Hiraman Khoskar, K. C. Padvi  Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Nashik Congress : दोन काँग्रेस नेत्यांमध्ये आर्थिक व्यवहारातून जुंपली; भाजपच्या हाती आयते कोलीत..!

Controversy from financial transactions : के. सी. पाडवी आणि हिरामण खोसकर यांच्यातील वाद चव्हाट्यावर; नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरातांकडे धाव.

Arvind Jadhav

Nashik News : महाविकास आघाडी सरकार असताना माजी कॅबिनेट मंत्र्याने कामे मिळवून देण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये जमा केले; परंतु ना कामे मिळाली, ना माजी मंत्री पैसे परत करण्याचे नाव घेत आहेत. यामुळे आदिवासी ठेकेदार, कंत्राटदार हैराण झाले असून, हे पैसे वसूल करण्यासाठी इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी थेट नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरातांकडे धाव घेतली आहे.

आमदार हिरामण खोसकर हे काँग्रेसचे आमदार असून, के. सी. पाडवी हे अक्कलकुवा मतदारसंघातून काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. महाविकास आघाडीच्या सत्ता काळात पाडवी यांचा दीर्घकालीन काँग्रेसशी संबंध लक्षात घेता, त्यांना आदिवासी विकासमंत्री म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. खोसकरांकडून आता जे आरोप झाले आहेत, ते याच काळातील आहेत.

आमदार हिरामण खोसकर म्हणाले, ‘पाडवी मंत्री असताना त्यांनी नाशिकमधील अनेक ठेकेदार, बिल्डरांकडून कामे मिळवून देण्याच्या नावाखाली पैसे घेतले. हा आकडा 10 कोटी रुपयांच्या पुढे आहे. मात्र, कामे मिळाली नाहीत अन् आता पाडवी पैसेही परत करीत नाहीत. स्थानिक आमदार या नात्याने अनेकांनी माझ्याकडे पाहून पैसे दिलेत. आता ते पैसे देत नसल्याने अडचणीत सापडणारे माझ्याकडे चकरा मारत आहेत.

याबाबत प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र, परस्पर सहमतीने हे प्रकरण मिटवा, असे सांगण्यात आले. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी पाडवी यांची नावे चर्चेत आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यापूर्वी पक्षाने त्यांच्याकडून पैशांची वसुली करावी. पाडवी यांनी पैसे दिले तरच प्रकरण मिटेल, असे खोसकर म्हणाले.

पैसे मिळाले नाही तर आम्हाला कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल, असा इशारा खोसकर यांनी दिला. दरम्यान, या आरोपांबाबत के. सी. पाडवी यांच्याशी 'सरकारनामा'ने संपर्क केला असता तो होऊ शकला नाही. खोसकरांच्या या भूमिकेमुळे भाजपलाही एक नवं हत्यार सापडलं असून, आगामी काळात भाजपकडून त्याचा काय वापर होतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचा पाय आणखी खोलात...

दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचे जे काही दोन चार आमदार आहेत. त्यांच्यातच हा वाद सुरू झाला असून, आर्थिक आरोपांमुळे भाजप आपली यंत्रणा कार्यान्वित करू शकते. काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यावेळी खोसकरसुद्धा चव्हाणांसोबत जाणार, अशा चर्चा सुरू झाल्या होत्या.

मात्र, परदेश दौऱ्यावरून आल्यानंतर खोसकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. आपण काँग्रेस सोडून कोठेही जाणार नाही, असे स्पष्ट करीत खोसकरांनी वरिष्ठ नेत्यांच्या मुंबईत गाठीभेटीसुद्धा घेतल्या होत्या. मात्र, आता खोसकरांनी काँग्रेसचा वर्षानुवर्षे गड राखणाऱ्या नेत्यालाच टार्गेट केले असून, यामुळे काँग्रेस पक्षातही खळबळ उडाली आहे.

भाजपच्या हातात आयते कोलीत!

ईडी आणि आयकरचा वापर करीत विरोधकांना संपवण्याचे काम भाजपकडून होत असल्याचा आरोप सातत्याने होतो आहे. त्यातच आता काँग्रेसचे दोन आमदार आर्थिक वादातून एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. अशावेळी भाजप ही संधी हातची जाऊ देणार नाही, अशी चर्चा आहे. कधी काळी काँग्रेसचा गड असलेल्या उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसचे तीन - चार आमदारच राहिले आहेत.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT