Mumbai BMC Election  Sarkarnama
मुंबई

Mumbai BMC Alliance : शिंदेंची शिवसेना अन् मनसे या नवीन युतीची राज्यात पहाट होणार?

Raj Thackeray and Eknath Shinde : 'लोकसभेत मोठे यश मिळवल्यास भाजप आपल्या तालावर महायुतीमधील शिंदे आणि अजित पवार गटाला नाचवेल.'

सरकारनामा ब्यूरो

संजय परब -

Mumbai News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा भेटल्याने आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्यात नव्या युतीचा जन्म होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वर्षभरातील शिंदे आणि राज यांची ही सहावी भेट असून गुरुवारी 28 डिसेंबरला झालेल्या सहाव्या भेटीत बंद दाराआड चर्चा झाल्याने, लोकसभा निवडणुकीचा मुहूर्त साधत शिंदे यांची शिवसेना आणि मनसे एकत्र येण्याच्या शक्यतेला दुजोरा मिळाला आहे. (Latest Marathi News)

शिंदे शिवसेना आणि मनसे या दोन्ही पक्षांचा प्रमुख प्रतिस्पर्धी हा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) असून मुंबईसह पुणे, ठाणे, नाशिक, संभाजीनगर आणि कोकणात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या अस्तित्वाला सुरुंग लावायचा असेल तर दोघांनी एकत्र आले पाहिजे, यावर या बैठकीत विचारविनिमय झाल्याचे बोलले जाते.

निवडणुकीच्या मैदानात तिघे वेगवेगळे लढले तर बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असणारी सहानभूती याचा फायदा मातोश्रीला मिळणार आहे. यात शिंदे आणि राज या दोघांचा मोठा तोटा आहे. शिंदे मुख्यमंत्री झाल्यापासून राज ठाकरे हे त्यांच्याबद्दल नेहमी आस्था बाळगून असल्याचे दिसले आहे. याउलट भाजपवर टीका करायची एकही संधी ते सोडताना दिसत नाही. भाजपचा मतदार हा पुर्णतः वेगळा असून तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावावर मतदान करणार आहे.

भाजपच्या अवकाशात ना शिंदे, ना मनसेला स्थान आहे. यदाकदाचित भाजपने अपेक्षेप्रमाणे जोरदार मुसंडी मारत लोकसभेत मोठे यश संपादन केल्यास ते शिंदे यांना बाजूला टाकतील. मनसेला जवळ करण्याचा भाजपचा प्रश्न येत नाही. लोकसभेत मोठे यश मिळवल्यास भाजप मग आपल्या तालावर महायुतीमधील शिंदे आणि अजित पवार गटाला नाचवेल. सोबत राहायचे तर राहा, नाही तर तुम्हाला मार्ग मोकळा असल्याचा इशारा त्यांना देण्यात येईल. यामुळे शिंदे आणि अजितदादा यांची अवस्था इकडे आड, तिकडे विहीर होईल. मुख्य म्हणजे शिंदे आणि अजितदादा मनासारखे वागले नाहीत तर भाजपच्या हातात ईडीचे शस्त्र असणारच आहे.

या सगळ्याचा विचार करून शिंदे आतापासून आपली स्वतःचे वेगळे अवकाश निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याचा एक भाग म्हणजे राज यांच्या सोबतच्या बंद दाराआडच्या चर्चा होय. एक ठाणे सोडले तर शिंदे यांना राज्यात आपली एकहाती ताकद निर्माण करता आलेली नाही. भाजपला ही गोष्ट चांगलीच ठाऊक असून त्यांच्या सर्व्हेत सुद्धा ही गोष्ट ठळकपणे समोर आली आहे. आता शिंदे हे राज्याच्या दौऱ्यावर निघत असले तरी त्यांना चार एक महिन्यात फार मोठा चमत्कार करता येणार नाही.

विशेष म्हणजे भाजपच्या चिन्हावरच त्यांच्या उमेदवारांना निवडणूक लढवण्याची तयारी करावी लागेल. तसे झाल्यास शिंदे यांच्या शिवसेनेचे स्वतंत्र अस्तित्व उरणार नाही आणि याचा मोठा फटका त्यांना बसेल. भाजपचा पूर्व इतिहास पाहता मित्रपक्षांना संपवण्यात त्यांचा हात देशात कोणी धरू शकत नाही. आता राज यांना सोबत घेतल्यास विधानसभा निवडणुकीत थोडेफार यश हाती येईल. याशिवाय राज्यातील काही महापालिका हातात येऊ शकतात, असा शिंदे विचार करत असल्याचे कळते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिंदे आणि राज यांच्यात वारंवार भेटींचं सत्र सुरु आहे. गणपतीत एकनाथ शिंदे यांनी शिवतिर्थावर जाऊन राज ठाकरे यांच्या बाप्पाचं दर्शन घेतलं आणि तिथून या सर्व चर्चांना सुरुवात झाली. पण त्यानंतर अनेकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात औपचारिक आणि अनपौचारिक अनेक भेटी झाल्या. राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर शिंदे आणि ठाकरे यांच्या भेटी सातत्याने पाहिला मिळाल्या. कधी गणेशोत्सवाच्या निमित्ताने सदिच्छा भेट तर कधी मनसे दीपोत्सवाच्या निमित्ताने एका मंचावर हजेरी, कधी चित्रपटाच्या मुहूर्ताच्या निमित्ताने तर कधी जनतेच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी. या सगळ्या भेटींमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये होणारी बंद दाराआड चर्चा हा राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरतोय.

मागील काही महिन्यांमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने पाहायला मिळाली ती म्हणजे, राज ठाकरे कोणताही विषय हाती घेतात आणि सरकार त्यावर तातडीने ठोस पावलं उचलत असल्याचं पाहायला मिळतंय. मग तो टोलचा विषय असो, मराठी पाट्यांचा की बीडीडी, सिडको रहिवाश्यांचा विषय असो. राज ठाकरे विषय घेऊन मुख्यमंत्र्यांकडे पोहोचतात आणि मग मंत्री राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थावर पोहोचतात. मंत्री दादा भुसे टोलचा विषय मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे पोहोचले होते. तर मंत्री तानाजी सावंत आरोग्य विभागाचा विषय सोडवण्यासाठी शिवतीर्थावर आले होते.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT