Girish Mahajan
Girish Mahajan Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Girish Mahajan : संकटमोचक गेले कुठे?; नाशिक-दिंडोरीच्या प्रचारातून गिरीश महाजन गायब!

Sampat Devgire

Nashik, 17 May : पाचव्या टप्प्यात निवडणूक असलेल्या नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता शेवटच्या टप्प्यात आहे. सर्वच पक्षाच्या नेत्यांनी प्रचारात झोकून दिले आहे, त्यामुळे नाशिक जिल्ह्याचे राजकारण चांगलेच तापले आहे.

भारतीय जनता पक्षाचे (BJP) नाशिकचे संपर्क नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) चौथ्या टप्प्यातील निवडणुकीत जळगाव आणि रावेर या लोकसभा मतदारसंघांमध्ये अडकून पडले होते. प्रारंभी एकतर्फी वाटणारी निवडणूक आता अतिशय चुरशीची झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघात महाविकास आघाडीने भाजपला मोठे आव्हान निर्माण केले आहे, त्यामुळे बहुतांशी नेते आणि मंत्री जळगाव जिल्ह्यात अडकून पडले आहेत.

धुळे (Dhule), नाशिक (Nashik), आणि दिंडोरी (Dindori) या तीनही लोकसभा मतदार संघाचा प्रचार येत्या दोन दिवसांत संपत आहे, त्यामुळे विविध पक्षाचे नेते प्रचार दौऱ्यावर येत आहेत. जिल्ह्याच्या विविध भागांत दररोज अनेक सभा होत आहेत, त्यामुळे महायुतीच्या (Mahayuti) प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. मात्र, या सर्व धावपळीत संकटमोचक गिरीश महाजन दिसलेले नाहीत, त्यामुळे तो चर्चेचा विषय झाला आहे.

नाशिक मतदारसंघात महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे उमेदवार आहेत. मात्र, धुळे (डॉ सुभाष भामरे) आणि दिंडोरी (डॉ भारती पवार) या दोन्ही मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत. धुळे आणि दिंडोरी या दोन्ही ठिकाणी भाजपने प्रचारात चांगली आघाडी घेतली आहे.

मात्र, यामध्ये गिरीश महाजन यांची उपस्थिती अपेक्षित असताना ते अद्याप दिसून आले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या नियोजनासाठी ते दोन दिवस नाशिकला होते. त्याआधी व नंतर ते प्रचारात सहभागी झालेले नाहीत, त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाही त्यांची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे.

नाशिक मतदारसंघात महायुतीचे खासदार हेमंत गोडसे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचारातही सहकारी पक्ष भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा सहभाग मोठ्या प्रमाणावर दिसून येत नाही, अशा तक्रारी आहेत.

या नाराजीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना नाशिकला यावे लागले. त्यांनी विविध आमदारांसह पदाधिकाऱ्यांशी व्यक्तीश: चर्चा करून प्रचारात सहभागी होण्याच्या सूचना केल्या. हे आमदार प्रचारात किती मनापासून सहभागी होतात, हे येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल.

Edited By : Vijay Dudhale

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT