Sanjay Raut Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Sanjay Raut : बबनराव घोलप कुठे गेले ? संजय राऊत म्हणाले…

Arvind Jadhav

Sanjay Raut : ठाकरे शिवसेना गटाचे राज्यव्यापी अधिवेशन नाशिकमध्ये पार पडले. माजी मंत्री बबनराव घोलप यांच्या भागात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे येऊन गेले. मात्र, बबनराव घोलप कोठेच दिसले नाहीत. त्यांचा ठाकरे शिवसेनेबरोबर दुरावा झाला काय ? असा प्रश्न उपस्थित करताच संजय राऊत म्हणाले, ‘बिल्कूल नाही. त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन झाले असून, ते बाहेर पडू शकत नाहीत. एवढ्याच एका कारणांमुळे घोलप सध्याच्या कार्यक्रमांपासून दूर राहिले,’ असे राऊत यांनी स्पष्टीकरण दिले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी हुकली, ही घोलपांची खंत अजून कायम आहे. त्यासाठी प्रयत्नशील असलेल्या बबनराव घोलप यांना पक्षाकडून पाहिजे तसा प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाने घोलप यांना संपर्कप्रमुखपदावरून हटवल्यानंतर त्यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. यामुळे शिवसेना आणि घोलप यांच्यातील अंतर वाढल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

त्यातच मागील तीन दिवसांपासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नाशिकमध्ये आहेत. काळाराम मंदिर, गोदाआरती करण्यापूर्वी ते भगूर येथे गेले होते. अगदीच बबनराव घोलपांच्या घरावरूनच..! यानंतर शिवसेनेचे राज्यव्यापी अधिवेशन आणि ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यात कोठेही घोलप दिसले नाहीत. त्यामुळे पत्रकारपरिषदेत हा प्रश्न राऊत यांना विचारण्यात आला. त्यावेळी ते कोठेही गेले नाहीत.

त्यांच्या डोळ्याची शस्त्रक्रिया झाली असून, त्यांना बाहेर पडणे शक्य नसल्याने ते या कार्यक्रमापासून दूर राहिले. याबाबत नयना घोलप यांच्याशी बोलणं झालं. तर माजी आमदार योगेश घोलप यांचीही भगूर येथे भेट झाल्याचे राऊत म्हणाले. दरम्यान, संपर्कप्रमुखपदावरून हटवलं आणि उपनेत्याच्या पदावरून घोलप यांनी राजीनामा दिला असल्याच्या मुद्द्यावर राऊत यांनी भाष्य केले नाही.

देवळाली या मतदारसंघाचे पंचवीस वर्षे घोलप यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. त्यानंतर त्यांचे पुत्र योगेश घोलप पाच वर्षे आमदार होते. तीस वर्षांच्या कालावधीत त्यांना शिवसेनेने राज्याचे समाजकल्याणमंत्री म्हणून काम करण्याची संधी दिली होती. गत विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरोज अहिरे यांच्याकडून योगेश घोलप पराभूत झाले होते.

घोलप गेली दहा वर्षे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक होते. त्यांना उद्धव ठाकरे उमेदवारी देतील, अशी शक्यता होती. मात्र, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत प्रवेश दिला. त्यामुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघात उतरण्याच्या घोलप यांच्या प्रयत्नांना खो बसला आहे.

(Edited by Amol Sutar)

R...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT