Pachora APMC election is became interesting : पाचोरा -भडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शिवसेना, उद्धव ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस व भाजप या राजकीय पक्षांच्या सर्वच पदाधिकाऱ्यांनी निवडणुकीतील विजयासाठी कंबर कसली असून, सध्या तरी चौरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. स्थानिक नेत्यांनी वैयक्तीक प्रतिष्ठेसाठी वरिष्ठांचे आदेश झुगारून पॅनेलच्या हालचाली सुरु केल्या आहेत. (There will be four panel for Pachora APMC election)
या निवडणुकीत (Election) किमान चार पॅनेल होतील असे सध्याचे चित्र आहे. त्यात शिवसेना-भाजपची (BJP) युती असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेचे (Shivsena) आमदार किशोर पाटील (Kishor Patil) यांचे स्वतंत्र पॅनेल असेल. शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) संदर्भात असून, त्यांच्यातही आघाडी धर्म पाळला जाईल, असे चित्र दिसत नाही. काँग्रेसने स्वबळावर लढण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे युती, आघाडी धर्म पायदळी तुडवला जाईल, असे सध्या तरी दिसत आहे. यामध्ये खरी लढत शिवसेना (शिंदे गट) आमदार किशोर पाटील आणि त्यांच्या भगिनी शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सुर्यवंशी यांच्यातच रंगणार आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत १८ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. बाजार समितीच्या १८ जागा असून, त्यात सोसायटी मतदारसंघात सर्वसाधारणसाठी ७, महिला राखीवसाठी २, इतर मागाससाठी १, भटक्या जाती जमातीसाठी १ अशा ११ जागा असून, यासाठी अनुक्रमे १०१, १४, १९ व १५ असे १४९ तसेच ग्रामपंचायत मतदारसंघात सर्वसाधारण २, अनुसूचित जाती १, आर्थिक दुर्बल १अशा ४ जागा असून, यासाठी अनुक्रमे ३३, १५ व १० असे ५८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
व्यापारी मतदारसंघासाठीच्या २ जागांसाठी २२ तर हमाल मापाडी मतदारसंघाच्या १ जागेसाठी ५ असे १८ जागांसाठी २३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सर्वपक्षीय उमेदवारांसह शेतकऱ्यांचाही समावेश आहे.
माजी संचालक लांबच
२०१० ते २०१२ या कालावधीत बाजार समिती कारभारातील अनियमितता व अवाजवी खर्च या संदर्भात सहकार निबंधक, विभागीय आयुक्त, सहकार मंत्री व खंडपीठात झालेल्या तक्रारीनुसार १६ माजी संचालकांवर ६९ लाख रुपये वसुलीची जबाबदारी सोपविण्यात आली होती. त्यांच्या मालमत्तेवर टाच बसविण्यात आली. या उमेदवारांना आपल्या नावे असलेल्या व बाजार समितीत भरावयाच्या रकमेचा भरणा केल्याशिवाय उमेदवारी करता येणार नाही हा नियम आहे.
या नियमामुळे प्रताप पाटील, रावसाहेब पाटील, सचिव पी. के. सोनवणे, सीमा पाटील, पंढरीनाथ पाटील, राजेंद्र परदेशी, शांताराम धनराज पाटील, राजेंद्र पाटील, नारायण पाटील, निवृत्ती पवार, जिजाबाई पाटील, रवींद्र पाटील, कल्पेश संघवी, भास्कर मगर, रंगराव नेरपगार, नामदेव अहिरे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल न करता आपले कुटुंबीय, आप्तेष्ट, सहकारी यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
अर्ज दाखल केलेले दिग्गज
या निवडणुकीत शिवसेनेचे नेतृत्व आमदार किशोर पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व माजी आमदार दिलीप वाघ व संजय वाघ, भाजपचे नेतृत्व अमोल शिंदे व सतीश शिंदे, ठाकरे गटाचे नेतृत्व वैशाली सूर्यवंशी व काँग्रेसचे सचिन सोमवंशी करीत आहेत. ज्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत, त्यात शिवसेना, उद्धव ठाकरे सेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेस या पक्षाच्या दिग्गजांचा समावेश आहे.
भाजपचे बाजार समितीचे माजी सभापती सतीश शिंदे, उपसभापती ॲड. विश्वास भोसले, सिंधूताई शिंदे, दिलीप पाटील, शेख गनी, श्रावण लिंगायत, संजय पाटील, अर्चना पाटील, लक्ष्मण पाटील, नरेंद्र पाटील यांचा समावेश असून, शिवसेना ठाकरे गटातर्फे उद्धव मराठे, ॲड. प्रवीण पाटील, गणेश परदेशी, प्रशांत पवार, मनोज महाजन, रघुनाथ महाजन, जिल्हा उपप्रमुख दीपक पाटील, माजी संचालक मच्छिंद्र पाटील ,अशोक पाटील यांचा समावेश आहे.
शिवसेनेच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष गणेश पाटील, राजेंद्र पाटील, माजी नगरसेवक शीतल सोमवंशी, अंबादास सोमवंशी, अजय देवरे, नितीन पाटील, पूनम पाटील, प्रतिभा पाटील, सुनील पाटील, चंद्रकांत धनवडे यांचा समावेश असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने भडगावचे माजी नगराध्यक्ष श्याम भोसले, विजय पाटील, जयसिंग परदेशी, रामधन परदेशी, शालिक मालकर, सुदाम वाघ, रणजीत पाटील, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख वंदना चौधरी, भडगावचे डी. डी. पाटील, अलका पाटील, भडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एन. एन. गायकवाड यांचा समावेश आहे.
युती, आघाडी धर्म पायदळी
राज्यात युती, आघाडी धर्म पाळून निवडणुका लढल्या जाव्यात, असे वरिष्ठ पातळीवरून जाहीर करण्यात आले असले तरी सध्याची स्थिती पाहता स्थानिक पातळीवर मात्र युती व आघाडीचे तीनतेरा होण्याचे चित्र दिसत आहे. कारण स्थानिक पातळीवरील युती आघाडीच्या नेत्यांमध्ये कमालीची ओढाताण आहे. शिवसेनेचे आमदार किशोर पाटील व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ यांनी गेल्या वर्षी झालेल्या बाजार समितीच्या कार्यक्रमात सहकारात आम्ही राजकारण आणणार नाहीत, असे जाहीर केले होते. त्यामुळे ते दोघे एकत्र येतात की वेगळी चूल मांडतात? हे अजून स्पष्ट नाही.
शिवसेना-भाजपची युती असली तरी स्थानिक पातळीवर शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांचे व भाजपचे तालुकाध्यक्ष अमोल शिंदे, सतीश शिंदे यांच्यातून विस्तवही जायला तयार नाही. त्यामुळे त्यांनी आपले स्वतंत्र उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. तोच प्रकार शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भात असून, त्यांच्यातही आघाडी धर्म पाळला जाईल, असे चित्र दिसत नाही. राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष सचिन सोमवंशी व सहकाऱ्यांनी स्वबळावर लढण्याचे या अगोदरच जाहीर केले आहे. त्यामुळे युती, आघाडी धर्म पायदळी तुडवला जाईल, असे सध्या तरी दिसत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.