Radhakrishna Vikhe Patil, Balasaheb Thorat, Vivek Kolhe Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Ahmednagar News : 'प्रवरे'कडून 8 वर्षे लूट होताना गप्प का ? ऊस दरावरून 'गणेश'च्या अध्यक्षांनी मांडली जुनी आकडेवारी..

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : सध्या ऊसाचे गाळप एकीकडे जोऱ्यात सुरू असले तरी नगर जिल्ह्यातील साखर कारखानदार ऊसाचे अंतिम भाव घोषित करत नसल्याचे आणि पहिले पेमेंट 2700 रुपयांच्या आसपास असल्याने शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. यात आता कसाबसा सुरू झालेला गणेश साखर कारखान्याने जाहीर केलेल्या दरावरून कारखान्याच्या आजीमाजी अध्यक्षांत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

गणेश कारखान्याने यंदा दिलेल्या ऊस दरावर राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) यांच्या प्रवरा कारखान्याच्या नियंत्रणात असताना गणेशचे अध्यक्ष असलेले मुकुंदराव सदाफळ यांनी कमी दराबद्दल टीका करत एकप्रकारे थोरात-कोल्हेंवर निशाणा साधला आहे. यावर आता गणेश कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष सुधीर लहारे यांनीही प्रवरे’ने आठ वर्षे गणेश परिसराची लूट केली, तेव्हा गप्प का होता? असा प्रश्न विचारत 'प्रवरे'वरून आदेश आला म्हणून भुई थोपटण्याचे उद्योग सदाफळ यांनी करू नये असे सुनावले आहे.

गेली आठ वर्षे प्रवरेने गणेश कारखाना चालवताना, गणेशच्या सभासद, शेतकरी बांधवांना प्रवरेपेक्षा २०० ते ३०० रुपये कमी भाव देऊन गणेश परिसरातील शेतकऱ्यांची शेकडो कोटी रुपयांची लूट केली. गणेशच्या तत्कालीन अध्यक्षांनी तेव्हा प्रवराच्या नेतृत्वाला जाब का विचारला नाही? तुमचे तोंड तेव्हा गप्प का होते? असे विद्यमान अध्यक्ष लहारे यांनी प्रश्न केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याबाबत सुधीर लहारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गणेश कारखान्यासमोर रोज अडचणींचा डोंगर उभा केला जात आहे. ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांची खंबीर साथ मिळाल्यामुळेच गणेशचे धुराडे पेटू शकले.?सभासदांचे आशीर्वाद होते, कामगारांची मेहनत होती म्हणून गणेश कारखाना सुरू झाला. साखर वाटून आम्ही त्यांचे तोंड गोड केले. गणेश कारखाना हा संगमनेर आणि संजीवनीप्रमाणे भाव देईल, हे आम्ही अगोदरच सांगितलेले आहे असे लहारे यांनी म्हंटले आहे.

प्रवरेवरून आदेश आला म्हणून भुई थोपटण्याचे उद्योग सदाफळ यांनी करू नये. गणेशच्या माध्यमातून आम्हाला राजकारण करायचे नाही. गणेश कारखाना सुरू होऊ नये यासाठी तुमच्या नेतृत्वाने केलेले प्रयत्न जनतेच्या दरबारात आम्हाला मांडायला भाग पाडू नका, असाही इशारा लहारे यांनी विखे यांचे नाव न घेता दिला आहे.

सदाफळ यांनी माहिती घेऊन बोलायला हवे. प्रवरा आणि गणेश कारखान्याच्या भावातली तफावत त्यांनी समजून घ्यायला हवी होती. 2014-15 मध्ये प्रवरेने 2155 रुपयांचा भाव दिला तर गणेशच्या उत्पादक सभासदांना 1924 रुपये मिळाले.

2015-16 मध्ये प्रवरेचा भाव 2245 रुपये तर गणेश युनिटचा भाव 2039 रुपये होता. सदाफळ यांनी गणेश (Ganesh Sugar Factory) उत्पादकांच्या हितासाठी प्रवरेच्या नेतृत्वाला एकदा तरी जाब विचारला का? गणेश कारखान्यावर कर्ज नाही, असे ते म्हणत असतील तर मग प्रवरा कारखाना 82 कोटी रुपये कशाचे मागतो आहे? असा प्रश्नही लहारे यांनी उपस्थित केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT