Ambadas Danve  sarkarnama
विदर्भ

Shivsena Vs BJP : अंबादास दानवेंनी केलं आरोग्य विभागाचं 'ऑपरेशन'

संपत देवगिरे- सरकारनामा ब्युरो

Maharashtra Assembly session 2023 : हिवाळी अधिवेशनात राज्य सरकाच्या मंत्र्यांवर हल्ला करण्याची एकही संधी विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve ) यांनी सोडली नाही. आरोपांची सरबत्ती करत आरोग्य विभागात नियुक्त्या देताना ज्यांनी ‘दिले’ त्यांनाच पद 'दिले'. ज्यांनी नाही ‘दिले’ त्यांना काहीच नाही ‘दिले’. विरोधीपक्ष नेत्यांनी इशाऱ्यामध्ये केलेल्या आरोपांमुळे सभागृहातील मंत्रीही अस्वस्थ झाले.

विधान परिषदेच्या हिवाळी अधिवेशनाचा बुधवारी समारोप झाला. यावेळी विरोधी पक्षांच्या प्रस्तावावर दानवे यांनी चर्चेला प्रारंभ केला होता. यावेळी त्यांनी आरोग्य विभागावर आरोपांच्या फैऱ्या झाडत अक्षरशः 'ऑपरेशन'च केलं. राज्यातील 1200 वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या पदांचे समायोजन करण्यात आले. त्यात एका मंत्र्यांच्या ओएसडीला भेटावे लागते.

त्याचे समाधान केल्याशिवाय समायोजन होत नाही. तो मंत्री कोण, त्याचा ओएसडी कोण? असा सवाल दानवे यांनी केला. 'एमपीएससी'तर्फे 14 वैद्यकीय उपसंचालकांची निवड झाली. लगेच यांची डिमांड सुरू झाली. जे डिमांड पूर्ण करू शकत नाहीत त्यांच्या नियुक्त्या पुणे, मुंबईत साईड पोस्टला केल्याचा आरोप दानवे यांनी केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शहर असलेल्या नागपूरच्या आरोग्य व्यवस्थेबाबत दानवे यांनी प्रश्न उपस्थित करून फडणीसांना टार्गेट केले. नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावर, आरोग्यव्यवस्थेचा कसा बोजवारा उडाला, किती नागरिकांना औषधे व डॉक्टरांअभावी आपले प्राण गमवावे लागले, याची चर्चा प्रवीण दटके यांनीच उपस्थित केली. ते काही विरोधी पक्षाचे नाहीत. सत्ताधारीच आहेत. नागपूर विदर्भात नाही का?. गेल्या सहा महिन्यांतील मृत्यूंची संख्या पाहिली तर अतिशय लाजीरवाणी बाब आहे. अजून औषधांची खरेदी झालेली नाही, असे दानवे म्हणाले.

सरकारने महात्मा फुले आरोग्य योजनाची मोठी जाहिरात केली आहे. रुग्णांना पाच लाखांपर्यंत उपचार मोफत असल्याचे सरकार सांगते. मात्र, पाच लाखांपर्यंत खर्च झालेली एक तरी घटना दाखवा. महात्मा फुले आरोग्य योजनेत दवाखान्यांचे बिल द्यायचे असेल तर एक लाख रुपये प्रती बेड द्यावे लागतात. तरच त्या रुग्णालयाचा समावेश केला जातो. सरकार म्हणाले, आम्ही रुग्णालयांचे एवढे प्रस्ताव मंजूर केले. मात्र ज्यांनी ‘दिले’ त्यांनाच ‘दिले’. ज्यांनी नाही ‘दिले’, त्यांना काहीच नाही ‘दिले’, असा गंभीर आरोप दानवे यांनी केला.

आरोग्य उपसंचालकांची पदे रिक्त ठेवण्यात आली आहेत. चांगल्या अधिकाऱ्यांना बाजूला बसवले जाते. ते प्रामाणिक आहेत, रुग्णाला देव मानतात. असे काही चांगले अधिकारी महाराष्ट्रात आहेत. मात्र सरकारला ते चालत नाही. उपसंचालकांच्या पदांसाठी बोली लावली जाते. त्यासाठी लिलाव होईल, त्यानंतर ती पदे भरली जातील, असा आरोप दानवे यांनी केला.

(Edited By Roshan More)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT