Mumbai, 16 May : उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या दोन दिवसांपासून नॉट रिचेबल असून प्रचारातही सहभागी नाहीत, त्यामुळे अजित पवारांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली होती. मात्र, अजितदादांच्या नॉट रिचेबलचे कारण आता पुढे आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार प्रचारापासून लांब का आहेत, याचे कारण सांगितले आहे.
निवडणुकीच्या काळात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना घशाचे इन्फेक्शन झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे, त्यानुसार उपमुख्यमंत्री पवार हे वैद्यकीय विश्रांती घेत आहेत. त्यात कुठलेही नाराजीचे कारण नाही. अजितदादा हे उद्यापासून महायुतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सहभागी होतील, असे उमेश पाटील (Umesh Patil) यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
अजित पवार यांना मानणारे कार्यकर्ते प्रत्येक गावात, शहरात आणि जिल्ह्यात आहेत. मतदारांचा एक मोठा वर्ग अजितदादांच्या पाठीशी आहे, त्यामुळे लोकाच्या मनातील नेत्याला प्रचारापासून कोण दूर ठेवेल आणि स्वतःचे नुकसान करून घेईल, असे प्रत्युत्तर काँग्रेसकडून करण्यात येत असलेल्या सवालावर उमेश पाटील यांनी दिले.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात महायुतीला १५-१६ जागा, तर महाविकास आघाडीला ३०-३५ जागा मिळतील, असा दावा केला हेाता. त्याचाही समाचार उमेश पाटील यांनी घेतला. लोकसभा निवडणुकीचे सर्व टप्पे अजून पूर्ण झालेले नाहीत, त्यामुळे अशी विधाने करून मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न होत आहे. माजी मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना काही प्रमाणात टीव्हीवर टीआरपी मिळतो. राजकारणावर बोलावे, एवढी त्यांची उंची नाही, त्यामुळे त्यांना राज्यासंदर्भात बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शरद पवार आणि रोहित पवार यांनीही असे विधान केले आहे. पण, शरद पवार यांच्याकडे दीर्घ राजकीय अनुभव आहे. त्यामुळे मी त्यांच्याविषयी काही बोलणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे स्वतःची ग्रामपंचायतही नाही, हे मोठे दुर्दैव आहे. विलास काका पाटील-उंडाळकर हे अनेक वर्षे कॉंग्रेसच्या चिन्हावर कराड दक्षिणमधून निवडून येत होते. मुख्यमंत्री असताना पृथ्वीराज चव्हाणांनी विलासकाकांना षडयंत्र करून एका खून खटल्यात अकडवले आणि त्यांना व त्यांच्या कुटुंबीयांना अडचणीत आणले, अशी लोकांनी साळसूदपणाचा आव आणू नये, असा टोलाही त्यांनी चव्हाण यांना लगावला.
अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला लोकसभेची एकही जागा मिळणार नाही, हे मतदार ठरवतील. येत्या ४ जूनला त्याचे निकालही हाती येतील. सुमारे ४०-५० आमदार आज अजित पवार यांच्या पाठीशी आहेत. तुमच्यासोबत किती आमदार आहेत. ज्यांच्या पाठीशी एकही आमदार नाही, अशा पृथ्वीराज चव्हाण यांचे भाष्य किती गांभीर्याने घ्यावे, याचाही विचार माध्यमांशी करावा, असे आवाहनही उमेश पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.