Markadwadi-Rahul Gandhi Sarkarnama
विदर्भ

Markadwadi Voting : मारकडवाडीच्या ठिगणीचा देशभरात वणवा पेटणार, दिल्लीत अभ्यास सुरू; पटोलेंनी सांगितली अंदर की बात

Congress's Nana Patole News : मारकडवाडीतून ठिणगी पेटली आहे. ती देशभरात पोहोचवण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राहुल गांधी यांच्याशी माझे या संदर्भात बोलणे झाले आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास दिल्लीत सुरू आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 07 December : विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसने सपाटून मार खाल्ला आहे. लोकसभेत मोठे यश मिळाल्यानंतर सहाच महिन्यांत बसलेला मोठा धक्का काँग्रेसला पचनी पडलेला नाही. काहीतरी गडबड आहे, अशी शंका त्यांना आहे. ईव्हीएम हेच पराभवाचे मुख्य कारण असल्याच्या निष्कर्षावर काँग्रेस पोहोचली आहे, त्यामुळे आता पुन्हा बॅलेटवर निवडणुकीचा संकल्प काँग्रेसने सोडला आहे.

सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडीत (Markadwadi) ईव्हीएमच्या विरोधात पडलेली ठिगणी देशभर पोहोचवणार असल्याचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. ते म्हणाले, विधानसभेच्या निकालानंतर मारकडवाडीच्या ग्रामस्थांनी बॅलेटवर निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता. बॅलेट पेपरही छापण्यात आले होते, त्यावरून मोठा तणाव निर्माण झाला होता. सर्वत्र पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, गावात जमावबंदीचा आदेशही लागू केला होता.

मारकडवाडी गावाने प्रकारे निवडणूक आयोगालाच आव्हान दिले होते. मात्र, सरकार आणि प्रशासनाच्या दबावामुळे गावकऱ्यांना बॅलेट पेपरवर निवडणूक घेता आली नाही. ती रद्द करावी लागली होती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मारकडवाडीला भेट देण्याचे ठरवले आहे. त्यांचा कार्यक्रम अद्याप आलेला नाही. मात्र, कार्यक्रमाचा आखणी केली जात आहे, असेही नाना पटोले यांनी सांगितले.

मतदारांचा अधिकार वाचवण्याची जबाबदारी आमची आहे. मारकडवाडीतून ठिणगी पेटली आहे. ती देशभरात पोहोचवण्याचा संकल्प काँग्रेस पक्षाने घेतला आहे. राहुल गांधी यांच्याशी माझे या संदर्भात बोलणे झाले आहे. या सर्व गोष्टींचा अभ्यास दिल्लीत सुरू आहे. बॅलेट प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी काम सुरू असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

महायुतीचे सर्वाधिक आमदार निवडून आले आहेत. सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ त्यांच्याकडे आहे. असे असतानाही मुख्यमंत्र्यांना शपथ घेण्यासाठी तेरा दिवस लागले. हे बघता महायुतीमध्ये सारेकाही आलबेल असे दिसत नसल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.

विरोधात असताना देवेंद्र फडणवीस यांनी सत्ता हाती द्या, २४ तासांत स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ओबीसींचे आरक्षण मिळवून देतो, असा दावा केला होता. त्यानंतर अडीच वर्षे महायुतीची सत्ता राज्यात होती. त्यामुळे त्यांचे दावे किती खरे होतात की खोटे हे आता जनतेनीच ठरवावे, असा टोलाही पटोले यांनी हाणला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT