Online Gaming crime  Sarkarnama
विदर्भ

Bhandara News : ग्रामसेवकाला ऑनलाईन गेमिंगचा नाद जडला, 31 लाखांच्या चोरीचा प्रकार घडला

Crime News : देव्हाडा बुज ग्रामपंचायतमध्ये उघड झाला प्रकार; प्रशासन चौकशी करणार का?

अभिजीत घोरमारे

Bhandara News : ऑनलाइन जुगार खेळण्याच्या नादात भंडारा जिल्हाच्या एका ग्रामसेवकाने चक्क 31 लाख रुपयांची चोरी केल्याच्या प्रकार भंडारा जिल्हाच्या मोहाडी तालुक्यातील देव्हाडा बुज ग्रामपंचायतीमधील उघड झाला आहे.

ग्रामसेवक राकेश वैद्य याने सरपंच (Sarpanch) व खंडविकास अधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून बँकेतील विविध खात्यातून पैशाची उचल केली. बिंग फुटताच सोमवारी चौकशी अधिकाऱ्यांसमक्ष त्याने दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगाराच्या नादात गैरप्रकार केल्याची कबुली दिली.

या प्रकरणी पाच सदस्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. गैरप्रकारात सरपंच, उपसरपंच, खंडविकास अधिकारी यांच्या सहभागाचा संशय व्यक्त करीत फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याची मागणी होत आहे.(Crime News)

ग्रामसेवक राकेश वैद्य यांच्याकडे देव्हाडा व खडकी ग्रामपंचायतीचा कारभार आहे. देव्हाडा बुज ग्रामपंचायतीच्या बँके खात्यात साईबाबा मंदिर आवार भिंत बांधकामाचे 19 लाख तसेच घरटॅक्स मिळून 29 लाख रुपये जमा होते. त्यापैकी 28 लाख 40 हजार रुपये सरपंचाची बनावट स्वाक्षरी करून त्यांनी उचल केले. पाणी पुरवठा फंडातून 50 हजार रुपये, अमानत फंडातून 78 हजार रुपयांची उचल केली. खंड विकास अधिकारी यांचे संयुक्त खाते असलेल्या दलितवस्ती सुधार फंडातील 1 लाख 3 हजार रुपयांपैकी एक 1 लाख रुपयांची उचल केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा

राकेश वैद्य याला दोन वर्षांपासून ऑनलाइन जुगार (Online Gaming) खेळण्याचा नाद जडला होता. जुगार खेळण्यासाठी त्याने सन 2022 पासून बनावट स्वाक्षरी करून पैशाची उचल करण्याचा प्रकार चालविला होता. ग्रामसेवकाचा हा गैरप्रकार सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांना माहिती न देता सुरू होता. अनेकदा सरपंच, उपसरपंच व पदाधिकाऱ्यांनी पासबुक मागितले. मात्र पासबुक घरी आहे, नंतर दाखवतो, असे कारण सांगत ग्रामसेवक वेळ मारून नेत होता.

साईबाबा मंदिर आवार भिंतीची रक्कम सामान्य फंडात जमा होती. त्या बांधकामाचे चेक साहित्य पुरवठा धारकाने बँकेत लावले. खात्यात रक्कम नसल्याने चेक बाउन्स झाला अन् गैरप्रकार उजेडात आला. आता हा प्रकार ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या लक्षात येताच त्यांनी याची तक्रार दिली आहे. याबाबत तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून आरोपी ग्रामसेवकाला अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

याविषयी ग्रामसेवकाची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असताना त्यांनी आपली चूक झाली असे फोनवर प्रसारमाध्यमांना सांगितले. सध्या आपण जिल्ह्याबाहेर असल्याने अधिक बोलू शकत नसल्याचे त्याने सांगितले. आता प्रशासनाकडून ग्रामसेवकावर काय कारवाई होते याकडे गावातील नागरिक, पदाधिकारी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT