Nilima Nikam News : थापलिंग येथील विरोधकांच्या मेळाव्यातील कथित विधानावरून आंबेगाव पुन्हा एकदा राजकीय वाद रंगला आहे. माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा यांनी केलेल्या भावनिक पोस्टला देवदत्त निकम यांच्या कन्या निलिमा निकम यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे.
तुम्ही पोसलेल्या गावगुंडांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या माझ्या बापाला ढकललं, तेव्हा तुम्ही स्वतः कौतुकाने त्याची व्हिडिओ काढत होतात आणि डीजेवर ठेका धरला होता. तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला, असा सवाल निलिमा निकम यांनी केला आहे.
निलिमा निकम यांनी म्हटले आहे की, अहो मोठ्ठ्या ताई...! आज तुम्हाला बाप आठवलाच आहे म्हणून... तुम्ही पोसलेल्या गावगुंडांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या सभेत शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या माझ्या बापाला ढकललं तेव्हा तुम्ही स्वतः कौतुकाने त्याची व्हिडिओ काढत होतात आणि डीजेवर ठेका धरला होता. तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला?
शेतकरी संघटनेचा गावगाड्यातला एक साधा कार्यकर्ता पिंपळगावचा प्रभाकर बांगर, तुमच्याच इशाऱ्यावरून तुम्ही पोसलेल्या गावगुंडांनी प्रभाकर बांगर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. रक्तबंबाळ होईपर्यंत त्यांना मारलं...
तो कार्यकर्ता प्रभाकर बांगरही कुणाचा तरी बाप होता...तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला, असा सवालही निकम यांनी पूर्वा वळसेंना विचारला आहे.
त्या म्हणाल्या, ऑगस्ट महिन्यात आदिवासी लेकरांच्या दुधात अळ्या सापडल्या. आदिवासीं मुलांच्या जेवणात आळ्या निघाल्या त्याच्यावर कारवाई करायची सोडून तुम्ही आवाज उठवणाऱ्यांवरच गुन्हे दाखल केले. आपल्या मुलांना अळ्यांचे दूध प्यावे लागते, जेवण जेवावे लागते हे बघून त्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या बापाची काय ओ हालत झाली असेल. तिथं नाही का तुम्हाला बाप आठवला...
तुम्ही देवदत्त निकम यांना (माझ्या वडिलांना) एका खोट्या आरोपात अडकवण्यासाठी तुमचे वडील 5 मे 2024 रोजी प्रयत्नांची पराकाष्टा करत होते. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव आणत होते. मंचर पोलिस स्टेशन येथे मोर्चा काढून माझ्या वडिलांच्या नावाने नको नको ते फ्लेक्स फडकावले. तिथं माझा बाप एकटा तुमच्या कटकारस्थानाविरोधात लढत होता. तेव्हा नाही का हो तुम्हाला बाप आठवला, असा सवाल निलिमा यांनी विचारला आहे.
निलिमा निकम म्हणाल्या, घरातील देव्हाऱ्यात जो फोटो माझ्या वडिलांनी वळसे पाटीलसाहेब यांचा 25 वर्ष लावला होता तो फोटो ज्या दिवशी तूम्ही सर्वांनी माझ्या वडिलांना जेल मध्ये घालण्यासाठी जे प्रयत्न केले ते पाहून आमच्या घरच्या सगळ्या लोकांच्या विचाराने तो फोटो आम्ही उतरवला. माझ्या वडिलांना जेल मध्ये घालण्याचे जे प्रयत्न तूम्ही सगळे करत होतात ते पाहून मला काय वाटल असेल, याचा विचार तुम्ही कधी केलाय का? आणि चुकून त्या दिवशी तूम्ही त्या डावात यशस्वी झाल्या असत्या तर, आमच्या कुटुंबाचं काय झाल असतं. एक मुलगी म्हणून मला जे दुःख झालं असत त्याचा विचार केलाय का तुम्ही कधी? तिथं नाही का हो तुम्हाला बाप आठवला?
उगाच राईचा पर्वत करू नका, आज पर्यंत माझ्या वडिलांनी एकदाही वळसे पाटील साहेब, स्वतः तुमच्यावर आणि किरणताईंवर कोणतीच व्यक्तिगत टीका केली नाही, हे सारा आंबेगाव शिरूर जाणतो. तुम्ही मात्र माझ्या बापाच्या बदनामीसाठी किती खालच्या थराला गेला होता, हे आठवा. असे उत्तर निलिमा निकम यांनी पूर्वा वळसेंना दिले आहे.
त्या म्हणाल्या, तुमच्या वडिलांना (वळसे पाटलांना) हृदयविकाराचा धक्का आला भीमाशंकर कारखान्याच्या गेस्ट हाऊसला, तुमच्या आधी तिथं माझा बाप देवदत्त निकम हजर होता. ॲम्बुलन्सपासून हॉस्पिटलपर्यंत सगळं नियोजन एकटा करत होता. तुम्ही तिथं किती तासानंतर अवतरल्या ते आठवा..!
तुम्ही आभार सभेतील माझ्या वडिलांचं भाषण स्वतः ऐकल असत तर तुम्हाला समजलं असतं ते असं कधीच म्हणाले नव्हतेच. त्याची लिंक तुम्हाला पाठवत आहे नक्की ऐका आणि माझे वडील असं कुठे बोलले आहेत त्याची लिंक तुमच्याकडे असेल तर नक्की पाठवा. तुमच्या बाबांनी स्वतः कबूल केलं आहे की, ते देवदत्त निकम यांच्या पिपाणीमुळे आमदार झाले आहेत. त्यामुळे तुम्ही हे सहानुभूतीच राजकारण बंद करा, असा सल्लाही निलिमा निकम यांनी पूर्वा वळसे पाटील यांना दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.