Nagpur, 01 February : महायुतीत कोणाला घ्यायचे आणि कोणाला नाही, याचे धोरण ठरले आहे. असे असताना कोणीही उठतो अन् काहीही मागणी करतो, इच्छा व्यक्त करतो हे योग्य नाही. त्यामुळे यावर कोणीही मीडियासमोर रस्त्यावर चर्चा करू नये, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांना सुनावले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे, अशी इच्छा संजय शिरसाट (Sanjay Shirsat) व्यक्त केली. शिवसेना वेगवेगळ्या झाल्या, याचे दुःख आहे. मात्र, एकत्र येण्याची हीच योग्य वेळ असल्याचे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केले आहे. त्यावर बावनकुळे यांनी ताबडतोब प्रतिक्रिया दिली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) म्हणाले, कोणाला सोबत घ्यायचे, कोणासोबत राहायचे हा शिंदे गटाचा प्रश्न आहे. मात्र, महायुतीचे पक्षप्रवेशासंदर्भात धोरण ठरले आहे. महायुतीच्या विरोधात लढलेले आणि प्रखर टीका टिपण्णी केलेल्या नेत्यांना पक्षात घ्यायचे नाही, असे ठरले आहे. या उपरही कोणाला महायुतीत घ्यायचे असल्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घ्यायचा आहे.
एखाद्याला पक्षात प्रवेश देत असताना महायुतीचा फायदा होणार असेल तर आणि भविष्यात कोणाचीही राजकीय अडचण होणार नाही, याचीही काळजी घ्यायची आहे. हे धोरण संजय शिरसाट यांनाही माहिती आहे. त्यामुळे अशा चर्चा करण्यात, मीडियामधून मागणी करण्यात काही अर्थ नाही. आमदार शिसारट यांनी रस्त्यावर चर्चा करणे थांबवावे, असा सल्लाही बावनकुळे यांनी त्यांना दिला.
सध्या राज्यात ऑपरेशन टायगरची मोठी चर्चा आहे. शिवसेनेचे अनेक खासदार महायुतीच्या संपर्कात आहे. यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनीसुद्धा भाष्य केले आहे. ऑपरेशन टायगर होणार आहे. महाविकास आघाडीचे खासदार, आमदार आणि नगरसेवकही महायुतीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. ते रोजच भेटतात. लवकरच ऑपरेशन टायगर यशस्वी झाल्याचे दिसेल, असा दावाही त्यांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रामुख्याने शिवसेनेचे खासदार महायुतीच्या संपर्कात असल्याचे बोलले जाते. असे असताना शिरसाट यांनी दोन्ही शिवसेना एकत्र याव्यात, असे मत व्यक्त केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.