Purushottam Jadhav, Madan Bhosale, Nitin Patil Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Satara Loksabha : वाई - महाबळेश्वर - खंडाळ्यात दिसणार महायुतीची एकजूट ?

Amol Sutar

Satara Loksabha : वाई - महाबळेश्वर - खंडाळा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व कायम आहे. आमदार मकरंद पाटील यांनी या मतदारसंघात आपली ताकद वाढवली आहे, तर विरोधी भाजपचे नेते मदन भोसले यांनी पक्षाच्या कार्यकारिणीच्यानिमित्ताने मतदारसंघात संपर्क वाढविला आहे.

या मतदारसंघातील राष्ट्रवादीचे नेते व जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हे दोघे लोकसभेसाठी इच्छुकांच्या यादीत आहेत. दोघेही महायुतीत असल्याने या दोघांचीही अडचण झाली आहे. नितीन पाटील यांच्यासाठी हा मतदारसंघ अजित पवार मागत आहेत, तर पुरुषोत्तम जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी ताकद लावली आहे.

त्यामुळे वाई - महाबळेश्वर - खंडाळा मतदारसंघातील कोणाला लोकसभेची उमेदवारी मिळणार, याचीच चर्चा आहे. या विधानसभा मतदारसंघांत सातारा लोकसभा निवडणुकीच्यानिमित्ताने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू झाल्या आहेत. या मतदारसंघातील दोघे जण लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यामुळे या दोघांपैकी एकाला भाजपच्या उमेदवाराशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या मतदारसंघात राष्ट्रवादीचे प्राबल्य असून, आमदार मकरंद पाटील हे सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार गटात आहेत. हा गट शिंदे, फडणवीस सरकारसोबत राज्याच्या सत्तेत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते मदन भोसले यांनी सध्या पक्षाच्या कार्यकारिणीच्या निवडीनिमित्ताने मतदारसंघात संपर्क ठेवला आहे. ते सध्या त्यांची मुलगी डॉ. सुरभी भोसले यांचे या मतदारसंघात बस्तान बसविण्याच्या प्रयत्नात आहेत.

शिंदे गट शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव हे खंडाळ्यातील असून ते यावेळेस सातारा लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उमेदवारीसाठी ताकद लावली आहे. तसेच शिवसेनेलाच यावेळेस हा मतदारसंघ सोडावा, अशी आग्रही मागणी ते करीत आहेत. त्यामध्ये त्यांना कितपत यश येणार, हे आगामी काळात दिसून येणार आहे.

त्यांनी आतापासूनच संपर्कास सुरुवात केली असून शिंदे गट शिवसेनेचे पदाधिकारी निवडी व संघटनाबांधणीवर जोर दिला आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष नितीन पाटील हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी सातारा लोकसभा मतदारसंघ अजित पवारांना हवा आहे; पण महायुतीत अद्याप याबाबत एकमत झालेले नाही.

नितीन पाटील यांनी आतापासून सातारा लोकसभेत समाविष्ट असलेल्या विधानसभा मतदारसंघात पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संपर्क करून लोकांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात केली आहे. या मतदारसंघात त्यांचे बंधू मकरंद पाटील हे आमदार असल्याने येथून नितीन पाटील यांना लोकसभेला चांगले मताधिक्य मिळू शकते.

महाविकास आघाडीचा उमेदवार कोण ?

सातारा लोकसभेच्या निवडणुकीच्यानिमित्ताने वाई - महाबळेश्वर - खंडाळा विधानसभा मतदारसंघात जोरदार हालचाली सुरू असून, दोन इच्छुकांपैकी कोणाच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडणार, याचीच सध्या या मतदारसंघात चर्चा आहे. वाई मतदारसंघात महाविकास आघाडी, तसेच इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या आहेत; पण पुढे काहीच हालचाली झालेल्या नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीतील घटकपक्षांपुढे लोकसभेला आघाडीचा उमेदवार कोण, याचे औत्सुक्य आहे.

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT