Eknath Shinde-Devendra Fadnavis-Ajit Pawar-Balasaheb Thorat Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Thorat on Firing Incident : 'दोन उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायचंय, सत्तेच्या महत्त्वाकांक्षेमुळे तिघेही अपयशी'

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील रक्तरंजित गुन्हेगारी आणि त्यातील राजकारणावर आमदार थोरातांचे मार्मिक भाष्य

Pradeep Pendhare

Nagar News : महाराष्ट्रातील रक्तरंजित गुन्हेगारी आणि त्यातील राजकारणावर काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजप आणि महायुतीच्या राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. "राज्याच्या सत्तेत सहभागी झालेल्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा आहे. यातून सत्तेसाठी एकत्र आलेले तिघेही अपयशी ठरले आहेत. सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहेत. हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे," अशी टीका आमदार थोरात यांनी केली. (Rulers become criminals, it is dangerous for Maharashtra: Balasaheb Thorat)

राहुरीतील वकील राजाराम आणि त्यांची पत्नी मनीषा आढावा यांच्या हत्येच्या निषेधार्थ आणि वकील संरक्षण कायद्यासाठी नगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत आहेत. या मोर्चात आमदार बाळासाहेब थोरात सहभागी झाले होते. तत्पूर्वी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील वाढत्या गुन्हेगारीवर भाष्य केले. काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, संजय झिंजे, मनोज गुंदेचा, ज्ञानदेव वाफारे आदी उपस्थित होते. (Thorat on Firing Incident)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हे फेसबुकवर लाइव्ह असताना गोळ्या झाडून झालेली हत्या, भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) तालुकाध्यक्षांसह काही कार्यकर्त्यांवर पोलिस ठाण्यातच केलेला गोळीबार, जळगाव येथे भाजपच्या नगरसेवकावर झालेला गोळीबार, राहुरीतील वकील आढाव दाम्पत्य हत्या प्रकरणाचा संदर्भ घेत आमदार बाळासाहेब थोरात यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या गृहखात्याला चांगलेच धारेवर धरले.

आमदार थोरात म्हणाले, "राज्य सरकारचा गुन्हेगारांवर धाक नाही. राज्यकर्ते, सत्ताधारीच गुन्हेगार होत आहे. त्यातच त्यांचे सहकारी, कार्यकर्ते गुन्हेगारी कृती करत आहेत. हे महाराष्ट्रासाठी धोकादायक आहे. यातून गृहखात्याचे अपयश दिसते. आता जनतेने आवाज उठवण्याची गरज आहे. सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी जनतेचे न्यायालय मोठे आहे. तिथे खरा न्याय मिळणार आहे."

राज्य सरकारमध्ये तिघे सामील झाले आहेत. सत्तेसाठी हे तिघे एकत्र आहेत. यातील एक मुख्यमंत्री झाले आहेत. उर्वरित दोघा उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्री व्हायची महत्त्वाकांक्षा आहे. या दोघा उपमुख्यमंत्र्यांपैकी एक माजी मुख्यमंत्री आहे. ते सत्तेची महत्त्वाकांक्षा बाळगून आहेत. यातून या तिघा सत्ताधाऱ्यांना जनतेला न्याय देण्याचा हेतू दिसत नाही. सत्तेसाठी एकत्र आल्याने हे सरकार सर्वच पातळीवर अपयशी ठरले आहे. भाजप नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेले गृहखाते सर्वच पातळीवर अपयशी ठरल्याचीही टीका आमदार थोरात यांनी केली.

आमदार गायकवाडांच्या आरोपांचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा करावा

भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी पोलिस ठाण्यात शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील कार्यकर्त्यावर गोळीबार केला. या गोळीबारानंतर भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरदेखील आरोप केले. ही गंभीर बाब आहे. याचा खुलासा मुख्यमंत्र्यांनी केला पाहिजे,' अशी मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.

मुख्यमंत्र्यांनी जवळच्या माणसांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे

'मुख्यमंत्र्यांसह मंत्री, आमदार, खासदारांभोवती नेहमीच गर्दी असते. या गर्दीतील प्रत्येक व्यक्ती लोकप्रतिनिधी लक्षात ठेवू शकत नाही, परंतु मुख्यमंत्रीसारख्या पदावर असलेल्या व्यक्तींनी जवळचा माणूस असेल, तर त्याची पार्श्वभूमी तपासलीच पाहिजे. कोण कोणत्या प्रवृत्तीचा आहे, याचे रेकाॅर्ड या पदावरील व्यक्तींच्या यंत्रणेने तयार गेले पाहिजे', असेही आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.

Edited By : Vijay Dudhale

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT