Raj Thackeray kulbhushan jadhav Sarkarnama
महाराष्ट्र

Raj Thackeray : "सरकारनं नौदल अधिकाऱ्यांबाबत मुत्सद्देगिरी दाखवली; पण कुलभूषण जाधवांबाबत..."

Akshay Sabale

भारताला मोठा राजनैतिक विजय मिळाला आहे. कतारमध्ये हेरगिरीच्या आरोपात मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या सर्व आठ निवृत्त नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाली आहे. आठपैकी सात अधिकारी आज सोमवारी ( 12 फेब्रुवारी ) मायदेशी परतले आहेत. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी निवृत्त नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्याबाबतही इच्छा व्यक्त केली आहे.

"नौदल अधिकाऱ्यांबद्दल सरकारनं दाखवलेली मुत्सद्देगिरी कुलभूषण जाधव यांच्याबाबत पण दिसू दे आणि लवकरच भारताच्या भूमीवर त्यांचं आगमन होऊ दे ही इच्छा," असं राज ठाकरेंनी 'एक्स' ( पूर्वीचे ट्विटर ) अकाउंटवर म्हटलं आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राज ठाकरे म्हणाले, "कतारमध्ये भारतीय नौदलाच्या 8 अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करून फाशीची शिक्षा सुनावली होती. पण, भारत सरकारच्या मुत्सद्देगिरीने त्या सर्व अधिकाऱ्यांची सुटका झाली, याबद्दल सरकारचं अभिनंदन. आता अशीच मुत्सद्देगिरी कुलभूषण जाधव ह्यांच्याबाबत पण दिसू दे आणि लवकरच भारताच्या भूमीवर त्यांचं आगमन होऊ दे ही इच्छा!"

मृत्युदंडाचं नेमकं प्रकरण काय?

30 ऑगस्ट 2022 मध्ये भारतीय नौदलातील कतारस्थित आठ निवृत्त अधिकाऱ्यांना कतार प्रशासनाकडून रात्री अचानक अटक करण्यात आली. हे आठ निवृत्त नौदल अधिकारी कतार येथील दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी अँड कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीत नोकरी करत होते. 30 ऑगस्टच्या रात्री काही काम असल्याचं सागून कतार गुप्तचर संस्था आणि सुरक्षा यंत्रणा निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना घरातून घेऊन गेल्या, तर 26 ऑगस्ट 2023 ला कतारच्या एका न्यायालयानं आठ निवृत्त नौदल अधिकाऱ्यांना मृत्युदंडाचीही शिक्षा सुनावली होती. त्यानंतर भारत सरकारच्या विनंतीवरून आठ नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेचं रूपांतर जन्मठेपेत केलं होतं. पण, मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतरही कतार सरकारनं निवृत्त नौदल अधिकाऱ्यांवरील आरोप गुप्त ठेवले होते.

कुलभूषण जाधव यांचं प्रकरण काय?

कुलभूषण जाधव यांना ३ मार्च २०१६ रोजी बलुचिस्तान येथून पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणेनं अटक केली होती. कुलभूषण जाधव भारतीय नौदलातील अधिकारी आहेत. ते भारतातील 'रॉ' साठी काम करायचे. तसेच कुलभूषण जाधव हे पाकमध्ये हेरगिरी करत होते, असा आरोपही पाकिस्ताननं केला होता. इराणमार्गे जाधव यांनी पाकमध्ये प्रवेश केल्याचे पाकिस्तानचं म्हणणे होते.

पाकिस्तानमधील ‘फील्ड जनरल कोर्ट मार्शल’मध्ये कुलभूषण जाधव यांच्याविरोधात खटला चालला. हेरगिरी आणि घातपाती कारवायांचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी पाकिस्तानमधील लष्करी न्यायालयाने 10 एप्रिल 2017 रोजी कुलभूषण जाधव यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती.

त्याविरोधात भारतानं हेगमधील इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिसमध्ये पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयानं सुनावलेल्या या निर्णयाला आव्हान दिलं होतं. तसेच जाधव यांना काउन्सिलर अ‍ॅक्सेस (वकिलांची सुविधा) पुरवण्याची विनंतीही केली होती. त्यावर न्यायालयानं भारताच्या विनंतीवर कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर अंतरिम स्थगिती लावली.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT