Akola ZP News Sarkarnama
विदर्भ

Akola ZP News: महिला अधिकाऱ्याचे जिल्हा परिषदेच्या सदस्यांवर गंभीर आरोप!

जयेश विनायकराव गावंडे

Akola News : अकोला जिल्हा परिषदेच्या महिला अधिकाऱ्यांनी सदस्यांवर आरोप करत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. स्थायी समितीच्या सभेत प्रकार घडल्याचा आरोप महिला अधिकाऱ्यांनी केला आहे. सभेत काही जिल्हा परिषद सदस्यांनी महिला अधिकाऱ्यांशी एका प्रश्नावर बोलताना असभ्य आणि असंविधानिक ब भाषेचा वापर केला असल्याचा आरोप केला आहे.

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखेडे यांच्यासह महिला अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षांसह मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देवून या प्रकरणाची चौकशी करून करण्याची मागणी केली.

अकोला (Akola) जिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा चांगलीच चर्चेत आली आहे. थेट महिला अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी केल्याने या प्रकाराची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. महिला अधिकारी यांनी दिलेल्या निवेदनानुसार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृहात दुपारी एक वाजता स्थायी समितीची सभा पार पडली.

या सभेच्या दरम्यान बाळापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पदभरती संदर्भात मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावेळी काही जिल्हा परिषद सदस्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजश्री कोलखडे यांच्या विभागाच्या संदर्भात बोलताना सभागृहात आक्रमक होवून असभ्य व असंवैधानिक भाषेचा वापर केला तसेच हातवारे आणि इशारे करून असंविधानिक भाषेचा वापर केला असल्याचा दावा करत निवेदनात करण्यात आला आहे.

दरम्यान याची चित्रफीत देखील उपलब्ध असल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे सदस्यांच्या कार्यपद्धती, वर्तणूक व भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे महिला अधिकारी कर्मचारी प्रचंड धास्तावले असून त्यांचे मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

त्यामुळे या प्रकरणाची सर्वकष चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याची मागणी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांच्याकडे करण्यात आली. त्यामुळे अधिकारी व पदाधिकारी यांच्यातील संघर्ष आगामी काळात वाढण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महिला अधिकाऱ्यांच्या निवेदनामुळे खळबळ

जिल्हा परिषदेत महिला अधिकाऱ्यांनी थेट जिल्हा परिषद सदस्य यांच्या विरोधात निवेदन दिल्याने याची चर्चा जिल्हा परिषदेत सुरू होती. दरम्यान, या प्रकारामुळे आगामी काळात महिला अधिकारी आणि जिल्हा परिषद (ZP) सदस्य यांच्यातील संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान महिला अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी नेमका काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT