Atul Londhe on vote calculations and strength Sarkarnama
विदर्भ

Atul Londhe: भाजपनं जुन्या नेत्यांना सोडलं पण काँग्रेसनं राखलं! नागपूरमधून अतुल लोंढेंचं नाव अंतिम; संख्याबळाच्या जुळवाजुळवीवर केलं भाष्य

Congress finalises Atul Londhe from Nagpur: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीकडून ८ जागांवर निवडणूक लढत आहे.

Amit Ujagare

Atul Londhe reacts to election arithmetic: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेस महाविकास आघाडीकडून ८ जागांवर निवडणूक लढत आहे. यांपैकी नागपूरच्या जागेसाठी काँग्रेसकडून अंतिम उमेदवार निवडीवर एकमत होत नसल्यानं सुरुवातीला चार जणांकडून अर्ज भरण्याची तयारी करण्यात आली.

त्यानंतर केवळ दोन उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले आहेत. त्यामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे आणि माजी विधानपरिषद सदस्य दिनेश ढोले यांचं नाव आहे. या दोघांनीच सध्या उमेदवारी अर्ज भरले आहेत, त्यातही अतुल लोंढे हेच मुख्य उमेदवार असणार आहेत.

काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे, माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले, माजी नगरसेवक सुरेश जग्यासी आणि काँग्रेस कार्यकर्त्या सुनीता महाले यांनी काँग्रेसकडून अर्ज दाखल करणार होते. अतुल लोंढे यांच्यासह इतर उमेदवारांचे नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी काँग्रेसचे सर्व नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे सुद्धा दाखल झाले होते.

काँग्रेस नेत्यांमध्ये उमेदवार निवडीवरून एकमत झाले नसल्याने चारजण उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा फॉर्म्युला ठरवला गेला होता. अधिकृत उमेदवाराच्या नावावर एकमत होत नसल्यानं काँग्रेसमध्ये उमेदवारीवरून नाट्यमय घडामोडी सुरू होत्या. पण यामध्ये अतुल लोंढे यांचंच नाव अंतिम झाल्याचं खासदार श्याम कुमार बर्वे यांनी सांगितलं आहे.

बर्वे म्हणाले की, "नागपूर काँग्रेसकडून सहा जणांच्या नावाची यादी तयार करण्यात आली होती. यामध्ये अधिकृतपणे एबी फॉर्म सोबत काँग्रेसचे मुख्य उमेदवार अतुल लोंढे आणि त्यांच्यासोबत माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश ढोले यांचा नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे.

त्यानंतर असलेले चार लोकांचे नामांकन अर्ज तयार करण्यात आले असले तरी ते दाखल करण्यात आले नाहीत. यामध्ये मुख्य उमेदवार हे अतुल लोंढेच असल्याचं आता निश्चित झालं आहे, त्यामुळं काही तांत्रिक अडचणी आल्यास पर्याय म्हणून दिनेश ढोले यांचा दुसरा अर्ज एबी फॉर्म सोबत म्हणजे बी फार्मवर दुसरं नाव असणार आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर अतुल लोंढे म्हणाले, "आमच्याकडं संख्याबळ जरी नसलं तरी मोठ्या प्रमाणामध्ये जनतेमध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात असंतोष आहे, या असंतोषामुळं मला मतदान मिळेल असा विश्वास आहे. यापूर्वीसुद्धा राजेंद्र मुळक यांच्या वेळेस संख्याबळ कमी होतं. मात्र, त्यावेळेसही आम्ही निवडणूक जिंकू असे सांगितलं होतं.

काँग्रेसमध्ये कुठलाही वाद नाही आणि आम्ही एकत्रितपणे हे निवडणूक लढू असा विश्वासही यावेळी लोंढे यांनी व्यक्त केला. देशात आणि राज्यात सुरू असलेली ही वैचारिक लढाई आमचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली लढली जात आहे. त्याच विचारांच्या बळावर आम्हीही ही लढाई पुढे नेणार आहोत.

काँग्रेस पक्षातील सर्व वरिष्ठ नेते आणि कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने मी काँग्रेसकडून उमेदवारी अर्ज दाखल करत आहे. सध्याच्या सरकारच्या कारभारामुळं नागरिकांमध्ये नाराजी आहे. पेपरफुटीसारख्या गंभीर प्रकरणांमुळे तरुण वर्ग त्रस्त झाला असून या सरकारला कंटाळलेल्या मतदारांचा पाठिंबा आम्हाला मिळेल, असा विश्वास आहे"

नेमका काँग्रेस नेत्यामध्ये वाद काय?

सुनील केदार यांच नागपूर ग्रामीण, नगरपालिका, नगरपंचायतमध्ये वर्चस्व असताना नितीन राऊत यांना निरीक्षक म्हणून जवाबदारी दिल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. नुकतंच प्रफुल गुढधे यांना शहराध्यक्षपद दिल्याने विकास ठाकरे समर्थक नाराज, मनपामध्ये नगरसेवक बहुतांश विकास ठाकरे यांचे समर्थक आहेत.

सुनील केदार यांनी नगरपालिका, नगरपरिषद निवडणुकीत स्थानिक काँग्रेस नेत्यांना विश्वासात न घेरल्याचा नेत्यांना राग आहे. सुनील केदार यांच्या हेकेखोर वागण्याने काँग्रेसला अपेक्षित यश न मिळाल्याने यंदा नगरसेवक संख्या कमी असल्याने त्याचा फटका काँग्रेसला बसणार आहे. सुनील केदार, नितीन राऊत आपल्या सार्थकाना तिकीट देण्यास इच्छुक असल्याने अखेरपर्यंत उमेदवार ठरविण्यास एकमत होऊ शकलेलं नाही.

SCROLL FOR NEXT