Satara News : सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या सातारा जिल्हा दाैऱ्यात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून काॅंग्रेस आणि शरद पवार गटावर हल्लाबोल करण्यात आला. आमदार जयकुमार गोरे यांनी विरोधी पक्षातील राजकीय नेत्यांचा समाचार घेतला. कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघात मंत्री चव्हाण आणि आमदार गोरे यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देत काॅंग्रेसचे सातारा जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव यांनी पलटवार केला. पराभवाची हॅट्ट्रिक हीच भाजपचे डाॅ. अतुल भोसलेंची क्षमता आहे, असा टोला डॉ. जाधव यांनी लगावला. (Ravindra Chavan should check his political height while criticizing Prithviraj Chavan : Dr Suresh Jadhav)
कराड तालुक्यातील शेणोली आणि वाठार येथील कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका केली होती. त्याबाबत काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ. सुरेश जाधव म्हणाले, मंत्री चव्हाण यांनी पृथ्वीराजबाबांवर टीका करताना आपली तेवढी पातळी व उंची आहे का हे आधी तपासावे. खरेतर मंत्री चव्हाण आणि आमदार गोरेंच्या टीकेमुळे आता कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाण आणि डाॅ. अतुल भोसले यांच्या कार्यकर्त्यांमध्ये सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
जयकुमार गोरेंना डिवचले
राज्यात विरोधी आमदारांना निधी देताना मंत्री किती दुजाभाव करतात, हे सर्वांना माहीत आहे. लोकप्रतिनिधींना जनतेने निवडून दिले असताना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निधी मिळत असेल, तर हा त्या भागातील जनतेचा अपमान आहे. तसेच, मंत्र्यांनी टीका करताना क्षमता नसल्याचे म्हटले. पण, त्यांना कदाचित माहिती नसेल की व्यासपीठावर त्यांच्या आजूबाजूला बसलेले सर्व आताचे भाजप नेते यांची क्षमता आणि कुवत पृथ्वीराजबाबांमुळेच निर्माण झाली आहे. त्यामुळेच आज ते भाजपमध्ये नेते म्हणून मिरवित आहेत. पण, त्यांचे ते नेतेपण होण्याची क्षमता पृथ्वीराजबाबांनी त्यांना मिळवून दिली आहे, याची माहिती आधी मंत्र्यांनी घ्यावी, असे म्हणत आमदार जयकुमार गोरेंना काॅंग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी डिवचले.
डाॅ. अतुल भोसलेंवर टीका
कराड जिल्हा होण्यासाठी जसा विकास अपेक्षित असतो, असा सर्वांगीण विकास पृथ्वीराजबाबांनी कराडमध्ये केला आहे. त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणला आहे, त्यामुळे पृथ्वीराजबाबांची क्षमता काय आहे, हे कराडची जनता ओळखून आहे. याउलट मंत्री ज्यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यांच्या पराभवाची हॅट्ट्रिक कराडच्या जनतेने केली आहे. कारण, कराड दक्षिणच्या जनतेला त्यांची क्षमता माहिती आहे, असा टोला डॉ. जाधव यांनी डाॅ. अतुल भोसले यांना लगावला.
रवींद्र चव्हाण काय म्हणाले होते?
मी शहरी भागात वावरलो असलो, तरी मला शेती आणि बैलांचा नाद आहे. बैलगाडी शर्यतीवेळी एकास एक बैल असेल, तर ती शर्यत जिंकता येते. बैल थकलेला असेल तर शर्यत जिंकणे कठीण होते. तशाच प्रकारे पूर्ण क्षमता संपलेला लोकप्रतिनिधी असेल, तर त्या मतदारसंघातील परिस्थिती काय असेल, हे सांगायला नको, अशी टीका नाव न घेता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी केली होती.
Edited By : Vijay Dudhale
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.