Mumbai News : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. दुसरीकडे महाविकास आघाडीचा सुपडासाफ झाला आहे. त्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार आले आहे. सरकार स्थापन करीत असताना महायुतीमधील भाजप, शिवसेना शिंदे गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये मुख्यमंत्री पद, खातेवाटप, बंगले आणि आता पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याची चर्चा असतानाच कोकण हा एकेकाळी उद्धव ठाकरेंचा बालेकिल्ला मानला जात होता या गडाला नुकत्याच झालेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत महायुतीने सुरुंग लावला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. त्यानंतर सत्तेवर आलेल्या महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात कोकणाला झुकतं माप मिळाल्यामुळे कोकणातील जनता खूष दिसत आहेत. त्यातच आता येत्या काळात कोकणावर कब्जा मिळवण्याचे भाजपाचे डावपेच स्पष्ट होत आहेत. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांपैकी रायगड जिल्ह्यात भाजपचे तीन आमदार असले तरी एकालाही मंत्रीपद मिळालेले नाही. त्याऐवजी अखेर शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांची वर्णी लागली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात भाजपाने उमेदवार दिला नव्हता. गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर रत्नागिरी जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील अखंडित शिवसेनेचे पाचपैकी चार आमदार होते. पण अडीच वर्षांपूर्वी झालेल्या राजकीय भूकंपात रत्नागिरीचे मंत्री उदय सामंत आणि आमदार योगेश कदम यांनी शिंदे गटाची वाट धरली. ठाकरे गटाचे माजी मंत्री भास्कर जाधव आणि राजन साळवी टिकून राहिले. या विधानसभा निवडणुकीत साळवींचा पराभव झाला. त्यामुळे आता जाधव एकाकी पडले आहेत. जिल्ह्यातील पाचवे आमदार अजितदादा पवार गटाचे शेखर निकम यांनी कडवी झुंज देत आपला गड शाबूत राखला आहे.
दुसरीकडे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे बंधू, तर रत्नागिरी जिल्ह्यात सामंत बंधुंचं प्रभावक्षेत्र वाढले आहे. मात्र रत्नागिरी जिल्ह्यात सामंतांना मागील अडीच वर्षांप्रमाणे मैदान मोकळं राहिलेलं नाही. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे चिरंजीव आमदार योगेश कदम यांनाही मंत्रिपद मिळाले आहे. या मंत्रिपदाच्या बळावर कदम पिता-पुत्र जिल्ह्याच्या उत्तर भागात पकड मजबूत करू शकतात. त्याचबरोबर, खासदार राणे आणि मंत्री नितेश हेसुद्धा यापुढील काळात रत्नागिरी जिल्ह्यात जास्त लक्ष घालणार, हे उघड आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे यांचे थोरले चिरंजीव निलेश राणे (Nilesh Rane) यांनी कुडाळमधून विधानसभेत प्रवेश केला आहे. शिवाय, विधानसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले धाकटे चिरंजीव नितेश यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद देऊन कोकणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचं आणि संवेदनशील असं मत्स्य व बंदरे हे खातं सोपवलं आहे. दुसरीकडे शिवसेनेचे माजी मंत्री दीपक केसरकर यांना मात्र मंत्रीपदाची संधी नाकारली आहे. त्यामुळे या जिल्ह्यात मध्यंतरीच्या काळात गमावलेली राजकीय ताकद या विधानसभा निवडणुकीनंतर राणे कुटुंबाने पुन्हा मिळवली आहे.
आमदार वैभव नाईक यांच्या रूपाने ठाकरे गटाचा एकमेव बुरुज शिल्लक होता. या निवडणुकीत तोही ढासळला आहे. त्यांच्यामागे गेल्या वर्षापासून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचा ससेमिराही लावलेला आहे. अशा परिस्थितीत त्यांच्यासह ठाकरेंचे इतर निष्ठावान सैनिक कितपत टिकाव धरतील, याबाबत शंका आहे. यापुढील काळात कोकणामध्ये महायुतीतील तीन घटक पक्षांमध्येच सत्ता स्पर्धा रंगणार आहे. त्यापैकी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं अस्तित्व रायगडात वजनदार नेते सुनील तटकरे व रत्नागिरी जिल्ह्यात आमदार निकम यांच्यामुळे आहे. राणेंमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात बलवान झालेल्या भाजपची रत्नागिरी जिल्ह्यात फारशी ताकद नसली तरी शिवसेनेच्या सामंत आणि कदम या दोन सत्ता केंद्रांमधील सुप्त स्पर्धेचा लाभ उठवत ते ती वाढवू शकतात.
त्याशिवाय, येत्या काळात ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी यांनाही गळाला लावण्याचे प्रयत्न भाजपाकडून (BJP) सुरू असल्याचे दिसत आहे. त्यात यश आले तर जिल्ह्यात ठाकरे गट आणखी दुबळा होणार आहे. याचबरोबर गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात अतिशय सक्रिय राहिलेले भाजपचे माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद सोपवले जाण्याची चर्चा आहे. त्यामुळे कोकणातील त्यांचा अनुभव आणि राजकीय कौशल्याचाही फायदा भाजपला या ठिकाणची पकड घट्ट करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे आता येत्या काळात भाजपची वर्चस्व मिळवण्यासाठी रणनीती यशस्वी होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.