Uddhav Thackeray  Sarkarnama
विदर्भ

Shivsena UBT : नागपुरात ठाकरे सेनेच्या वाट्याला दोन जागा; उमेदवारही लागले कामाला

Assembly Election 2024 : युतीत असताना ग्रामीण भागात दोन आणि शहरातील एका मतदारसंघात शिवसेना लढत होती. महाविकास आघाडीमुळे नागपूर जिल्ह्यातील एका जागेची शिवसेनेची घट झाली आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 11 October : नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागातील दोन आणि नागपूर शहरातील दोन अशा चार विधानसभा मतदारसंघाची मागणी करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने दोन मतदारसंघावर समझोता केला आहे.

ग्रामीणमधील रामटेक आणि शहरातून दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघ शिवसेनेने फायनल केले आहेत. सोबतच उमेदवारसुद्धा निश्चित केले असून त्यांना खासगीत प्रचार करण्याच्या सूचनाही उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. दक्षिण नागपूरवरून काँग्रेस आणि शिवसेनेत वाद उफाळून येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे Shivsena UBT) सुरुवातीपासूनच दक्षिण आणि रामटेक या दोन विधानसभा मतदारसंघावर फोकस ठेवला होता. युतीत असताना ग्रामीण भागात दोन आणि शहरातील एका मतदारसंघात शिवसेना लढत होती. महाविकास आघाडीमुळे नागपूर जिल्ह्यातील एका जागेची शिवसेनेची घट झाली आहे.

दक्षिण नागपूर मतदारसंघातून (South Nagpur Constituency) काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेसचे गिरीश पांडव अवघ्या साडेचार हजार मतांच्या फरकांनी पराभूत झाले होते, त्यामुळे ही जागा सोडण्यात येऊ नये, अशी मागणी काँग्रेसकडून केली जात होती. दुसरीकडे शिवसेनेने दक्षिण नागपूरसाठीही सर्व जोर लावला होता.

शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद मानमोडे आणि दुसरे जिल्हा प्रमुख किशोर कुमेरिया त्यासाठी आग्रही होते. दोघांनाही दक्षिण नागपूर मतदारसंघातूनच निवडणूक लढवायची आहे. कुमेरिया युती असताना व नसतानाही विधानभेची निवडणूक लढले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून या वेळी प्रमोद मानमोडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले असल्याचे समजते.

मानमोडे यांनी प्रचाराला सुरुवात देखील केली आहे. दक्षिणमधून गिरीश पांडव यांच्यासह काँग्रेसच्या सोशल मीडिया विभागाचे प्रमुख विशाल मुत्तेमवार आणि मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनीसुद्धा दावा केला आहे. पांडव पाच वर्षांपासून काम करीत आहेत. शिवसेनेने दक्षिण पटकावल्याने आता काँग्रेसचे नेते काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामटेक विधानसभा मतदारसंघातून विशाल बरबटे यांचे नाव जवळपास निश्चित आहे. त्यामुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक यांची पुन्हा एकदा अडचण झाली आहे. त्यांना आता शेजारच्या कामठी विधानसभा मतदारसंघात जावे लागेल, असे दिसून येते.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT