Amit Shah Nashik Visit : राज्यातील विविध नागरी सहकारी बँका आणि विशेषता आज जिथे सहकार परिषद होत आहे. तेथील नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रचंड अडचणीत आहे. या बँकांवर परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. याबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा मार्ग काढू शकले असते. मात्र त्यांचा नाशिक दौरा रद्द झाल्याने आयोजकांचा हिरमोड झाला आहे. Amit Shah Nashik Visit
राज्यातील सहकार क्षेत्र त्यात सक्रिय नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे अडचणीत आहे. महाराष्ट्रातील अनेक नागरी सहकारी बँका आर्थिक संकटात आहेत. यातील जवळपास 9 बँकांवर रिझर्व बँकेचे निर्बंध असून त्यांचा परवाना रद्द होण्याची टांगती तलवार आहे. त्यासाठी या बँकांचे प्रशासन धडपड करीत असले तरी त्यात प्रामुख्याने राजकीय नेतेच मोठे थकबाकीदार असल्याने त्यात विविध अडथळे आहेत.
पूर्णतः राजकारणात बुडालेल्या सहकार क्षेत्राच्या आजारावर उपाय व उपचार करण्याचे हेतूने केंद्रातील भाजप सरकारने पहिल्यांदाच सहकार मंत्रालय निर्माण केले आहे. अमित शहा त्या खात्याचे मंत्री आहेत. त्यामुळे अनेकांना या विभागाकडून अपेक्षा निर्माण झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक येथे आज होणाऱ्या राज्यस्तरीय सहकार परिषदेला शहा उद्घाटनासाठी उपस्थित राहणार होते. परंतु त्यांचा दौरा रद्द झाला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यामुळे सहकार क्षेत्रातील मंडळींचा हिरमोड झाला. या संदर्भात नाशिक जिल्हा बँक हा कळीचा मुद्दा आहे. बँकेच्या कर्मचारी संघटनेने याबाबत शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविले आहे. संघटनेचे अध्यक्ष रतन जाधव, सरचिटणीस प्रदीप शेवाळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी यासंदर्भात निवेदनाद्वारे मागण्या केल्या आहेत. जिल्हा बँक वाचविण्यासाठी शासनाने कारभार चालवावा.
बँक वाचविण्यासाठी 500 कोटींचे कर्ज सवलतीच्या दरात देण्यात यावे. त्यासाठी बँक गॅरंटी घ्यावी. जिल्हा बँकेचे पाचशे ते एक हजार कोटींचे भाग खरेदी करून अथवा भाग भांडवल देऊन बँक पूर्णतः शासनाच्या नियंत्रणाखाली आणावी. शासनाकडे बँकेसाठी 718 कोटीची मागणी यापूर्वीच प्रशासनाने केली होती. आर्थिक मदत म्हणून ही रक्कम मिळावी, असा संघटना आणि बँकेचा आग्रह आहे.
याबाबत मंत्री शहा आले असते तर याबाबत तोडगा निघाला असता, अशी बँकेच्या प्रशासनची अपेक्षा होती. शहा यांचा दौरा रद्द झाल्याने आता सहकार परिषदेचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे - पाटील करणार आहेत. समारोपाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील. किमान मुख्यमंत्र्यांनी तरी या गंभीर विषयात लक्ष घालून शासनाकडून जिल्हा बँकेला ठोस मदत करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.