Sanjay Rathod Sarkarnama
विदर्भ

Yavatmal-Washim Lok Sabha Constituency : यवतमाळ-वाशीम मतदारसंघात शिवसेनेकडून संधीची संजय राठोड यांना अपेक्षा

Lok Sabha Election 2024 : एक कडवा शिवसैनिक म्हणून संजय राठोड यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. संजय राठोड यांनी 2004, 2009, 2014, 2019 अशा विधानसभेच्या चार निवडणुका लढवल्या. चारही निवडणुकांत ते विजयी झाले.

सतीश हरिश्चंद्र येटरे

Lok Sabha Election 2024 :

एक कडवा शिवसैनिक म्हणून संजय राठोड (Sanjay Rathod) यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांची लढाई सोपी नव्हती. काँग्रेसचे तत्कालीन बलाढ्य नेते गृहराज्यमंत्री राहिलेले आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे दोन वेळा अध्यक्ष राहिलेले माणिकराव ठाकरे यांच्याशी त्यांचा सामना होता. पण त्यांचेच फंडे वापरून पहिल्यांदा 2004 मध्ये राठोड यांनी माणिकराव ठाकरे यांच्यावर मात केली.

तेव्हापासून माणिकराव ठाकरे (Manikrao Thakare) एकही निवडणूक जिंकू शकले नाहीत. त्यानंतर राठोड यांनी मागे वळून पाहिलेच नाही. राज्याचे वनमंत्री, आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसनमंत्री आणि सध्या मृदा व जलसंधारण मंत्री आहेत. यवतमाळ जिल्ह्याचे ते पालकमंत्रीसुद्धा आहेत. आता यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून लढण्याची त्यांची तयारी आहे. येथे भावना गवळी पाच टर्मपासून खासदार आहेत. अशात पक्षाने संधी दिल्यास ते लोकसभा निवडणूक लढू शकतात. (Marathi News)

नाव (Name) :

संजय दुलीचंद राठोड

जन्मतारीख (Birth Date) :

30 जून 1971

शिक्षण (Education) :

बी.कॉम., बीपीएड.

कौटुंबिक पार्श्वभूमी (Family Background) :

पत्नी शीतल राठोड, मुलगी दामिनी राठोड, मुलगा सोहम राठोड असे संजय राठोड यांचे कुटुंब आहे.

नोकरी किंवा व्यवसाय काय? (Service/Business) :

शेती

लोकसभा मतदारसंघ कोणता? (Lok Sabha Constituency) :

यवतमाळ-वाशीम

राजकीय पक्ष कोणता? (Political Party Affiliation) :

शिवसेना (एकनाथ शिंदे गट)

आतापर्यंत कोणकोणत्या निवडणुका लढविल्या? किंवा आतापर्यंतचा राजकीय प्रवास? (Election Contested or Political Journey) :

संजय राठोड यांनी 2004, 2009, 2014, 2019 अशा विधानसभेच्या चार निवडणुका लढवल्या. चारही निवडणुकांत ते विजयी झाले. 2004 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या दारव्हा विधानसभा मतदारसंघात मातब्बर नेते माणिकराव ठाकरे यांचा त्यांनी पराभव केला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही. 2009 मध्ये दारव्हा विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाली. त्यात तो मतदारसंघ दारव्हा-नेर-दिग्रस असा झाला. 2009 ते 2014 अशा तीन टर्म सातत्याने राठोड हे तेथून विजयी झाले.

या निवडणुकांत त्यांनी माणिकराव ठाकरे, माजी मंत्री संजय देशमुख आदी दिग्गज नेत्यांचा पराभव केला. विशेष म्हणजे 2014 ची विधानसभा निवडणूक त्यांनी 79 हजार 864 मतांच्या विक्रमी फरकाने जिंकली होती. 30 डिसेंबर 2019 रोजी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वात त्यांनी राज्याचे वनमंत्री, आपत्ती व्यवस्थापन व मदत आणि पुनर्वसन अशा तीन खात्यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतली होती. 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत त्यांनी या खात्यांचे मंत्रिपद भूषविले.

त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटात ते सामील झाले. 14 ऑगस्ट 2022 रोजी मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांच्यावर राज्याचे अन्न व औषध प्रशासनमंत्री म्हणून जबाबदारी सोपविली. 14 जुलै 2023 ला त्यांच्याकडून हे खाते काढून घेण्यात आले. तसेच त्याच दिवशी त्यांच्यावर मृदा व जलसंधारणमंत्री म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. सोबतच ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्रीदेखील आहेत.

आतापर्यंत केलेली सामाजिक कामे? (Social Work in the Constituency) :

शिवसेनेत पदाधिकारी असताना संजय राठोड यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर अनेक आंदोलने केली. नेत्ररोग तपासणी शिबिर, आरोग्य शिबिर अशा समाजोपयोगी कार्यक्रमांचे ते बारमाही आयोजन करतात. या शिबिरातून आजवर हजारो गरजू रुग्णांनी उपचार घेतला आहे. ग्रामस्थांचे प्रशासन दफ्तरी प्रलंबित असलेले प्रश्न तालुका पातळीवरच सोडवले जावेत, यासाठी ते आग्रही असतात. त्यातून त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात जनता दरबार राबवून शेकडो प्रकरणे निकाली काढली आहेत. असे विविध उपक्रम ते सातत्याने राबवत असतात.

2019 मधील निवडणूक लढविली होती का? त्याचा निकाल काय लागला? (Whether Contested 2019 Lok Sabha Election) :

2019 मध्ये त्यांनी दारव्हा-नेर-दिग्रस या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत संजय राठोड हे विजयी झाले होते. अटीतटीच्या लढतीत त्यांनी माजी मंत्री संजय देशमुख यांचा पराभव केला होता.

2019 मधील निवडणूक निकालात विजय मिळाला असल्यास त्याची कारणे काय होती? पराभव झाला असल्यास त्याची कारणे काय होती? (Reasons for Winning the Election or Losing the Election) :

जनतेच्या कायम संपर्कात राहणे, ही मंत्री संजय राठोड यांची मोठी जमेची बाजू आहे. याशिवाय त्यांनी दिग्रस-दारव्हा-नेर या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोट बांधली आहे. परिपक्व राजकारणी असल्याने प्रत्येक समाजातील नेते व ज्येष्ठ नागरिक यांच्याशी ते सलोख्याचे संबंध ठेवून असतात. एवढेच नव्हे तर या मतदारसंघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या मतांचा फायदा त्यांना होतो. याशिवाय त्यांच्या विरोधात लढणारे नेते निवडणुकीच्या सहा महिने अथवा वर्षभरापूर्वी मतदारसंघात सक्रिय होतात. त्यामुळे संजय राठोड हे या मतदारसंघात सातत्याने निवडून येत आहेत.

मतदारसंघातील जनसंपर्क कसा आहे? (Public Relation in Constituency) :

लोकाभिमुख नेते अथवा लोकप्रतिनिधी म्हणून मंत्री संजय राठोड यांची यवतमाळ जिल्ह्यात ओळख आहे. ते पाचही वर्षे मतदार आणि जनतेच्या संपर्कात असतात. त्यामुळे त्यांचा व्यापक असा जनसंपर्क आहे. याशिवाय विविध धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे, वाढदिवस, अंत्यसंस्कार, तेरवी अशा विविध कार्यक्रमांत ते आवर्जून उपस्थित राहतात.

सोशल मीडियावरील प्रसिद्धीबद्दल? (Social Media Handles) :

मंत्री राठोड यांचे सोशल मीडियाच्या फेसबुक साइटवर अकाउंट आहे. विविध विकासकामे, वैयक्तिक घेतलेल्या कार्यक्रमांची ते त्यावरून प्रसिद्धी करतात. त्यांच्या कार्यकर्त्यांमार्फत संजय राठोड मित्र परिवार असे व्हाॅट्सॲपवर ग्रुप आहेत. त्यातूनही त्यांच्या कार्याची व्यापक अशी प्रसिद्धी केली जाते. इन्स्टाग्राम अथवा ट्विटरवर ते फारसे सक्रिय नसतात.

उमेदवाराने केलेली महत्त्वाची राजकीय विधाने किंवा वक्तव्ये (Political Statements made by Candidate) :

दोन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची यवतमाळ येथे सभा झाली. या सभेपूर्वी त्यांनी शिवसेना पक्ष (शिंदे गट) जो आदेश देईल, तो येत्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत पाळू. पक्षाने लोकसभा लढण्यास सांगितल्यास, तशी आपली तयारी असल्याचे राठोड म्हणाले. त्यामुळे त्यांनी या विधानातून एकप्रकारे लोकसभा लढणार असल्याचे सूतोवाच केले.

राजकीय गुरू कोण? (Political Godfather/Guru) :

मंत्री संजय राठोड हे स्वयंभू नेते आहेत. हाडाचा शिवसैनिक ते मंत्रिपदापर्यंत त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. मात्र, ही झेप त्यांनी स्वतःच घेतली आहे. ते जाहीरपणे त्यांचा राजकीय गुरू कोण, याबद्दल कधीच बोलत नाहीत. त्यामुळे त्यांचा कुणीही राजकीय गुरू नाही, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

सकारात्मक मुद्दे (Positive Points about candidate):

जनतेच्या कायम संपर्कात राहणे, ही मंत्री संजय राठोड यांची मोठी जमेची बाजू आहे. याशिवाय त्यांनी दिग्रस-दारव्हा-नेर या विधानसभा मतदारसंघात कार्यकर्त्यांची मोट बांधली आहे. प्रत्येक समाजातील नेते व ज्येष्ठ नागरिक यांच्याशी ते सलोख्याचे संबंध ठेवून असतात. एवढेच नव्हेतर या मतदारसंघात बंजारा समाज मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्या मतांचा फायदा त्यांना होतो.

बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथे माता मंदिर आणि संत सेवालाल महाराज मंदिराच्या उभारणीत त्यांचे मोठे योगदान आहे. याशिवाय दारव्हा तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मुंगसाजी देव, मानकी आंबा येथील उद्धवबाबा, वडसा येथील महालक्ष्मी मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे.

नकारात्मक मुद्दे (Negative Points about candidate) :

मूळ शिवसेनेतून बाहेर पडत शिवसेना एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला, हा त्यांचा नकारात्मक मुद्दा आहे. त्याचे भांडवल विरोधक करू शकतात.

उमेदवारी न मिळाल्यास काय होऊ शकते (If Didn't get chance to contest Lok Sabha election what will be the consequences) :

संजय राठोड यांना यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी न मिळाल्यास ते त्यांच्या परंपरागत दारव्हा-दिग्रस-नेर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढतील.

(Edited By-Ganesh Thombare)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT