Shivsena Political : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे अधिवेशन नाशिकमध्ये होणार आहे. यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपसह शिंदे गटाला शह देण्याची रणनिती ठाकरे गटाकडून अवलंबली जात आहे. याकडे लक्ष देत शिंदे गटानेही कुरघोडी सुरु केली आहे.
श्रीराम मंदिर सोहळा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा जन्मदिन आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या जन्मदिनाचे औचित्य साधत भगव्या पंधरवाड्याचे आयोजन करण्याचा निर्णय शिवसेना शिंदे गटाने जाहीर केला आहे. हिंदुत्वाच्या मुद्यावरून दोन्ही गट एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नसल्याचे यावरुन दिसत आहे.
उद्धव ठाकरे आज दुपारी शहरात दाखल झाल्यानंतर सावरकर स्मारकात दर्शन घेवून सायंकाळी काळाराम मंदिरात आरती करतील. गोदाआरती झाल्यानंतर मंगळवारी सकाळी शिवसेनेचे अधिवेशन सुरू होईल. ठाकरेंची जाहिर सभा सुद्धा पार पडणार असून, या अधिवेशात ते लोकसभेचे रणसिंग फुंकतील अशी शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा ठाकरे गट पुढे आला. पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बैठक पार पडली. श्रीराम मंदिर सोहळा, शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन, तसेच धर्मवीर आनंद दिघे यांचा जन्मदिवसाचे औचित्य साधून भगवा पंधरवाडा साजरा करण्याची घोषणा केली.
23 जानेवारी रोजी बाळासाहेब ठाकरे यांचा तर 27 जानेवारी रोजी धर्मवीर आनंद दिघे यांचा जन्मदिन असतो. या पंधरवाड्यात विविध शाखांचे उद्घाटन, लोकर्पण सोहळे, संपर्क कार्यालयाचे उद्घाटन, वैद्यकीय शिबीरे आयोजित करण्यात येणार आहे. तर, महिला आघाडीतर्फे हळदी - कुंकवाचे आयोजन करून महिलांपर्यंत पक्षाची ध्येय धोरणे घेऊन जाण्याचे नियोजन आखण्यात आले आहे.
जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांच्या ऊर्जा युवा प्रतिष्ठानद्वारे रामरक्षा स्त्रोत पुस्तिकेचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. दरम्यान, पालकमंत्री दादा भुसे यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते नेहमीच जनतेला दिशाभूल करण्याचे काम करतात. राम मंदिर हा राजकीय सोहळा नाही. अन्यथा नाशिकच्या धावपट्टू कविता राऊत यांना निमंत्रण कसे असते.
त्या अयोध्येत कशा पोहचल्या असत्या, असे पालकमंत्री दादा भुसे यांनी स्पष्ट केले. आगामी काळात दोन्ही गटातील टोकाच्या लढाईत बाजी कोण मारतो, हे आगमी लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट होईल.
(Edited by Amol Sutar)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.