Women's Spinning Mill Election Result  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sangola Politics : शहाजीबापूंना धक्का; महिला सूत गिरणीच्या निवडणुकीत शेकापची बाजी, २१ जागांवर विजय

Women's Spinning Mill Election Result : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गटाला हा धक्का मानला जात आहे.

दत्तात्रय खंडागळे

Sangola News : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सांगोल्यात आमदार शहाजी पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. तालुक्यातील शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीच्या निवडणुकीत माजी आमदार (स्व.) गणपतराव देशमुख यांचे नातू डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाने पाटील यांच्या पॅनेलला धोबीपछाड देत सर्व २१ जागांवर वर्चस्व मिळविले आहे. आमदार पाटील यांच्या पॅनेलला एकही जागा मिळालेली नाही, त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाटील गटाला धक्का मानला जात आहे. (Victory of PWP in Women's Spinning Mill Election's in Sangola)

दरम्यान, शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीच्या दोन जागा अगोदरच शेकापने बिनविरोध जिंकल्या होत्या. उर्वरित १९ जागांसाठी निवडणूक लागली होती. त्या १९ जागांवरही शेकापने एकहाती विजय मिळविला. या विजयामुळे विधानसभेच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला बळ मिळाल्याचे दिसून येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदार गणपतराव देशमुख यांच्या निधनानंतर शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीची पहिलीच निवडणूक होती. या सूत गिरणीचे सभासद हे सोलापूर, सांगली, सातारा, लातूर, पुणे जिल्ह्यातही आहेत. या सूत गिरणीच्या निवडणुकीत आमदार शहाजी पाटील आणि डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलमध्ये दुरंगी लढत झाली. सुरुवातीला बिनविरोध करण्यासाठी हालचाली झाल्या, परंतु ही निवडणूक बिनविरोध होऊ शकली नाही.

डॉ. देशमुख यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी कामगार पक्षाच्या शेतकरी महिला विकास आघाडी पॅनेलला आमदार शहाजी पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सूत गिरणी बचाव पॅनेलने आव्हान दिले होते. सूत गिरणी रविवारी (ता. ७ जानेवारी) झालेल्या निवडणुकीत २ हजार ३९० मतदारांपैकी एक हजार ६३६ मतदारांनी मतदान केले होते. मतमोजणीनंतर डॉ. देशमुख यांचे पॅनेल मोठ्या फरकाने निवडून आले. या निवडणुकीत आमदार शहाजीबापू पाटील गटाचा पराभव झाला.

शेतकरी महिला सहकारी वस्त्रनिर्माण सूत गिरणीच्या निवडणुकीत कापूस उत्पादक गटातून (११ जागा) वंदना बाबर (८०१), शुभांगी पाटील (८०१), शालन हजारे (७९३), शोभा रसाळ (७९३), उज्ज्वला वाघमोडे (७९३), विमल बंडगर (७८९), शबाब खतीब (७८९), मालन पाटील (७८७), सुरेखा मदने (७८५), छाया कोळेकर (७७५), मायाक्का यमगर (७७५) या विजयी झाल्या.

बिगर कापूस उत्पादक गटातून (पाच जागा) प्रतिभा ढोबळे (२६८), नम्रता जोशी (२६७), द्रोपदी भगत (२६३), गोकुळाबाई मिसाळ (२६१), आनंदीबाई रूपनर (२६०) या विजयी झाल्या. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून स्मिता बनसोडे (११४१), रतन बनसोडे (११५६) या विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय प्रतिनिधी गटातून राजश्री जाधव (११६०) विजयी झाल्या. संस्था प्रतिनिधी महिला मतदारसंघात उषा देशमुख आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती विशेष मागास महिला प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघात कल्पना शिंगाडे यांची बिनविरोध निवड झाली होती.

महिला मतदार आणि कार्यकर्त्यांचे हे यश : डॉ. बाबासाहेब देशमुख

आम्ही महिला सूत गिरणीची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. मात्र, त्यात आम्हाला यश मिळू शकले नाही. (स्व.) आबासाहेबांनी (गणपतराव देशमुख) उभारलेल्या संस्था चांगल्या पद्धतीने चालवणे आमचे कर्तव्य आहे. विरोधकांच्या अपप्रचाराला मतदार भुलले नाहीत. महिला मतदार व पक्षाच्या कार्यकर्त्यांचे हे यश आहे, असे शेतकरी कामगार पक्षाच्या पुरोगामी युवक संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगितले.

Edited By : Vijay Dudhale

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT