Assembly Election Result  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

South Maharashtra Politic's : महायुतीच्या झंझावातात सोलापूरने आघाडीला तारले

Assembly Election Result 2024 : दक्षिण महाराष्ट्रात महायुतीने २९ पैकी २० जागांवर यश मिळविले आहे. महाविकास आघाडीला ९ जागांपर्यंत मागे ढकलण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने ‘व्हाइट वॉश’ देत दहापैकी दहा जागांवर ‘न भूतो न भविष्यती’ यश मिळविले. सोलापुरात मात्र महाविकास आघाडीला सहा जागा मिळाल्या.

शेखर जोशी

Maharashtra Political News : दक्षिण महाराष्ट्रात महायुतीने २९ पैकी २० जागांवर यश मिळविले आहे. महाविकास आघाडीला ९ जागांपर्यंत मागे ढकलण्यात यश आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने ‘व्हाइट वॉश’ देत दहापैकी दहा जागांवर ‘न भूतो न भविष्यती’ यश मिळविले. सोलापुरात मात्र महाविकास आघाडीला सहा जागा मिळाल्या. येथे शेकापसह महायुतीला पाच जागांवर रोखण्यात यश आले. कोल्हापूर, सांगलीत लाडकी बहीण योजना, हिंदुत्वाची सुप्त लाट महत्वाची ठरली, तर सोलापूर जिल्ह्यात पवारांची जुळजाजुळव निर्णायक ठरली.

राज्यातील पक्षफुटीनंतर दक्षिण महाराष्ट्रातील (South Maharashtra) समीकरण १८० अंशाच्या कोनात बदलले होते. विशेषतः सोलापूर जिल्ह्यात मोठा फेरबदल झाला होता. कोल्हापूर जिल्ह्यातही हवा बदलली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने महाविकास आघाडीला बळ दिले, मात्र ते वारे या निवडणुकीत टिकले नाही. त्या मुद्द्यांच्या पलिकडे निवडणूक गेली.

व्यक्तिगत लाभाची लाडकी बहीण योजना आणि ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक है तो सेफ है’ ही घोषणा सुप्तपणे चर्चेत राहिली. मराठा आरक्षणा आंदोलनाची लाट महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फायद्याची ठरली नाही. मात्र, त्याविरोधात ‘ओबीसीं’ना विश्वासात घेण्यात महायुतीला यश आले, असेच निकाल सांगतो आहे.

कोल्हापूरमध्ये प्रचंड यश

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीने (Mahayuti) प्रचंड यश मिळवले. दहाच्या दहा जागांवर विजय साकारत बेरजेच्या राजकारण यशस्वी करून दाखवले. अगदी सहानुभूतीची लाट असताना करवीरमध्ये राहुल पी. एन. पाटील यांचा पराभव धक्कादायक ठरला. सतेज पाटलांचे प्रभावक्षेत्र असलेल्या कोल्हापूर दक्षिणमध्ये ऋतुराज पाटील यांना पराभवाचा धक्का बसला. त्यामुळे अन्य निकालांचे वेगळे विश्लेषण करण्याची गरजच नाही. हाच कल जिल्हाभर दिसला.

महाडिक, आवाडे, कोरे, यड्रावकर, क्षीरसागर या प्रमुख मंडळींनी अत्यंत नियोजनपूर्वक रचना केल्याचे लक्षात येते. संभाजीराजे छत्रपती आणि राजू शेट्टी यांच्या तिसऱ्या आघाडीचा फटकाही महाविकास आघाडीला बसला.

सांगलीत पाच जागांवर युती

सांगली जिल्ह्यात महायुतीने आठपैकी पाच जागांवर यश मिळवले. सांगली, मिरज, जत, खानापूर आणि शिराळा या पाच मतदारसंघांत मोठे यश मिळवले. महाविकास आघाडीचे शिलेदार जयंत पाटील, विश्वजित कदम यांना गड राखण्यात यश आले. तर आर. आर. पाटील यांचा मुलगा रोहितने वादळात दिवा तेवता ठेवून राज्यातील सर्वात तरूण आमदार होण्याचा मान मिळवला.

संस्थात्मक जाळे, बेरजेचे राजकारण आणि सहानुभूती ही या तिघांच्या जमेच्या बाजू ठरल्या. तरीही जयंत पाटील यांचे मताधिक्य फक्त १३ हजारांपर्यंत घसरले आणि या प्रभावशाली नेत्याला येथे धक्का बसू शकतो, याची पहिल्यांदा विरोधकांनही जाणीव झाली.

महायुतीने पद्धतशीरपणे सांगलीत रचना केली. येथे इस्लामपूर आणि तासगाव मतदारसंघांत त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निशिकांत पाटील आणि संजय पाटील यांना उतरवले. सांगली शहरात काँग्रेसची बंडखोरी पायावर धोंडा मारून घेणारी ठरली. येथे भाजपचे सुधीर गाडगीळ यांनी ‘हॅटट्रिक’ नोंदवली.

जतमध्ये जातीय समीकरणांत काँग्रेस फसली. आटपाडीतून जतमध्ये गेलेल्या पडळकरांनी धनगर मतांची बेरीज केलीच, शिवाय लिंगायत मतांचे ध्रुवीकरण टाळण्यात यश मिळवले. त्यातून धनगर समाजाच्या मतांचे नवे समीकरण पुढे आले. शिराळ्याच्या डोंगरी भागातील महिलांनी 'लाडकी बहीण'ला उचलून धरलेच, तेथील बंड रोखण्यात भाजपला आलेले यश महत्त्वाचे ठरले.

शरद पवारांचा प्रभाव

सोलापूर जिल्ह्यात महायुतीने पाच, तर महाआघाडीने सहा जागांवर यश मिळवले. शरद पवार यांचा सोलापूर जिल्ह्यातील प्रभाव कायम राहिला. तेथे त्यांच्या ‘राष्ट्रवादी’ला चार, ठाकरेच्या शिवसेनेला एक, तर शेकापला एक जागा मिळाली. पक्षफुटीनंतर महायुतीकडे दहा जागा होत्या. तर फक्त प्रणिती शिंदे एकमेव आमदार आघाडीकडे होत्या. तेथे बाजी पलटवण्यात पवारांना यश आले. मोहिते पाटलांची मदत महत्वाची ठरली.

भाजपचे सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, सचिन कल्याणशेट्टी यांनी आपला गड राखला. अभिजित पाटील, राजू खरे असे नव्या दमाचे शिलेदार पवारांनी मैदानात उतरवले. नारायण पाटील, उत्तमराव जानकर यांना बेरजेच्या राजकारणाने तारले. राज्यभर वाताहत होत असताना सोलापूर जिल्ह्याने मात्र शरद पवारांना हात दिला.

ठळक मुद्दे

  • सांगली, कोल्हापुरात महायुती सुसाट

  • आघाडीला सोलापूरने तारले

  • काँग्रेससह आघाडी ‘बॅकफूट’वर, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शिलेदार तरले

  • कोल्हापुरात सतेज पाटील यांच्या वर्चस्वाला धक्का, महाडिक यांचे वर्चस्व वाढणार

  • कोल्हापूर जिल्ह्यात भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि विनय कोरेंचा नवा पॅटर्न?

  • तीनही जिल्ह्यांत ठाकरेंच्या शिवसेनेची पीछेहाट

  • शेकापने  गड  परत  मिळवला

    Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT