Chandrashekhar Bawankule Sarkarnama
उत्तर महाराष्ट्र

Chandrashekhar Bawankule : 'हा' उपक्रम लोकसभेत भाजपला प्रचाराविना मिळवून देणार 'विजय' ?

संपत देवगिरे : सरकारनामा

BJP Politics : सातत्याने संघटनात्मक पातळीवर अनेक उपक्रम राबविणाऱ्या भाजपला 'निवडणूक मशीन' असे देखील संबोधले जाते. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आता अशाच एका उपक्रमाचा 'मंत्र' कार्यकर्त्यांना दिला आहे. तो यशस्वी झाल्यास लोकसभा निवडणुकीत भाजप पक्ष प्रचाराविना विजयी होऊ शकतो, असे बोलले जाते.

आगामी लोकसभा निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवायचाच या इर्षेने भाजप पक्ष सक्रिय आहे. त्यासाठी ते विविध तंत्रांचा उपयोग करतात. सत्तेवर असलेल्या सर्व पदांचा उपयोग करण्याचे नियोजन हा पक्ष करत असतो. असाच एक उपक्रम उद्यापासून राज्यभर सुरू होणार आहे. त्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियुष गोयल, रावसाहेब दानवे, डॉ. भारतीताई पवार यांच्यासह सर्व मंत्री, खासदार यात सक्रिय भाग घेतील.

हा उपक्रम यशस्वी झाल्यास भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत विनाप्रचार यश मिळू शकते. "गाव चलो अभियान"असे या उपक्रमाचे नाव आहे. या माध्यमातून भाजप प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणार आहे. त्यात नेत्यांचा गावात एक दिवसाचा मुक्काम असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या योजनांची माहिती नागरिकांना देण्यात येईल. मोदींची गॅरेंटी मतदारांपर्यंत पोहचविण्याचा हा संकल्प आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

भारतीय जनता पक्षातर्फे 4 ते 11 फेब्रुवारी या काळात व्यापक जनसंपर्कासाठी 'गाव चलो अभियान' राबविणार आहेत. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे स्वतः अमरावती जिल्ह्यातील साऊर येथे एक दिवस राहणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उत्तम संघटनात्मक बांधणी करत, विकासाचा अजेंडा डोळ्यासमोर ठेवून भाजप कार्य करत आहे.

तळागाळातील प्रत्येक मतदारापर्यंत मोदी सरकारचे मागील 10 वर्षातील प्रभावी कार्य, जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्ती, विकसित भारताचा संकल्प सांगणाऱ्या यंदाच्या अंतरिम अर्थसंकल्पातील ठळक तरतुदी ही सर्व माहिती पोचविण्याच्या उद्देशाने ‘गाव चलो अभियान’ हाती घेण्यात आले आहे. यामध्ये प्रत्येक लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख कुटुंबांपर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोचतील आणि भाजपचे काम मतदारांना सांगतील.

असे झाल्यास एका कुटुंबात सरासरी चार मतदार गृहीत धरल्यास भाजप 14 लाख मतदारांशी संपर्क करेल. यातील निम्म्या मतदारांनी जरी भाजपला मतदान केले, तर विनाप्रचार भाजपचा खासदार विजयी होऊ शकतो. त्यामुळे 'निवडणूक मशीन' अशी प्रतिमा असलेल्या भाजपचा हा उपक्रम कार्यकर्ते व पदाधिकारी किती गांभीर्याने घेतात आणि तो खरोखर किती यशस्वी होतो हा चर्चेचा विषय आहे.

(Edited by Amol Sutar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT