Loksabha Election Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Loksabha Election 2024 : धुळ्यात महायुतीत गर्दी तर काँग्रेसमध्ये वानवा ; महाविकासला उमेदवारीचा प्रश्न...

संपत देवगिरे : सरकारनामा

Dhule News : धुळे लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीची तयारी जवळपास ठप्प झाली आहे. महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेल्या काँग्रेसला येथे शोध घेऊन देखील पसंतीचा उमेदवार मिळत नसल्याने सहकारी पक्ष चिंतेत आहेत. धुळे लोकसभा हा काँग्रेसचा पारंपारिक मतदारसंघ आहे.

मालेगाव आणि धुळे या दोन शहरांमध्ये लक्षणीय अल्पसंख्यांक मते असल्याने योग्य नियोजन केल्यास महाविकास आघाडीला येथे अनुकूल परिस्थिती निर्माण होऊ शकते. मात्र याबाबत चर्चेच्या पातळीवर कितीही घडामोडी घडत असल्या तरी प्रत्यक्ष उमेदवार कोण हा प्रश्न काँग्रेस पक्षाला सोडवता आलेले नाही.

गेल्या महिन्यात येथे लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाने विभागीय आढावा बैठक घेतली होती. यावेळी धुळे मतदारसंघासाठी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, धुळे जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष शाम सनेर आणि स्वेच्छा निवृत्ती घेतलेले भारतीय पोलिस दलातील अब्दुल रहमान अशी तीन नावे चर्चेत होती.

अन्य कुठलाही पर्याय अथवा नाव पक्षाकडे नसल्याने नेत्यांनी स्थानिक पदाधिकाऱ्यांना अन्य उमेदवारांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यात फारशी प्रगती होऊ शकलेली नाही. त्यामुळे काँग्रेससह सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट देखील अस्वस्थ झाला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसकडे सध्या चर्चेत असलेल्या तीन नावांपैकी अब्दुल रहमान हे अपरिचित आणि मतदारसंघा बाहेरचे आहेत. डॉ. शेवाळे यांच्या विषयी धुळ्यातील नेते फारसे अनुकूल नाही. तर सनेर यांच्या देखील काही मर्यादा आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार कुणाल पाटील यांचा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. मात्र आमदार पाटील निवडणुकीसाठी उत्सुक नाहीत. अशा स्थितीत महाविकास आघाडीचा नवा फॉर्मुला म्हणून सहकारी पक्षातील प्रबळ उमेदवारांचा शोध घेतील.

त्यानंतर त्यास काँग्रेसच्या चिन्हावर उमेदवारी करण्याच्या सूचना देण्यात येऊ शकतात. या दृष्टीने सध्या चाचपणी सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान भारतीय जनता पक्षाकडे मात्र अनेक पर्याय आणि उमेदवार आहेत. डॉ. सुभाष भामरे हे येथील विद्यमान खासदार आहेत. याशिवाय भारतीय पोलीस दलातील निवृत्त अधिकारी प्रताप दिघावकर तसेच जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष धरती देवरे हे प्रमुख इच्छुक आहेत.

महायुतीमध्ये पालकमंत्री दादा भुसे यांच्या मतदारसंघाचा समावेश धुळे लोकसभा मतदारसंघात होतो. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाकडून मंत्री भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसे गेले वर्षभरापासून येथे निवडणुकीसाठी काम करीत आहेत. संभाव्य उमेदवार म्हणून भारतीय जनता पक्षाला हवा असलेला एखादा अनुकूल मतदारसंघ देऊन त्या बदल्यात धुळे मतदारसंघ शिंदे गटाला मागून घ्यावा, असा नवा प्रस्ताव सध्या चर्चेत आला आहे. या सर्व राजकीय घडामोडींमध्ये महायुतीत उमेदवारांची गर्दी आणि काँग्रेसमध्ये उमेदवाराचा शोध अशी परस्पर विरोधी परिस्थिती निर्माण झाली आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT