Solapur DCC Bank & Leader Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Solapur DCC Bank : मोहिते पाटील, शिंदे बंधूंसह सोलापुरातील दिग्गज नेते अडचणीत; डीसीसीच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित

Solapur Political News : ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूर जिल्ह्यातील हे बडे नेते अडचणीत आले आहेत. यातील तीन नेते हे सध्या निवडणूक लढवत आहेत, या कारवाईचा त्यांना किती फटका बसू शकतो, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

प्रमोद बोडके

Solapur, 09 November : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणाला जबाबदार धरून मोहिते पाटील, शिंदे बंधू, राजन पाटील या मातब्बर नेत्यांसह 35 जणांवर सुमारे 238 कोटी 44 लाख रुपये नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ज्या नेत्यांचा मृत्यू झाला आहे, त्यांच्या वारसांना जबाबदार धरण्यात आले आहे, त्यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत सोलापूर जिल्ह्यातील हे बडे नेते अडचणीत आले आहेत. यातील तीन नेते हे सध्या निवडणूक लढवत आहेत, या कारवाईचा त्यांना किती फटका बसू शकतो, हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील (Solapur DCC Bank) गैरवहारप्रकरणी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी सहकार विभाग आणि रिझर्व्ह बँकेकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने सहकारी विभागाने तीन सदस्य चौकशी समिती नेमली होती. त्या समितीने केलेल्या चौकशीत तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले होते.

राज्य सरकारकडून त्यावर कारवाई होत नसल्याने आमदार राजेंद्र राऊत (Rajendra Raut)हे उच्च न्यायालयात गेले होते. त्यानुसार झालेल्या आदेशाप्रमाणे चौकशी करून संबंधित 35 जणांवर बँकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

विभागीय सहनिबंधक योगीराज सुर्वे यांच्याकडे चौकशी अधिकारी किशोर तोष्णीवाल यांनी अहवाल सादर केला आहे. त्या अहवालानुसार माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील (Vijayshinh Mohite Patil), माजी मंत्री दिलीप सोपल, आमदार बबनराव शिंदे, आमदार संजय शिंदे, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार दीपक साळुंखे, माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार दिलीप माने, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार सिद्रामाप्पा पाटील या दिग्गज नेत्यांचा समावेश आहे.

जिल्हा बॅंकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित झालेल्या नेत्यांपैकी आमदार संजय शिंदे, माजी मंत्री दिलीप सोपल आणि माजी आमदार दीपक साळुंखे हे सध्या निवडणूक लढवीत आहेत. याशिवाय आमदार बबनराव शिंदे यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे आणि मकाई कारखान्याच्या अध्यक्षा रश्मी बागल यांचे बंधू दिग्विजय बागल हे निवडणूक लढवीत आहेत, त्यामुळे सोलापूर जिल्ह्याची सूत्रे हलवणाऱ्या नेत्यांवर जिल्हा बँकेच्या नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील दिग्गज नेत्यांसह बँकेचे काही माजी संचालक, अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरही बँकेच्या नुकसानीची जबाबदारी टाकण्यात आलेले आहे. जिल्हा बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी ज्या नेत्यांवर जबाबदारी निश्चित करण्यात आलेली आहे, त्यांच्याकडून नुकसानीची रक्कम वसूल होणार का, हा खरा प्रश्न आहे. विधानसभा निवडणुकीचा या वसुलीच्या प्रक्रियेवर काही परिणाम होऊ शकतो काय, याची उत्सुकता असणार आहे.

मोहिते पाटील आणि शिंदे कुटुंबीय यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेतेमंडळी सध्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीत गुंतलेले आहेत. त्या त्याचा परिणाम विधानसभा निवडणुकीच्या निकालावर होऊ शकतो का, याचीही उत्सुकता लागली आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT