Sudhakar Badgujar dada bhuse advay hire apurv hire sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Dada Bhuse Vs Sudhakar Badgujar : जिल्हाप्रमुख होताच बडगुजर ठरले दादा भुसेंचे तिसरे बळी? शिंदे अन् ठाकरे गटातील वाद टोकाला

Sampat Devgire

नाशिक : 29 फेब्रुवारी 2024 | शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar ) यांची जिल्हाप्रमुख पदी बढती झाली. त्यानंतर लगेचच त्यांच्या मागे पोलिसांचा ससेमिरा सुरू झाला आहे. पोलिसांनी बडगुजर यांना कारवाईचे गिफ्ट दिले आहे. नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना पक्ष विस्तारासाठी जंग जंग पछाडत आहे. त्यासाठी शिवसेना ठाकरे गट हे त्यांचे प्रमुख टार्गेट आहे. विविध नेत्यांना अनेक मार्गाने आपलेसे करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरूच आहेत. अशातच पालकमंत्री दादा भुसे आपल्या विरोधकांना शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून थेट लक्ष्य करीत आहेत.

शिवसेना उपनेते अद्वय हिरे ( Advay Hire ) तसेच त्यांचे बंधू माजी आमदार अपूर्व हिरे यांच्यानंतर शिवसेनेचे जिल्हाप्रमुख व माजी नगरसेवक सुधाकर बडगुजर ( Sudhakar Badgujar ) हे भुसे यांच्या राजकारणाचे तिसरे बळी ठरल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तीन दिवसांपूर्वी बडगुजर यांची जिल्हाप्रमुख पदी नियुक्ती झाली होती. त्यानंतर लगेचच गेले काही दिवस सातत्याने चर्चेत असलेल्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता बरोबर पार्टीला उपस्थित राहिल्याबद्दल बडगुजर यांच्या विरोधात नाशिक पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा दाखल केल्याने आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ होणार आहे. या निमित्ताने ठाकरे गट विरोधात मुख्यमंत्री शिंदे गट यांच्यातील राजकारण अतिशय टोकाला गेल्याचे दिसून येते. त्याचे अतिशय नकारात्मक पडसाद कार्यकर्ते आणि नागरिकांमध्ये देखील उमटले आहेत.

मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी सलीम कुत्ता उर्फ मोहम्मद सलीम मीरा मोईद्दीन शेख हा 2016 मध्ये पॅरोलवर सुटला होता. यावेळी एका फार्म हाऊसवर झालेल्या पार्टीत सलीम कुत्ता आणि बडगुजर एकत्र आले होते. त्यांच्या नृत्याचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता. आमदार नितेश राणे यांनी याबाबत विधानसभेत प्रश्न मांडला होता. त्यावरून लगेचच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे या सबंध प्रकरणाला राजकारणाचा वास आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

मात्र, या निमित्ताने नाशिकच्या राजकारणात वर्चस्व निर्माण करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यातील राजकीय स्पर्धा किती तीव्र झाली आहे हे दिसून येते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे दोन्ही गट समोरासमोर येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे गटाच्या मार्गात काटे पेरण्याचे काम केले जात असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेला आले आहे.

यासंदर्भात पालकमंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) यांच्या राजकीय कार्यपद्धतीची नवी चुणूक दिसून येते. जे जे विरोधात आहेत, त्यांना शिंदे गटात या आणि 'गिफ्ट' घ्या असा हा मेसेज आहे. विरोधात गेल्यास काय होते याचे देखील उदाहरण आहे. मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते अद्वय हिरे यांनी भुसे यांना आव्हान दिले होते. त्यानंतर त्यांच्यावर देखील विविध गुन्हे दाखल झाले.

त्याप्रमाणेच बडगुजर यांची सलीम कुत्ता प्रकरणात यापूर्वी चौकशी झाली होती. त्यानंतर हे प्रकरण शांत झाल्यासारखे वाटत होते. पण, बुधवारी अचानक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकाराने गुन्हा दाखल झाल्याने बडगुजर आता पुन्हा एकदा न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची चिन्हे आहेत.

( Edited By : Akshay Sabale )

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT