Chhatrapati Sambhajinagar : महाराष्ट्रातील भाजप महायुतीच्या लोकसभा प्रचाराचा नारळ केंद्रीय गृहमंत्री अमित शाह मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरातून फोडणार आहेत. 15 फेब्रुवारीला अमित शाहांच्या होणाऱ्या दौऱ्यापुर्वीच काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी आमदारकीचा आणि काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देत टायमिंग साधल्याची जोरदार चर्चा सध्या राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अशोक चव्हाणांनी दोन दिवसांत पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सांगितलं आहे. अमित शाहांच्या संभाजीनगर येथील सभेतच अशोक चव्हाण यांचा अधिकृत भाजप प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. महाराष्ट्रात भाजप महायुतीने 'मिशन 45' घेऊन रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. त्यातच भाजपने छत्रपती संभाजीनगरमधून पहिल्यादांच लोकसभा लढवण्याचा निर्णय घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अमित शाहांची संभाजीनगरमध्ये होणारी सभा हा त्याचाच एक भाग असल्याचे बोलले जाते. 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या शाहांच्या सभेची जय्यत तयारी भाजपकडून स्थानिक नेते आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे करत आहेत. याच सभेत अशोक चव्हाण यांचे 'ग्रॅन्ड वेलकम' करत राज्यातील महाविकास आघाडीला जोरदार झटका देण्याचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाचा प्रयत्न आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतरही पुढील राजकीय वाटचाल किंवा भाजप प्रवेशावर कुठलेच भाष्य न करणे यातूनही हेच संकेत मिळत आहेत. अशोक चव्हाण हे राज्याचे दोनवेळा मुख्यमंत्री, एकदा नांदेड लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत. राज्यपातळीवर नेतृत्व केलेले चव्हाण हे मोठे नेते असले तरी त्यांची कर्मभूमी ही मराठवाडाच राहिलेली आहे. त्यामुळे याच मराठवाड्याच्या राजधानीत केंद्रीय नेतृत्वाच्या उपस्थितीत अशोक चव्हाणांच्या दुसऱ्या राजकीय इंनिगला सुरूवात व्हावी, अशा प्रकारचे नियोजन होताना दिसत आहे.
शहरातील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या राजकीय दृष्ट्या ऐतिहासिक अशा मैदानावर अमित शाहांची 15 फेब्रुवारीला पहिलीच सभा होत आहे. या मैदानावर लाखोंच्या सभेचा रेकॉर्ड शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांच्या नावावर आहे. त्याच मैदानावर लाखोंची गर्दी जमवून राज्यातील महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आणि अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश केला जाण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.