Political News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) येत्या 13 मार्चला निफाड दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा दौरा लोकसभा निवडणुकीशी संबंधित आहे. मात्र, शरद पवार यांच्या दौऱ्याची वेगळ्याच कारणाने जोरदार चर्चा होत आहे.
शरद पवार यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा घटक म्हणून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी आमदार अनिल कदम (Anil Kadam) आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मतदारसंघात ठिकठिकाणी स्वागताचे फलक लावले आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. पवार यांची मोठी सभा निफाडला होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
निफाड तालुका शरद पवार (Sharad Pawar) यांना मानणारा तालुका आहे. कांदा आणि द्राक्ष उत्पादकांच्या या तालुक्यात सध्या शेतकरी प्रचंड अडचणीत आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा होत आहे. मात्र, शरद पवार यांच्या स्वागताचे फलक अजित पवार गटाचे आमदार दिलीप बनकर (Dilip Bankar) यांनीही लावले आहेत.
या फ्लेक्समुळे कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. मतदारसंघात सोशल मीडियावर सध्या दिलीप बनकर यांच्या फलकांची जोरदार चर्चा होत आहे. त्यानिमित्ताने अनेक प्रश्नदेखील उपस्थित केले जात आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
हा दौरा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत आहे, पण ही निवडणूक विधानसभेची आहे की काय, अशा पद्धतीने आमदार बनकर आणि माजी आमदार कदम दोघेही शरद पवार यांच्या स्वागताचे फलक लावत आहेत. दिलीप बनकर हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर गेले आहेत. राज्याच्या राजकारणात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार यांच्यात जोरदार चुरस आहे.
असे असताना आमदार बनकर मात्र एकाच वेळी अजित पवार गटात राहून शरद पवार यांच्या स्वागताचे फलक लावत आहेत. त्यामुळे 'आमदार बनकर यांचा अजित पवार यांच्यावर भरोसा नाय का?' असं प्रश्न कार्यकर्ते करीत आहेत. आमदार बनकर अजित पवार गटात अस्वस्थ तर नाहीत ना? अशी विचारणा होत आहे.
कांदा निर्यातबंदी आणि द्राक्षांचे भाव कोसळण्यात केंद्र व राज्यातील भाजपचे सरकार जबाबदार असल्याची शेतकऱ्यांची तीव्र भावना आहे. शेतकरी भाजपवर नाराज आहेत. मात्र, आमदार बनकर यांचा भाजपच्या सरकारला पाठिंबा आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन थडीवर हात ठेवण्याचा हा राजकीय प्रकार कोणता? असा प्रश्न त्यांच्या समर्थकांनाही पडला आहे.
बनकर आगामी निवडणुकीत अजित पवार गटात राहून शरद पवार (Sharad Pawar) गटाच्या उमेदवाराचा प्रचारदेखील करतील का? असा प्रश्न उभा राहत आहे. त्यामुळे एकंदरच निफाड विधानसभा मतदारसंघात आमदार दिलीप बनकर यांच्याबाबत त्यांचे आगामी राजकीय धोरण काय? असा नवा प्रश्न चर्चेत आहे.
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.