Shankarrao Gadakh) Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

BJP News : भाजपची डोकेदुखी थांबेना! संगमनेरनंतर आता नेवासामध्ये धुसफूस

Pradeep Pendhare

Nagar News : भारतीय जनता पक्षाला लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पदाधिकाऱ्यांमधील नाराजीच्या ढगांनी घेरले आहे. नगर उत्तरमध्ये चांगलीच धुसफूस वाढलीय. संगमनेर तालुका भाजप कार्यकारिणीतील विसंवाद चव्हाट्यावर आल्यानंतर नेवासा तालुक्यातील भाजप पदाधिकाऱ्याने नाराज होऊन पक्षाला 'राम राम' केला आहे.

नेवासात भाजपमध्ये कुरघोड्या सुरू असल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी वाढली आहे. या प्रकाराला वैतागून पक्षापासून पदाधिकारी दूर जात आहेत. विशेष म्हणजे, भाजपचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांचे नेवासा (Nevasa) हे होम ग्राउंड असून, यात पक्षातील पदाधिकाऱ्यांमध्ये वाढती नाराजी त्यांची डोकेदुखी ठरत आहे.

नेवासातील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचे आमदार शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या गटात प्रवेश केला आहे. दत्तात्रय काळे यांनी आमदार गडाख गटात प्रवेश केल्याने हा भाजपचे नगर उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे आणि माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांना मोठा राजकीय धक्का मानला जात आहे.

आमदार गडाख यांच्या गटात काळे यांचा प्रवेश हा गडाख गटाची आगामी काळात ताकद वाढवणारा ठरणारा आहे. दत्तात्रय काळे यांच्यासह भेंडा बुद्रुकचे उपसरपंच पंढरीनाथ फुलारी, देवगावचे सरपंच विष्णू गायकवाड, सदस्य देवेंद्र काळे, रवींद्र गायकवाड, भाऊसाहेब गायकवाड, गणेश गायकवाड, सरपंच सोपानराव लोखंडे, तुकाराम दामोदर कोलते यांनीदेखील गडाख गटात प्रवेश केला आहे.

देशात भाजप (BJP) चा बोलबाला असताना नगर जिल्ह्यातील काही भागात विशेष करून नगर उत्तरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांमधील ही धुसफूस, नाराजीनाट्य चर्चेत आले आहे. यातून पदाधिकारी भाजपला राम राम करत आहेत. खुपटी, नेवासा बुद्रुक, कुकाणा, शनिशिंगणापूर, शिंगवे येथील निष्ठावान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गडाख गटात प्रवेश केला आहे. भाजपमधील स्थानिक नेतृत्वाशी असलेल्या विसंवादातून हा प्रकार घडत असल्याचे दबक्या आवाजात चर्चा आहे.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्तात्रय काळे यांचा कुकाणा, चांदा, भेंडा या गटात मोठा जनसंपर्क आहे. लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Election) जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांची भाजपला सोडचिठ्ठी चर्चेचा विषय ठरली आहे. विधानसभा 2024 आणि 2019 मध्ये दत्तात्रय काळे यांनी निर्णायक भूमिका बजावली होती.

परंतु लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काळे यांनी आमदार गडाख यांना साथ देत पुढची रणनीती आखत आहे. यातच आमदार शंकरराव गडाख सध्या नेवासा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विधानसभा 2024 ची तयारी त्यांनी केल्याचे दिसते आहे. मत पेरणीसाठी आमदार गडाख सध्या बेरजेचेच्या राजकारण करताना दिसत आहेत. यातून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनादेखील याचा फायदा होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

(Edited by Amol Sutar)

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT