Shivsena Vs BJP : सिन्नर मतदार संघात शिवसेने शिंदे गटाच्या काही लोकांकडून ज्येष्ठांना पेन्शन मिळणार या नावाखाली वसुली सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार सुरू झाल्याने भाजपकडून त्यावर टीका करण्यात आली आहे. पेन्शनचे स्वप्न दाखवून पैसे वसुली करणाऱ्यांपासून सावध रहा, असे भाजपच्या नेत्यांनी सांगितले आहे.
सिन्नर तालुक्यात काही दिवसांपासून अस्तित्वात नसलेल्या मुख्यमंत्री 'वयोश्री' योजनेच्या नावाने 60 वर्षावरील ज्येष्ठांना फसवण्याचा प्रकार सुरू आहे. या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी ज्येष्ठांकडून कागदपत्रे व त्यासोबतच शंभर ते दीडशे रुपये उकळले जात असल्याचा आरोप भाजपच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.
मुळातच या नावाने कोणतीही योजना राज्यात अस्तित्वात नसून तालुक्यातील लोकांनी या फसवणुकीला बळी पडू नये, असे आवाहन भाजप कार्यकर्त्यांकडून करण्यात आले आहे. तालुक्यातील काही गावांमध्ये मुख्यमंत्री 'वयोश्री' योजना असल्याचे सांगून 50 ते 150 रुपये घेतले जात आहेत. तालुक्यात या योजनेच्या नावाखाली ज्येष्ठांना लुबाडणारे अनेक महाठक फिरत आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
60 वर्षावरील जेष्ठांना या योजनेत प्रत्येक महिन्याला 3 हजार रुपये पेन्शन मिळेल असे सांगून त्यांच्याकडून आधार कार्ड, बँक पासबुक, रहिवासी दाखला, दोन फोटो ही कागदपत्रे व सोबतच प्रकरण ऑनलाईन करण्यासाठी रोखीने पैसे देखील घेतले जात आहेत. ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याचा दावा संबंधित करतात. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार सुरू असल्याने राजकीय प्रचारासाठी हे केले जात असल्याचाही काहींचा दावा आहे.
मात्र, त्यावरून शिवसेनेच्या शिंदे गट आणि भाजपमध्येच जुंपण्याची चिन्हे आहेत. हे कार्यकर्ते ज्येष्ठांना दरमहा 3 हजार रुपये पेन्शन मिळेल असे सांगतात. पेन्शनच्या अपेक्षेने असंख्य ज्येष्ठांनी त्यांच्याकडे पैसे व कागदपत्रे जमा केले आहेत. सिन्नर तालुक्यातील ज्येष्ठ नागरिक व जनतेने अशा फसवणाऱ्या लोकांपासून सावध राहावे. अशी कुठलीही केंद्र व राज्य शासनाची योजना नाही.
त्यामुळे सावध राहावे असे, आवाहन भाजपचे सिन्नर विधानसभा निवडणूक प्रमुख जयंत आव्हाड, भाऊसाहेब शिंदे, बाळासाहेब हांडे, सिन्नर तालुका पश्चिम मंडल प्रमुख बहिरु दळवी, मुकुंद खर्जे यांनी केले आहे. भाजपचे हे कार्यकर्ते पैसे जमा करणाऱ्यांचा शोध घेत आहेत. ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग व्यक्तींसाठी केंद्र सरकारची राष्ट्रीय 'वयोश्री' योजना 2017 पासून अस्तित्वात आहे.
लाभार्थी व्यक्तीला या योजनेतून जीवनावश्यक साहित्य जसे वॉकिंग स्टिक, श्रवण यंत्र, एल्बो कक्रचेस, व्हीलचेअर, ट्रायपॉड्स, क्वॅडपॉड, कृत्रिम मर्डेचर्स, स्पेक्टल्स, क्वॅकपॉड, स्पेक्टल्स याचा लाभ देण्यात येतो. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी येणारा खर्च ‘ज्येष्ठ नागरिक कल्याण निधी’मधून केला जाईल.
योजना सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाच्या अंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम अंमलबजावणी करणार्या एजन्सीद्वारे म्हणजेच कृत्रिम अवयव उत्पादन महामंडळ (ALIMCO) मार्फत लागू केली जाते, असे या योजनेच्या पोर्टलवर नमूद करण्यात आले आहे. मात्र यात कुठेही रोख स्वरूपात अनुदानाचा उल्लेख नाही.
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार सुरू असल्याने अनेकांना हा निवडणूक फंडा वाटतो. त्यामुळे या योजनेवरून भाजपने आता पैसे गोळा करणाऱ्यांना आणि फसवणूक करणाऱ्या एकनाथ शिंदे गटाला लक्ष केले आहे. अशा परिस्थितीत सिन्नर मध्ये शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्येच जोरदार जुंपण्याची चिन्हे आहेत.
(Edited by Amol Sutar)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.