BJP MLA
BJP MLA Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Food Excellence Center : उठसूठ फडणवीसांना फोन करणारे भाजप आमदार अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत गप्प का?

सुदर्शन सुतार

Solapur News : सोलापूर येथील श्री अन्न उत्कृष्टता केंद्र बारामतीला स्थापन करण्याचे शासकीय परिपत्रक २४ नोव्हेंबर निघाले. त्यावर सुभाष देशमुख आणि सचिन कल्याणशेट्टी यांनी भूमिका मांडली. पण, जिल्ह्यात बारापैकी ११ आमदार हे सत्ताधारी आहेत. यातील भाजपचे आमदार हे उठसूठ छोट्या आंदोलनावेळीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन करतात. आता तर सोलापुरातील अख्खा प्रकल्प बारामतीला जात असताना हे आमदार फडणवीसांना फोन का करत नाहीत, असा सवाल सोलापूरची जनता विचारत आहे. (Why don't BJP MLAs call Fadnavis regarding shri Food Excellence Center?)

आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात सोलापूरसाठी श्री. अन्न उत्कृष्टता केंद्र मंजूर केले होते. कोरडवाहू जिल्हा म्हणून ओळख असलेल्या सोलापूरमध्ये भरडधान्यांतर्गत येणारी ज्वारी, बाजरी व इतर पिके घेतली जातात. जिल्ह्याची गरज ओळखून राज्य सरकारकडून सुमारे दोनशे कोटी रुपयांचे श्री. अन्न उत्कृष्टता केंद्र देण्यात आले होते.

अर्थसंकल्पात या केंद्राची घोषणा करण्यात आली होती. मात्र, त्याचे काम म्हणावे तेवढ्या प्रमाणात पुढे सरकले नव्हते. जागेचा प्रश्नही अजून सुटलेला नाही. त्यासाठी भाजपचे आमदार सुभाष देशमुख यांनी जागेचा पर्याय सुचविला होता. त्यापलीकडे कोणत्याही राजकीय नेत्याने या प्रकल्पासाठी रस दाखवला नव्हता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

श्री. अन्न उत्कृष्टता केंद्र हे बारामतीत होणार, असे परिपत्रक २४ नोव्हेंबर रोजी निघाले. तरीही सोलापूर लोकप्रतिनिधी शांतच होते. माध्यमात बातम्या आल्यावर त्यावर प्रतिक्रिया देताना सुभाष देशमुख यांनी राजीनामा देण्याची भाषा केली, तर भाजपचे जिल्हाध्यक्ष, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रकल्प नव्हे, तर कर्मचारी प्रशिक्षण केंद्र बारामतीत होत आहे, असे सांगितले. म्हणजे त्या प्रकरणावर ठोस विरोध कोणी केला नाही.

सोलापुरात सर्वसामान्यांकडून विरोधाची धार तीव्र होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्य केंद्र सोलापुरात होणार आहे, तो वेगळा प्रकल्प आहे, हा वेगळा प्रकल्प आहे, असे स्पष्टीकण दिले. मात्र, सरकारच्या पत्रकात तसा उल्लेख नाही, त्यामुळे अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत गोंधळाची परिस्थिती आहे. पण वस्तुस्थिती कोणीही पुढे आणायला तयार नाही.

भाजप आमदार मूग गिळून गप्प का?

काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे वगळता सोलापूर जिल्ह्यातील सर्व आमदार सत्ताधारी बाजूचे आहेत. विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राम सातपुते, समाधान आवताडे हे भाजपचे आमदार आहेत, तर राजेंद्र राऊत हे भाजपपुरस्कृत आमदार आहेत. रणजितसिंह मोहिते पाटील हे विधान परिषदेचे भाजप आमदार आहेत. अजित पवार गटाचे यशवंत माने, संजय शिंदे, बबनराव शिंदे हे आमदार आहेत. शहाजी पाटील हे शिंदे गटाचे आमदार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील १२ आमदारांपैकी ११ आमदार हे सत्ताधारी आहेत, तरीही कोणीच याबाबत जाब विचारू शकत नाही. एरवी उठसूठ फडणवीसांना फोन करणारे भाजपचे आमदार आणि नेते आता या अन्न उत्कृष्टता केंद्राबाबत उपमुख्यमंत्र्यांना फोन का करत नाहीत, असा सवाल उपस्थित होत आहे.

चंद्रकांतदादा म्हणतात, 'माहिती घेतो...'

अन्न उत्कृष्टता केंद्राचा विषय सोलापूरचे नवनिर्वाचित पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत पोचला आहे. त्यांना याबाबत माध्यम प्रतिनिधींनी विचारले त्यांनी नेहमीच्या शैलीत मी सध्या त्यावर अभ्यास करतो आहे. नेमके काय झाले आहे, याची माहिती घेतो आणि त्यानंतर बोलतो, असे सांगितले. चंद्रकांतदादांना या विषयाचे किती गांभीर्य हे यातून कळून चुकते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT