेळी ३ हजार ७३३ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. मात्र, त्या वेळी राष्ट्रवादी एकसंघ होती. शिवाय मनसेचे उमेदवार दिलीप धोत्रे हेही भालकेंसोबत होते. मात्र, या वेळी ते स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
याशिवाय माजी नगराध्यक्ष आणि काही माजी नगरसेवकांनीही भाकलेंची साथ सोडली आहे. मात्र, समविचारी परिवाराच्या माध्यमातून भालकेंनी मंगळवेढ्यात बेरीज केलेली आहे, तसेच, आमदार समाधान आवताडेंचे काका बबनराव आवताडे यांनी भालकेंना पाठिंबा दिलेला आहे, त्यामुळे मंगळवेढ्यात भालकेंची ताकद वाढली आहे. पोटनिवडणुकीत बबनराव आवताडेंचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांनी २ हजार ९५५ मते घेतली होती. त्यामुळे ही मते भालकेंसाठी जमेची ठरणार आहे.
दरम्यान, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अनिल सावंत यांच्यासाठी पणाला लावली आहे. त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. पवारांचा विश्वासघात करणाऱ्याला धडा शिकवा, हे वारंवार ठासवले आाहे. मात्र, सावंत कुटुंबातील फूट अनिल सावंतांना कुठे नेणार, हे निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे, प्रणिती शिंदे यांनीही भालके यांच्यासाठी मतदारसंघात सभा घेतल्या आहेत. आपली लढाई भाजपशी आहे, बाकीच्या आपल्या खिजगणीलाही नाहीत, असा टोला लगावला होता, त्यामुळे पंढरपुरात महाविकास आघाडीच्या दोन खासदारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.