Ashok chavan Sarkarnama
मुंबई

Ashok Chavan : फडणवीसांसमोरच 'आदर्श' घोटाळ्याबाबत चव्हाणांना प्रश्न; म्हणाले, "हा एक..."

Ashok Chavan Join Bjp : "38 वर्षांचा प्रवास मी आज बदलत आहे," असं चव्हाणांनी प्रवेशानंतर म्हटलं.

Akshay Sabale

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांनी मंगळवारी ( 13 फेब्रुवारी ) भाजपत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ), प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार, खासदार प्रताप पाटील चिखलीकर, मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थित चव्हाणांचा प्रवेश झाला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सबका साथ सबका विकास' या भूमिकेशी सहमत होऊन मी आजपासून माझ्या नव्या राजकीय प्रवासाला सुरुवात करत आहे," असं चव्हाणांनी म्हटलं. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते. ( Ashok Chavan Join Bjp Latets News )

अशोक चव्हाण म्हणाले, "भाजपमधील प्रवेशानं मी माझ्या आयुष्यातील नवीन राजकीय वाटचाल सुरू करत आहे. 38 वर्षांचा प्रवास मी आज बदलत आहे. पंतप्रधानांनी 'सबका साथ सबका विकास' हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य सुरू केलं. त्यांच्या कार्यातून स्फूर्ती आणि प्रेरणा घेऊन मी राज्यात आणि देशात विकासाचे काम करण्यासाठी भाजपमध्ये प्रवेश केला आहे."

"मी जिथं होतो, तिथं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रामाणिकपणे काम करण्याची ग्वाही देणार आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जास्तीत जास्त जागा मिळण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राजकारण हे सेवेचं माध्यम आहे. मी कुणावरही टीका करणार नाही," असं चव्हाणांनी स्पष्ट केलं.

या वेळी प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधीनं देवेंद्र फडणवीसांसमोर अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळ्यावरून विरोधकांकडून टीका सुरू असल्याबाबत विचारलं. त्यावर अशोक चव्हाण म्हणाले, "हा प्रश्न उशिरा आला. पहिल्यांदाच घ्यायला पाहिजे होता. याप्रश्नी उच्च न्यायालयात आमच्या बाजूनं निकाल लागला आहे. काही यंत्रणा निकालाविरोधात गेल्या आहेत. पण, कायदेशीर प्रक्रिया पार पाडू. हा एक राजकीय अपघात म्हणावं लागेल. फार काही चिंतेचा विषय वाटत नाही."

दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आदर्श घोटाळ्यावरून 'एक्स' अकाउंटवर ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. "भाजपची स्मरणशक्ती कमजोर आहे. किंवा ते जनतेला मूर्ख समजतात.

भाजपचे आरोप - माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे तथाकथित आदर्श घोटाळ्यातील आरोपी आहेत.

कृती - अशोक चव्हाण यांच्यामागे ईडी, सीबीआय यांचा ससेमिरा लावला

परिणाम - अखेर या जाचाला कंटाळून अशोक चव्हाण भाजपत दाखल. आता प्रश्न असा आहे की, कालपर्यंत जे तुम्हाला भ्रष्ट वाटत होते त्यांनी नेमकं असं काय पुण्य केलं ते अचानक तुम्हाला पूजनीय वाटू लागले ? निर्लज्जपणाचीदेखील काहीतरी एक सीमा असते," अशा शब्दांत नाना पटोलेंनी भाजपला फटकारलं आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT