Sanjay Raut Sanjay Raut
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut News : नगरमधील आमदारांच्या साडू - व्याह्यांच्या गुंडगिरी विरोधात राऊत आक्रमक ; काढणार महामोर्चा...

Nagar Shivsena : मरगळेल्या नगर शिवसेनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न.

Pradeep Pendhare

Sanjay Raut News : नगर शहरातील आमदारांच्या साडू - व्याह्यांच्या गुंडगिरीला खासदारांची साथ मिळत असल्याची टीका शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तर मरगळेल्या नगर शिवसेनेत प्राण फुंकण्याचा प्रयत्न यावेळी त्यांनी केला. यासाठी गुंडगिरीविरोधात ठाकरे गट महामोर्चा काढणार असून मोर्चाला स्वतः येणार असल्याचे राऊत यांनी जाहीर केले. (Sanjay Raut News)

याशिवाय शहरासह जिल्ह्यात तीन ते चार शिवसेनेचे आमदार पाहिजेत, असे सांगून शिवसेना पदाधिकार्‍यांची जबाबदारी राऊत यांनी वाढवली. परंतु ही जबाबदारी शिवसेनेचे पदाधिकारी कशी पार पाडतील, हे येणारा काळ दाखवून देणार आहे. खासदार संजय राऊत यांच्या उपस्थित ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मेळावा नगरमध्ये पार पडला.

खासदार राऊत यांनी यावेळी नगर शहरातील गुंडगिरीवर भाष्य करताना शिवसेनेचे दिवंगत उपनेते अनिलभैय्या राठोड यांची उणिव जाणवत असल्याचे सांगितले. खासदार राऊत म्हणाले, "नगर शहरातील गुंडगिरी वाढली आहे. अनिलभैय्या असते तर गुंडगिरीचा रस्त्यावर उतरून सामना केला असता. त्यांचा सामान्य माणसांना आधार वाटायचा.

आता त्यांच्यापश्चात ही जबाबदारी पदाधिकारी आणि शिवसेना कार्यकर्त्यांची आहे. त्यांनी शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक घडवले आहेत. मग तुम्ही लोकांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर का उतरत नाही ? असा सवाल राऊत यांनी यावेळी केला". खासदार राऊत यांनी जमिनी लाटल्याच्या प्रकरणावर भाष्य करताना पोलीस प्रशासनाला टार्गेट केले. बापाचे राज्य असल्यासारखे कोणत्याही जमिनीवर ताबा घ्यायचा.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पोलीस प्रशासनाच्या मदतीने दादागिरी करायची. लोकांचे खून करायचे. खून केल्यावर परत गुन्हेगारांना अटक होवू नये म्हणून पोलिसांवर दबाव आणायचा. या गुंडगिरीविरुद्ध मग तो आमदार असेल किंवा खासदार असेल, हे साडू असतील नाहीतर व्याही असतील, या सगळ्या गुंडगिरी आणि झुंडगिरीविरोधी महामोर्चा काढणार आहोत. हा शिवसेना महाविकास आघाडीचा मोर्चा अनिलभैय्यांना श्रद्धांजली असेल", असे खासदार राऊत यांनी म्हटले.

"शिवसेना कार्यकर्त्यांचे कान टोचताना नुसते अनिलभैय्यांचे नाव घेऊ नका. त्यांचे पदाधिकारी, चिरंजीव, सहकारी यांना सांगणे आहे की, त्यांच्यासारखे वागायला आणि जगायला शिका. पक्ष मोठा करालया शिका. बघू या काय होते, असे खूप गुंड पाहिलेत. शिवसेनेचा जन्मच गुंडगिरीतून झाला आहे. रस्त्यावरचा जन्म झाला आहे. दगड खात आणि दगड मारण्यातच शिवसेनेचा जन्म गेलाय, ते आम्हाला सांगू नका.

नगरमध्ये मी सुद्धा लक्ष घालणार आहे. विधानसभेपासून ते लोकसभेपर्यंत शिवसेनेचा विजयाचा भगवा झेंडा कसा फडकेल, हे मी पाहणार आहे. लोकसभेची जागा शिवसेना घेणार आहे.", असे सांगून खासदार राऊत यांनी नगरच्या शिवसेनेची मरगळ दूर करण्याचा प्रयत्न केला. "लोक बोलायला घाबरतात. कोणाची गुंडगिरी, कोणाचे बाॅस, येऊ देत समोर आम्ही देखील येतोय नगरमध्ये. आलो नाही, तर नगरमध्येच आहे. तुमचा संग्राम असेल, तर आमचा महासंग्राम आहे.

आमच्या आसपास फिराल, तर याद राखा. शिवसेनेने येथे मोहीम राबवली पाहिजे. ज्यांच्या जागा जबरदस्तीने ताब्यात घेतल्या आहेत, त्यांना आवाहन करा. शिवसेनेच्या कार्यालयात या आणि माहिती द्या. एक दिवस ठरवा आणि सगळी आपली कागदपत्रे घेऊन शिवसेना कार्यालया या. ते गोळा करा आणि तो मोर्चा घेऊन ती सर्व कागदपत्रे पोलीस प्रमुखाच्या टेबलावर आपटा. गृहमंत्र्यांच्या टेबलावर आपटा, हे तुमचे राज्य.

पण हे राज्य जाणार आहे हे त्यांच्या लक्षात आणून द्या. हे राज्य टिकणार नाही. हे राज्य औटघटकेचे आहे. पापातून तयार झालेले राज्य आहे. नगरमध्ये सांगायला आलो आहे, आतापर्यंत हा जिल्हा सम्राटांचा होता. पण यावर आता शिवसेनेचे राज्य येईल. शेतकरी, कष्टकरी आणि सामान्यांचे राज्य येईल, हे लक्षात ठेवा", असा इशारा खासदार राऊत यांनी दिला.

साखर - डाळ वाटणार्‍यांना लोक कसे काय मत देवू शकतात

नगरमधील खासदार, आमदारांना विचारा काय काम केले आहे. नगरमधील रस्ते काय भयंकर आहेत. कोट्यवधी रुपये आणले रस्त्यांसाठी, ते कोठे गेले. काय प्रकल्प आणले, हे प्रश्न विचारले पाहिजे. निवडणुका आल्या म्हणून साखर आणि डाळ वाटत आहेत आणि लोक त्यांना मत देत आहेत.

हे शिवसेनेने थांबवले पाहिजे. दोन-चार लोकांच्या हातात राजकारण, बाकी सगळे गुलाम आणि लढत राहायचे, घोषणा द्यायच्या. कुठेतरी हे थांबवलाय पाहिजे, अशी अपेक्षा खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले.

(Edited by Amol Sutar)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT