Prashant Paricharak Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Prashant Paricharak : प्रशांत परिचारकरांच्या मनात तरी काय...तुतारीचा आग्रह मान्य करणार का?

Vijaykumar Dudhale

Solapur, 12 October : पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून तुतारीची उमेदवारी मिळावी, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे इच्छुकांची गर्दी असतानाही पक्षाचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यावर लक्ष आहे. प्रशांत परिचारक हे तुतारी चिन्हावर विधानसभेच्या रिंगणात उतरू शकतात का, याची चाचपणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुरू असल्याची माहिती आहे, त्यामुळे एकीकडे तुतारीच्या उमेदवारीसाठी डझनभर इच्छुक असताना राष्ट्रवादी मात्र तुल्यबळ उमेदवाराच्या शोधात असल्याचे दिसून येत आहे.

राष्ट्रवादीकडून सिग्नल मिळूनही प्रशांत परिचारक मात्र अजूनही ‘वेट आणि वॉच’च्या भूमिकेत आहेत, त्यामुळे त्यांच्या मनात सध्या काय सुरू आहे, याची चर्चा सोलापूरच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातून (Pandharpur-Mangalvedha Constituency) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून भगीरथ भालके, भैरवनाथ शुगर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अनिल सावंत, पंढरपूरचे माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंतराव देशमुख, रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा शहराध्यक्ष चंद्रशेखर कोंडुभैरी, तालुकाध्यक्ष प्रथमेश पाटील यांनीही निवडणूक लढवण्याची इच्छा दर्शवली आहे. मात्र भगीरथ भालके, अनिल सावंत, वसंतराव देशमुख, नागेश भोसले यांचे दावेदारी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

शरद पवारांकडून पंढरपूर-मंगळवेढ्यात वेगळेच डावपेच आखले जात असल्याची चर्चा आहे. या मतदारसंघातील महत्त्वपूर्ण चेहरा असलेले माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) यांना गळाला लावण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न असल्याची चर्चा रंगली आहे.

मात्र, परिचारक हे अजूनही ‘वेट आणि वॉच’च्या भूमिकेत आहेत. वास्तविक समर्थकांकडून त्यांच्यावर राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मोठा दबाव आहे. त्यामुळे परिचारक हे कार्यकर्त्यांचा आग्रह मान्य करणार की निष्ठा जपत भाजपमध्येच राहणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

भारतीय जनता पक्षाकडून विधानसभा निवडणुकीत आपल्यावर अन्याय होणार नाही. आपल्याला यावेळी पक्षाकडून तिकीट मिळेल, असा विश्वास प्रशांत परिचारक यांना असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंगळवेढ्यातील दौऱ्यात गैरहजर राहिलेले परिचारक यांनी अक्कलकोटमधील फडणवीसांच्या कार्यक्रमाला मात्र आवर्जून हजेरी लावली.

प्रशांत परिचारक यांचे मन अजूनही भाजपमध्येच गुंतल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून प्रयत्न सुरू असूनही परिचारक मात्र दाद लागू द्यायला तयार नाहीत, अशी सध्याची परिस्थिती आहे.

पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात सध्या भाजपचे समाधान आवताडे आमदार आहेत. मागील पोटनिवडणुकीत प्रशांत परिचारक यांना थांबवून आवताडे यांना संधी देण्यात आली होती. विद्यमान आमदार असल्याने उमेदवारीसाठी आवताडेंची दावेदारीही मजबूत मानली जात आहे.

दुसरीकडे, प्रशांत परिचारक हे आता थांबण्याच्या भूमिकेत नाहीत, त्यामुळे भाजपकडून कोणाला संधी दिली जाते, यावरच पुढील राजकीय समीकरणे अवलंबून राहणार आहेत. भाजपकडून आवताडे यांना पुन्हा संधी दिली, तर प्रशांत परिचारक हे शांत राहणार की तुतारी हाती घेणार हेही भाजपचा उमेदवार जाहीर झाल्यानंतरच होणार आहे, त्यामुळे भाजपची उमेदवार यादी जाहीर होईपर्यंत परिचारक शांत राहतील, असा कयास लावला जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT