Ahmednagar Political News : आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची वाट धरली असून, 'जनसंवाद' यात्रा एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून सुरू करण्याचे संकेत दिलेत. आमदार लंके खासदारकीची निवडणूक लढवणार असल्याने त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडील आमदारकीबाबत कायदेशीर पेच निर्माण झाला आहे.
यातच नीलेश लंके आमदारकीचा राजानीमा देणार, असल्याचे सांगितले जात आहे. आमदार लंकेंना कायदेशीर अडचणी येऊ नयेत म्हणून शरद पवार स्वतः कायदेतज्ज्ञांशी सल्लामसलत करत आहेत. त्यामुळे आमदार लंके स्वतः आणि त्यांचे कार्यकर्ते आमदारकीबाबत निश्चिंत झाले असून, नगर दक्षिणमध्ये गोपनीय गाठीभेटींचा सपाटा लावला आहे.
महाविकास आघाडीमध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. शरद पवार आणि त्यांचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी नगर दक्षिणमध्ये 'तुतारी' वाजणारच, असा दावा करत आहेत. आमदार नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्याकडे गेले आहेत. महायुतीमधील नगर जिल्ह्याचे भाजपचे मंत्री त्रास देत असल्याचा आरोप करत सुरूवातीला आमदार लंके यांनी अजितदादांकडे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्याविषयी तक्रार केली होती.
भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी यावर चर्चा करून देखील तोडगा न निघाला नाही. त्यामुळे आमदार लंकेंनी अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांची भेट घेत नगर दक्षिणमध्ये विखे पिता-पुत्रांना आव्हान देण्याचे ठरवले. आमदार लंकेंनी यानुसार महाविकास आघाडीच्या बैठकांना देखील हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आमदार लंकेंच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार असल्याचे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार नीलेश लंकेंना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवायची असल्यास, त्यांना आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असे म्हटले जात आहे. राष्ट्रवादी नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (AJit Pawar) यांनी देखील आमदार लंकेंना खासदारकी लढवायची असल्यास, त्यांना अगोदर आमदारकीचा राजीनामा द्यावा लागेल, असे सूचित केले आहे. आमदार लंकेंना हाच मुद्दा सध्या डोकेदुखी ठरला आहे.
आमदार लंकेंनी शरदचंद्र पवार पक्षाकडून खासदारकीची उमेदवारी केल्यास त्यांची आमदारकीचा द्यावा लागणार आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आमदार लंके स्वतः कायदेतज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. परंतु शरद पवार देखील स्वतः कायदेतज्ज्ञांच्या संपर्कात आहेत. तत्पूर्वी आमदार लंकेंनी मतदारसंघात गाठीभेटींवर भेट देत आहेत. आमदार लंकेंबरोबर असलेल्या पहिल्या फळीत पदाधिकारी देखील मतदारांच्या गाठीभेटींसाठी सक्रिय झाले आहेत.
आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात 'जनसंवाद' यात्रा सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. ही यात्रा एप्रिलच्या पहिल्या तारखेपासून सुरू होईल, असे सांगितले जात आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात, मोठे शहर आणि मोठ्या गावातून जाणार असल्याचे सांगितले जात आहे. तसे नियोजन केले जात आहे. नीलेश लंकेंची 'जनसंवाद' यात्रा सुरू झाल्यानंतर आमदारकीचा राजीनामा देतील, असे सांगितले जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर आमदार नीलेश लंके हे अजित पवार गटाबरोबर गेले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षचिन्ह घड्याळ अजितदादांना दिले. शरद पवार यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने घड्याळ पक्षचिन्हाला अटी आणि शर्ती घातल्या. आमदार लंके सुरुवातीला अजितदादांबरोबर राहिले. आता ते पक्षांतर करत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीवर सर्वोच्च न्यायालयात बराच कायदेशीर खल सुरू आहे. याचा फटका आमदार लंकेंना पुन्हा पक्षांतर करताना बसू शकतो.
खासदारकी लढवताना ही कायदेशीर अडचण येऊ नये म्हणून नीलेश लंकेंना आमदारकीचा राजीनामा द्यावाच लागणार आहे, असे शरद पवार (Sharad Pawar) गटातील कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे. तसे न केल्यास आमदार लंके खासदारकीच्या उमेदवारीसाठी अपात्र ठरण्याची शक्यता आहे. तसेच नीलेश लंकेंनी आमदारकीचा राजीनामा देताच सत्ताधारी पारनेर मतदारसंघात लोकसभेबरोबर विधानसभा निवडणुकीचा देखील प्रक्रिया राबवू शकतात. या सर्व शक्यतांची गणिते शरद पवार गटाकडून तपासली जात आहेत. यात आता दिलासादायक बाब समोर आली.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अकोला विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीला स्थगिती दिली आहे. सत्ताधाऱ्यांनी येथील रिक्त विधानसभेच्या जागेची निवडणूक लोकसभेबरोबरच घेण्याचा तयारी केली होती. परंतु त्याला आव्हान देण्यात आले. यानंतर नागपूर खंडपीठाने अकोला विधानसभेच्या निवडणूक प्रक्रियेला स्थगिती दिली. हा संदर्भ नीलेश लंके यांच्या आमदारकीच्या राजीनाम्यानंतर त्यांच्या मतदारसंघाबाबत घेतला जाण्याची तयारी शरद पवार गटाकडून केल्याची सूत्रांची माहिती आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.