Amit Shah, Shirish Kotwal Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Shirish Kotwal : अमित शहांनी शेतकऱ्यांवर नांगर फिरवला; शिरीष कोतवाल यांचा आरोप

संपत देवगिरे : सरकारनामा

Nashik News : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आज कांदा निर्यातीचा निर्णय घेतला. मात्र त्याआधी कांदा निर्यातबंदी करून शेतकऱ्यांच्या घरावर केंद्र सरकारने नांगर फिरवला आहे. आता त्याचा काय उपयोग? असा सवाल काँग्रेस नेते माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज तीन लाख टन कांदा निर्यातीस परवानगी देण्याचा निर्णय घेतला. यावर काँग्रेस नेते कोतवाल यांनी संताप व्यक्त केला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या सरकारला कांदा निर्यातबंदी करण्याची काहीही गरज नव्हती. मात्र कांदा निर्यातबंदी केल्याने कांदा उत्पादक शेतकरी असलेल्या फार तर आमच्या सात जागा कमी होतील. मात्र कांदा खाणाऱ्या ग्राहकांच्या 60 ते 70 जागा टिकून राहतील, असा विचार सरकाने केला आहे. हे अत्यंत खेदजनक असून भारतीय जनता पक्ष आपल्या राजकारणासाठी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना काय किंमत देतो हे यावरून स्पष्ट होते, असे ते म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने (BJP) कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतला. त्या निर्णयानंतर आजपर्यंत शेतकऱ्यांचे वीस ते पंचवीस हजार कोटींचे नुकसान झाले आहे. आज निर्यातीला परवानगी दिल्यावर शेतकऱ्यांचे हे नुकसान भरून येणार आहे का? भाजप त्याची भरपाई करणार आहे का? आज शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नाही. अशा स्थितीत शेतकऱ्याला त्याचा काही उपयोग होणार आहे का? असे अनेक प्रश्न आहेत. भाजपला यातले काहीही समजत नाही. ते केवळ राजकारण करतात. म्हणूनच त्यांनी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अशी वागणूक दिली आहे, असा आरोप कोतवाल यांनी यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर टीका केली. ते म्हणाले, निर्यातबंदी केल्यानंतरच्या कालावधीत पाकिस्तानचा कांदा सव्वाशे रुपये किलो दराने विकला गेला. चीनमध्ये कांद्याला दीडशे ते दोनशे रुपये भाव होता. भारतातील कांदा चाळीस रुपयांवरून आठ रुपयावर आला. याचा अर्थ अमित शहा यांना पाकिस्तानच्या शेतकऱ्यांची भरभराट झालेली चालते मात्र भारतीय शेतकरी संकटात गेला तरी काहीही फरक पडत नाही, असे त्यांचे स्पष्ट धोरण दिसते.

कांदा निर्यातबंदी केल्यावर आम्ही सर्व लोक शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहिलो. शरद पवार यांच्या उपस्थितीत चांदवड येथे आंदोलन करण्यात आले. शेतकरी रोज रस्त्यावर उतरत होता. संताप व्यक्त करत होता, रडत होता. मात्र भाजपच्या नेत्यांना त्यांची दया आली नाही. भाजपचे नेते असे सांगत होते की, आम्हाला कांदा उत्पादक शेतकरी नव्हे तर कांदा खाणारे ग्राहक महत्त्वाचे वाटतात. या कालावधीत भाजपच्या अनेक नेत्यांनी निर्यात बंदी उठवा, अशी विधाने केली.

मात्र शेतकरी संकटात असताना कोणता मुख्यमंत्री, मंत्री किंवा खासदार, आमदार निर्यातबंदी उठवण्यासाठी भाजपला सांगण्याचे धाडस करू शकला? त्यामुळे आता निर्यातबंदी उठवणे याचा अर्थ  “बूंद से जाती, वो हौज से नहीं आती” असे झाले आहे. त्यामुळे भाजपने शेतकऱ्यांची जी क्रूर थट्टा केली, त्याचे परिणाम त्यांना येत्या निवडणुकीत दिसून येतील. कितीही मलमपट्टी केली तरी शेतकऱ्यांचे नुकसान भरून येण्यासारखे नाही, असे कोतवाल यांनी सांगितले.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT