MP Unmesh Patil News : Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

MP Unmesh Patil News : भाजप खासदार उन्मेष पाटलांना 'डबल टेन्शन'; शिंदे गटानंतर आता ठाकरेंचंही...

संपत देवगिरे

Jalgaon News : राज्यातल्या सत्तेत आणि महायुतीत एकत्र असलेल्या भाजप आणि शिवसेनेच्या शिंदे गटामध्ये अंतर्गत कुरबुरी सुरे असल्याचे चिन्हे दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीच सत्तेतला सहकारी पक्ष शिंदे गटाने भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या जागेवार दावा केला होता. ते अंतर्गत सर्व्हेत मागे पडल्याचा दावाही करण्यात येत होता. यावर आता शिवसेनेच्या ठाकरे गटानेही त्यांच्यावर हल्ला करीत, पाटील आमच्या मतांमुळे खासदार झाले आहेत, असे सांगत आव्हान दिले आहे. (latest Marathi News)

महाविकास आघाडीचा प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना ठाकरे गटाने जळगाव लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांच्या विरोधात आता शिवसेनेच्या ठाकरे गटाचा उमेदवार टक्कर देऊन, जिंकूनही येईल, असे जिल्हाप्रमुख संजय सावंत यांनी म्हटले आहे.

सावंत पुढे म्हणाले, 'गेल्या वेळी ही जागा युतीत भाजपकडे होती. या मतदारसंघात खासदार पाटील विजयी झाले होते. त्यांचा विजय शिवसेना कार्यकर्त्यांच्या परीश्रमामुळे झाला होता. आमच्या मतांवरच ते विजयी झाले होते. या मतदारसंघात सर्व सहा विधानसभा मतदारसंघात आमची भक्कम यंत्रणा आहे. जळगाव ग्रामीण, पाचोरा, पारोळा-एरंडोल मतदारसंघात शिवसेनेलाच यश मिळालेले आहे.

शिवसेनेतून बंडखोरी करीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गेलेल्या आमदारांना शिवसेनेचीच मते मिळाली आहेत. आजही त्यांना आमचे आव्हान आहे, की त्यांनी पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा मैदानात यावे. शिवसैनिक त्यांचा निश्चि‍त पराभव करतील. लोकसभा निवडणुकीत उमेदवार जिंकण्याची सर्व गणित आमच्याकडे आहेत, त्यामुळे आम्ही या मतदारसंघावर दावा करीत आहोत.

शिवसेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख संजय सावंत यांनीच हा दावा केलेला आहे. त्याआधी महायुतीचा घटक असलेल्या शिंदे गटाने या जागेवर दावा करीत, खासदार पाटील यांना घरचा आहेर दिला होता. त्यामुळे एकंदरच भाजपचे खासदार पाटील यांच्या मार्गात सहकारी पक्षांबरोबरच विरोधकांडून काटे पेरण्याचे काम जोरात सुरू आहे. लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू असताना हे राजकारण चांगलेच तापले असल्याने, उन्मेष पाटील यांची झोप उडण्याची शक्यता आहे.

याबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या नेत्यांच्या मते, शिवसेना (उबाठा) राज्यात महाविकास आघाडी म्हणूनच निवडणुका लढविणार आहे. त्यामुळे आम्ही ही जागा लढविण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. गेल्या निवडणुकीत आम्ही भाजपसोबत असताना देखील जळगाव लोकसभा मतदारसंघ शिवसेनेच्या माध्यमातून लढण्याची तयारी केली होती. दिवंगत आर. ओ. पाटील यांनीही त्याबाबत पूर्ण तयारी केली होती, त्यांनी मतदारसंघाची पूर्ण चाचपणी करून, आपली उमेदवारीही भक्कम केली होती. परंतु दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. त्यामुळे आम्ही त्या वेळी या लोकसभेच्या जागेची मागणी केली नाही.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT